Pimpri Chinchwad News : : अजित पवार महायुतीसोबत सत्तेत सहभागी झाल्याने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांना मिळाले. सत्तेत आल्यानंतर अजित पवारांनी आपल्या समर्थकांना निधी देण्याचा सपाटा लावल्याचा आरोप होत आहे. आता जिल्हा नियोजन समितीमध्ये असून आपल्यालाच निधी मिळत नसल्याच्या कारण पुढे करत समितीमधील भाजप, शिवसेना सदस्यांनी अजित पवारांना टार्गेट केले आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना पत्र लिहिले आहे.
पुणे जिल्हा नियोजन समितीला (डीपीडीसी)चे कामकाज गेल्या सात महिन्यांपासून ठप्प होते. दर तीन महिन्यांनी होणारी समितीची बैठक सात महिन्यानंतरही झाली नाही. त्याचा उद्रेक समितीतील भाजप आणि शिवसेनेच्या दहा सदस्यांच्या लेटरबॉम्बने झाला. मंगळवारी (दि.२६) हा लेटरबाॅम्ब पडला. जिल्हा नियोजन समितीचे सचिव असलेले पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्यावर हा लेटरबॉम्ब टाकला असला तरी खरे टार्गेट हे पालकमंत्री अजित पवारच आहेत.
निधी मिळण्याकरिता त्यावर अंतिम मोहोर उमटविण्यासाठीची तीन महिन्यांनी होणारी डीपीडीसीची बैठक ही सात महिन्यानंतरही झालेली नाही. दुसरीकडे नव्या पालकमंत्र्यांच्या समर्थक सदस्यांच्या कामांची शिफारस मात्र बैठक न घेता करण्यात आल्याने हे दहा सदस्य संतापले. त्यांनी बैठकीविना सुचविलेली कामे थांबविण्यासाठी आणि आपल्या कामांना निधी मिळण्याकरिता डीपीडीसीची बैठक लगेच घेण्याचा हा लेटरबॉम्ब टाकला.अन्यथा न्यायालयात जाऊ,असा इशारा दिला असल्याचे लेटरबॉम्ब टाकणाऱ्या सदस्यांनी 'सरकारनामा'ला सांगितले,
जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये सदस्यांमध्ये विजय फुगे आणि काळूराम नढे हे पिंपरी-चिंचवडमधील दोन भाजप सदस्यांचा समावेश आहे. तर, उत्तर पुणे जिल्हा (मावळ) भाजप अध्यक्ष शरद बुट्टे-पाटील, बारामती अध्यक्ष वासुदेव काळे,जुन्नरच्या आशा बुचके यांच्या देखील स्वाक्षरी या पत्रावर असून हे पत्र 'सरकारनामा'च्या हाती लागले आहे.
लेटरबॉम्बमुळे महायुतीतील वाद समोर आला. त्याला आणखी हवा मिळू नये म्हणून आता डॅमेज कंट्रोलचे काम सुरु झाले आहे.नॉमिनेटेड आणि विशेष निमंत्रित डीपीडीसी सदस्यांना एक कोटी रुपयांचा निधी तातडीने देण्याची तयारी दर्शवली गेली आहे. त्याला नढे आणि फुगे यांनी दुजोरा दिला आहे.तसेच चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री असताना १९ मे च्या बैठकीत मंजूर झालेल्या कामांनाही येत्या १५ दिवसांत निधी देण्याचे आश्वासन लेटरबॉम्ब टाकणाऱ्या सदस्यांना देण्यात आले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चमध्ये लागणार असल्याने गेले सात महिने न झालेली डीपीडीसीची बैठक बहूधा पुढील महिन्यात घेण्याच्या हालचालीही सुरु झाल्या आहेत.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.