Pune News : भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मात्र, या पोटनिवडणुकीत काँग्रेससमोर बंडखोरीचं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. आता राजकीय उमेदवारीवरुन नाराजीनाट्य रंगू लागले आहे. भाजपाकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे टिळक कुटुंबियांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
तर दुसरीकडे रविंद्र धंगेकर यांचं नाव कसब्यातून उमेदवारीसाठी आघाडीवर असतानाच इच्छुकांच्या बंडखोरीमुळे काँग्रेस (Congress) पक्षाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांनी पक्षाला बंडखोरीचा इशारा दिला आहे.
कसबा पोटनिवडणुकीची ( Kasba By Election) बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. भाजपकडून उमेदवार जाहीर झालेला असतानाच काँग्रेस पक्ष मात्र उमेदवारीवरुन संभ्रमात असल्याचं समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनं आपल्या उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, उमेदवारीवरुन काँग्रेसपक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी महाआघाडीतील काँग्रेस पक्षातून इच्छुकांची यादी मोठी आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे निरीक्षक संग्राम थोपटे यांनी ऑनलाईन १६ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. यात रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), अरविंद शिंदे, कमल व्यवहारे, संगीता तिवारी, बाळासाहेब दाभेकर यांच्या नावांचा समावेश आहे.
मात्र, आता टिळक कुटंबियांना तिकीट नाराजी नाकारल्यानंतर काँग्रेसमधून रोहित टिळकांचं नाव चर्चेत आलं आहे. टिळक यांना तिकीट जाहीर करुन काँग्रेस भाजपचं टेन्शन वाढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचवेळी धंगेकर यांचं नाव सर्व उमेदवारांमध्ये आघाडीवर आहे. मात्र, धंगेकर यांच्या उमेदवारीवरुन काँग्रेसकडून कसबा पोटनिवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरीचा इशारा दिला आहे.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन ही निवडणूक कशी लढवायची यावर मंथन केले. काँग्रेसमध्ये रविंद्र धंगेकर यांचं नाव निश्चित झाल्याचं सांगण्यात येत असल्याने त्यांच्या कार्यालयासमोर फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. पण, काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांमध्ये धंगेकर यांच्या उमेदवारीवरून नाराजी आहे. त्यास काही स्थानिक नेत्यांनी देखील फूस लावल्याने बंडखोरीचा फटका बसू शकतो यामुळे आज उमेदवारी जाहीर झाला नाही. रविवारी किंवा सोमवारी उमेदवारी जाहीर होईल असं सांगितलं जात आहे.
...तर बंडखोरी करणार!
काँग्रेसचे बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dabhekar) यांनी निष्ठावंताला डावलून बाहेरच्याला उमेदवारी दिल्यास बंडखोरी करणार असं आव्हान पक्षाला दिला आहे. यामुळे आता काँग्रेसनं उमेदवार जाहीर करण्याचं टाळलं आहे. त्यामुळे आता कसबा मतदारसंघात पक्षांतर्गत भूमिकेमुळे भाजप आणि काँग्रेसचं टेन्शन वाढलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.