

Pune ZP Result News : वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या कुटुंबात राजकारणाचा एक नवा पॅटर्न पाहायला मिळत आहे. ते स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार असताना मुलगा सुरेंद्र पठारे अन् सून ऐश्वर्या पठारे भाजपचे नगरसेवक आहेत. आता त्यांच्या दोन्ही मुलीही जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाल्या आहेत.
2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बापूसाहेब पठारे आणि त्यांचे कुटुंब भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आले. तुतारी चिन्हावर निवडणूक लढवत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील टिंगरे यांचा पराभव केला. त्यानंतर वर्षभरातच त्यांचा मुलगा आणि सुनेने भाजपची वाट धरत नगरसेवकपदाची निवडणूक लढली. या निवडणुकीत मोठ मताधिक्य घेत सुरेंद्र पठारे आणि ऐश्वर्या पठारे हे नगरसेवक झाले.
आता बापूसाहेब पठारे यांच्या दोन्ही मुलीही जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. पठारे यांची एक मुलगी रुपाली अमोल झेंडे पुरंदरमधील 'दिवे गराडे' या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार होती. तर दुसरी मुलगी दिपाली राहुल गव्हाणे या शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटातून भाजपकडून निवडणूक लढवत होत्या.
रुपाली झेंडे या IPS अमोल झेंडे यांच्या पत्नी असून त्या पुरंदर पुरंदर तालुक्यातील दिवे गराडे गटातून विजयी झाली आहे. तर दुसरी मुलगी दिपाली गव्हाणे सध्या डिंग्रजवाडीच्या ग्रामपंचायत सदस्या आहेत. त्यांचे पती राहुल गव्हाणे उद्योजक आहेत. आता जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत त्या विजयी झाल्या आहेत. या पठारे पॅटर्नची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
बापूसाहेब पठारे स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत. मुलगा अन् सून भाजपचे नगरसेवक आहेत. तर आता दोन्ही मुली भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्या झाल्या आहेत. थोडक्यात एकाच घरावर तीन वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे पाहायला मिळत आहेत. या नवीन राजकीय पॅटर्नची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.