

Baramati News: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकीसाठी 59 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून त्यापैकी सहा जणांचे अर्ज अवैध ठरले आहेत. 53 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. गुरुवारी(ता.9 एप्रिल) अर्ज मागे घेण्यासाठीची अंतिम मुदत आहे. याचदरम्यान, आता काँग्रेसनं धक्कादायक खुलासा केला आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून ॲड. आकाश विश्वनाथ मोरे यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. मात्र, त्यांनी प्रचाराच्या सुरुवातीलाच एक राजकीय बॉम्ब टाकला होता. त्यात त्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी होऊन महाराष्ट्रात गुन्हा दाखल झाला, तर मी आता निवडणुकीतून माघार घेण्यास तयार असल्याचं स्पष्ट करत मोठी खेळी केली होती. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं होतं.
तर दुसरीकडे महायुतीतील भाजप,शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेससोबत सुनेत्रा पवारांच्या बारामतीतील विजयासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. तसेच भाजपकडून 'बिनविरोध'आशा मावळल्यानंतर काँग्रेसवर टीकेची झोड उठवली होती. तसेच मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला जनभावनेची थोडीतरी कदर असेल आणि जनतेचे मत काय आहे, हे जर काँग्रेसला लक्षात येणार असेल तर ते उमेदवारी परत घेऊन सुनेत्राताई पवार यांना बिनविरोध निवडून देतील, अशी प्रतिक्रिया दिली होती.
तसेच बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात काँग्रेस योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली होती. जनमताच्या विरोधात जाणे कोणत्याही पक्षाच्या हिताचे नसते. सुनेत्राताईंना बिनविरोध निवडून द्यावे ही जनभावना आहे. काँग्रेस जनभावनेशी खेळण्याचे काम करणार नाही, अशी अपेक्षा करत असल्याचं फडणवीस म्हणाले होते.
पण आता महाराष्ट्र काँग्रेसनं ट्विटद्वारे मोठा खुलासा केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसनं बुधवारी (ता.9 एप्रिल) बारामती पोटनिवडणुकीवर थेट भाष्य करणानं ट्विट केलं आहे . त्यात बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यानं काँग्रेस पक्षाशी अद्याप संपर्क साधलेला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
या संदर्भात प्रसारित होत असलेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या, दिशाभूल करणाऱ्या आणि निराधार आहेत. अशा अफवा मुद्दाम पसरवून भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसची फसवणूक करत असल्याचा आरोपही महाराष्ट्र काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात निधन झाले. पण या अजितदादांच्या अपघातावर संशय उपस्थित केला जात असून काही नेतेमंडळींकडून तो घातपातही असल्याची टीका केली जात आहे. या घटनेनंतर कर्नाटकमध्ये झिरो एफआयआर दाखल करण्यात आला असून महाराष्ट्रात कोणतेही कायदेशीर पाऊल उचलण्यात आलेले नाही. याच पार्श्वभूमीवर अजितदादांच्या अपघाती मृत्यूप्रकऱणी गुन्हा दाखल करण्यासाठी महायुती सरकारवर दबाव टाकला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर महायुतीनं राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन ही जागा राखण्याचा निर्धार केला आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसने आकाश मोरे यांना मैदानात उतरवले आहे.
मी निवडणूक लढवण्यावर आजही ठाम आहे. परंतु पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य असेल. माझी केवळ एकच मागणी आहे की अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत महाराष्ट्रात रितसर गुन्हा दाखल व्हावा. जर ही मागणी पूर्ण झाली, तर मी बारामती पोटनिवडणुकीतून माझा उमेदवारी अर्ज मागे घेण्यास आजही तयार आहे, असे पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रिंगणात उतलेले आकाश मोरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं आपला एकही उमेदवार दिलेला नाही. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी जाहीरपणे सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं होतं. तर दुसरीकडे आकाश मोरे यांच्या एका मागणीनं बारामतीचे राजकारण पूर्णपणे ढवळून निघाल्याचं दिसून आलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.