

Baramati News: बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. सुनेत्रा पवारांसाठी ही निवडणूक बिनविरोध होणार का? याबाबत अद्यापही उत्सुकता कायम आहे. पण काँग्रेसची अट भाजपनं अद्याप मान्य केलेली नसल्यानं ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याची चिन्हं आहेत. पण जर काँग्रेसचा उमेदवार कायम राहिला तर त्यासाठी वंचित बहुजन आघाडी देखील प्रचारासाठी मैदानात उतरणार आहे. पण त्यासाठी वंचितकडूनही एक अट ठेवण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते तथा राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितलं की, "काँग्रेसचे काही नेते बारामती विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी राहुल गांधी यांना उतरवण्याची तयारी करत आहेत. जर काँग्रेस बारामती विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी राहुल गांधींना बोलणार असेल तर, वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांना प्रचारासाठी घेऊन जाऊ असा निर्णय वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने घेतला आहे.
दरम्यान, काँग्रेसने बारामती जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तो काँग्रेसचा संविधानिक अधिकार आहे तेथे वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आम्ही उमेदवार दिलेला नाही. काँग्रेस बारामती विधानसभा जागा लढत आहे ही आनंदाची बाब आहे. काँग्रेस पूर्ण ताकतीने तेथील जागा लढवेल अशी चर्चा आहे, असंही मोकळे यांनी स्पष्ट केलं आहे.
बारामती पोटनिवडणुकीबाबतची अपडेट म्हणजे यासाठी तब्बल ५९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, यांपैकी ५३ अर्ज वैध ठरले असून ६ अर्ज बाद झाले आहेत. वैध अर्जांपैकी काँग्रेसच्या उमेदवाराचाही अर्ज आहे. त्याचबरोबर उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळं जर उद्या तीन वाजेपर्यंत एकतरी अर्ज कायम राहिला तर बारामतीत निवडणूक होईल. त्यानंतर प्रचार सुरु होऊन २३ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे, तर ४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.