Pune BJP Meeting : पुण्यातील राहुल गांधींच्या कार्यक्रमानंतर CM फडणवीस ‘अलर्ट’; काँग्रेसने तयार केलेले वातावरण फिरवण्यासाठी भाजपचे साडेतीन हजार पदाधिकारी शहरात

Pune BJP State Executive Meeting : गेल्या आठवड्यात काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाने भाजपच्या गोटात हालचालींना वेग आल्याचे चित्र आहे.
Rahul Gandhi and Devendra Fadnavis
Rahul Gandhi and Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे शहर गेल्या दशकभरापासून भाजपचा मजबूत बालेकिल्ला बनला आहे. शहरातील आठपैकी सहा आमदार भाजपचे आहेत. पुण्याचे दोन्ही खासदारही भाजपचे असून, केंद्रीय राज्यमंत्री, राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री अशी सत्तेतील ताकद भाजपकडे आहे. पुणे महापालिकेतही 119 नगरसेवकांचे बळ आहे. मात्र, या मजबूत राजकीय किल्ल्यात गेल्या आठवड्यात काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाने भाजपच्या गोटात हालचालींना वेग आल्याचे चित्र आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपने 31 ऑगस्ट रोजी पुण्यात प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह राज्यातील मंत्री, खासदार, आमदार आणि पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, संपूर्ण महाराष्ट्रातून तब्बल साडेतीन हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीसाठी पुण्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे केवळ संघटनात्मक बैठक म्हणून नव्हे, तर पुण्यात भाजपची ताकद पुन्हा अधोरेखित करण्याच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे.

राहुल गांधींच्या कार्यक्रमाला प्रतिसाद; भाजपमध्ये हालचाली

राहुल गांधी यांनी पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधत तरुणाईच्या प्रश्नांना हात घातला. ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाल्याने काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विशेषतः तरुण मतदारांमध्ये काँग्रेसला पुन्हा राजकीय अवकाश मिळू शकतो का, याची चर्चा सुरू झाली. या कार्यक्रमावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपही झाले. पुण्यासारख्या भाजपच्या मजबूत गडात राहुल गांधींच्या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद हा भाजपसाठी लक्ष देण्यासारखा मुद्दा ठरल्याची चर्चा आहे.

त्यामुळे जेन-झी अर्थात तरुण मतदारांमध्ये निर्माण होणारी नाराजी, काँग्रेसचा वाढता संपर्क आणि भाजपविरोधी वातावरणाची शक्यता यावर पक्षाकडून गांभीर्याने विचार केला जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Rahul Gandhi and Devendra Fadnavis
Maharashtra Politics Live Update : सिद्धीविनायक मंदिरातील दानचोरी प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश

राहुल गांधींच्या कार्यक्रमानंतर पुण्यातच भाजपची ‘मेगा’ बैठक

राहुल गांधींच्या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक पुण्यात होत आहे. त्यामुळे या बैठकीच्या ठिकाणाबाबतही राजकीय चर्चा सुरू झाली आहे. पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असण्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपसाठी महत्त्वाचे संघटनात्मक केंद्र मानले जाते. अशा शहरात राज्यभरातील हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकत्र करून पक्षाची पुढील दिशा ठरवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या माध्यमातून पुण्यातील भाजपचा मजबूत जनाधार आणि संघटनात्मक ताकद पुन्हा दाखवण्यासोबतच तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्षाची रणनीती काय असणार, यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

Rahul Gandhi and Devendra Fadnavis
BJP Maharashtra : CM फडणवीस, भाजपचे सगळे मंत्री, आमदार अन् खासदार पुण्याच्या दिशेने... 31 ऑगस्टच्या मुहूर्तावर मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन

रवींद्र चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदातील पहिली पुणे बैठक

रवींद्र चव्हाण यांनी भाजप प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पुण्यात होणारी ही पहिलीच प्रदेश कार्यकारिणी बैठक आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या पुढील संघटनात्मक वाटचालीच्या दृष्टीनेही या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रदेशातील सर्व प्रमुख पदाधिकारी, मंत्री, आमदार, खासदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती अध्यक्ष, मंडल अध्यक्ष यांच्यासह संघटनात्मक रचनेतील प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. म्हणजेच भाजपची संपूर्ण संघटनात्मक यंत्रणाच एका दिवसासाठी पुण्यात एकवटणार आहे.

Rahul Gandhi and Devendra Fadnavis
Maharashtra Politics Live Update: राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, महागाई भत्त्यात 58 वरून 60 टक्क्यांपर्यंत वाढ

फडणवीस तरुणांना साद घालणार

प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘विकसित महाराष्ट्र’च्या संकल्पनेत तरुणांचा सहभाग वाढवण्यावर भर देणार आहेत. तरुणांना पक्षाच्या विविध उपक्रमांशी जोडणे, त्यांच्यापर्यंत सरकारच्या योजनांची माहिती पोहोचवणे आणि संघटनात्मक पातळीवर युवकांचा सहभाग वाढवणे याबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे समजते. याशिवाय बैठकीत दोन महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर होणार असून, आगामी काळातील पक्षाचे कार्यक्रम, संघटनात्मक उपक्रम आणि निवडणुकीच्या दृष्टीने करावयाचे नियोजन यावरही चर्चा होणार आहे.

Rahul Gandhi and Devendra Fadnavis
Maharashtra Political Live Update: सीबीआयची रायगड जिल्ह्यात मोठी कारवाई; केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागात खळबळ

पुण्यातून भाजपची ‘रिचार्ज’ रणनीती?

प्रदेश कार्यकारिणीच्या निमित्ताने राज्यभरातील हजारो पदाधिकारी पुण्यात येत असल्याने ही बैठक भाजपच्या संघटनात्मक यंत्रणेला ‘रिचार्ज’ करण्याची संधी मानली जात आहे. पुण्यात भाजपची राजकीय ताकद मोठी असली तरी राहुल गांधींच्या कार्यक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाने “तरुण मतदारांच्या राजकारणात काही बदलाचे संकेत आहेत का?” हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे काँग्रेसला या कार्यक्रमाचा राजकीय फायदा कितपत मिळतो आणि भाजप त्याला संघटनात्मक पातळीवर कसे उत्तर देतो, हे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे.

पुण्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापणार?

एकीकडे राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमातून काँग्रेसने तरुणांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे भाजपने त्यानंतर पुण्यातच राज्यभरातील संघटनात्मक ताकद एकत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दोन घडामोडींचा थेट संबंध आहे, असे अधिकृतपणे सांगितलेले नसले तरी राजकीय वर्तुळात त्याकडे भाजपच्या ‘अलर्ट मोड’मधील रणनीती म्हणून पाहिले जात आहे.

पुणे हा भाजपचा मजबूत गड कायम राहणार की काँग्रेसला तरुणांच्या माध्यमातून या गडात नव्याने राजकीय अवकाश मिळणार, याची खरी परीक्षा आगामी काळात होणार आहे. त्यामुळे 31 ऑगस्टची भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक आणि त्यातून पक्ष कोणता राजकीय संदेश देतो, याकडे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com