
Pune News : भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे. तसेच ते उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नवीन मंत्रिमंडळात कोण कोण मंत्री असणार याबाबत चर्चा सुरू झाली असून हे मंत्रिमंडळ यंग ब्रिगेडने भरलेला असेल असं देखील बोलले जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नवीन मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात तरुण आमदारांना संधी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक वरिष्ठ नेत्यांना डावलून नवख्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील वरिष्ठांनेत्यांसोबतच काही नवीन चेहरे उद्या मंत्रिपदाची शपथ घेताना दिसू शकतात.
लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात कोण कोण शपथ घेणार यासाठी अनेक दिग्गज नेत्यांची नाव महाराष्ट्रातून चर्चेत होती. मात्र पुणे लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवून विजयी झालेल्या मुरलीधर मोहोळ यांची अनपेक्षितरित्या मंत्रिपदावर वर्णी लागल्याचे पाहायला मिळाल. देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीनंतरच त्यांची वर्णी लागली असल्याचं बोललं जातं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे तरुण नेत्यांना मंत्रिपदाची जबाबदारी देण्यास अधिक सकारात्मक असल्याचं बोललं जातं.
यामुळे पुण्यातील भाजप (BJP) आमदारांमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानसभेत देखील मुरलीधर मोहोळ यांच्याप्रमाणेच देवेंद्र फडणवीस हे पुण्यातून नवीन चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी देऊ शकतात असं बोललं जात आहे. पुणे जिल्ह्यातून चंद्रकांत पाटील त्यांच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रीपद येईल हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र त्याखेरीज इतर भाजपच्या कोणत्या आमदाराच्या राज्य राज्यमंत्रिपदाची माळ पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरी मिसाळ आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातून भीमराव तापकीर हे चौथ्यांदा निवडणूक जिंकले आहेत. दोन्ही सीनियर नेते असले तरी अद्याप त्यांच्या काळात अद्याप यापूर्वी मंत्रिपदाची माळ पडलेली नाही. तर सिद्धार्थ शिरोळे आणि सुनील कांबळे हे दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. सोबतच जिल्ह्यातून राहुल कुल तर पिंपरी चिंचवड मधून महेश लांडगे हे देखील राज्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये आहेत.
त्या सोबतच विधान परिषदेच्या आमदार पदी निवड झालेले योगेश टिळेकर यांची देखील ओबीसी चेहरा म्हणून मंत्रीपदावर वर्णी लागू शकते. त्यामुळे उद्या पुणे जिल्ह्यातील एक कॅबिनेट मंत्री भाजपकडून शपथ घेणार हे जवळपास निश्चित मानलं जात असलं तरी त्यासोबतच दुसरा नवखाचेरा कोण असणार याबाबत पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.