Pune News : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या लातूर येथील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यासह राज्यातील दोन मंत्री आणि अनेक आमदारांनी उपस्थिती लावली होती. यावेळी धनंजय मुंडे यांनी भाषण करताना तुफान फटकेबाजी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तोंड भरून कौतुक देखील केले. मात्र, धनंजय मुंडे भाषण करतेवेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर एकाही नेत्याने धनंजय मुंडेंकडे मान वळूनही पाहिले नाही, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
दरम्यान लातूर येथील केलेल्या भाषणामध्ये धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी फडणवीसांचे तोंड भरून कौतुक केले. धनंजय मुंडे म्हणाले, '2011 मध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष कोणाला करायचे याबाबत चर्चा सुरू होती. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले आणि देवेंद्र फडणवीस यांना राज्याचा अध्यक्ष केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी संघटन वाढवण्यासाठी अवघा महाराष्ट्र पालथा केला. एखाद्या सहकार्याच्या पाठीमागे गोपीनाथ मुंडे हे उभे राहिले आणि जर तो सहकारी कर्तृत्वान असला तर तो मुख्यमंत्री होऊ शकतो, हे गोपीनाथ मुंडे यांच्या मनातील स्वप्न फडणवीसांनी पूर्ण केले.'
आपल्या सर्वांचं स्वप्न होतं की एकदा तरी गोपीनाथ मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व्हावे. मात्र, आपले दुर्दैव होते की ते आपल्यामध्ये जास्त काळ राहू शकले नाहीत. मात्र, गोपीनाथ मुंडे यांचे आशीर्वाद घेऊन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे तीनदा मुख्यमंत्री झाले. आजही गोपीनाथ मुंडे यांचे आशीर्वाद मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थोडसे परळीवर देखील लक्ष द्यावे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली होती.
दरम्यान, धनंजय मुंडे यांचे भाषण झाल्यानंतर फडणवीस आणि धनंजय मुंडे या दोन्ही नेत्यांनी एकमेकाला नमस्कार देखील केले. मात्र, धनंजय मुंडे यांनी केलेला भाषणाचा व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सुषमा अंधारे यांनी काही दावे केले आहेत.
सुषमा अंधारे म्हणाल्या, कठीण समय येता कोण कामास येतो? आमदार धनंजय मुंडेंचे भाषण चालू असताना फडणवीस यांच्यासह व्यासपीठावर असणाऱ्या एकालाही मुंडेंच्या दिशेने साधी मान सुद्धा वळवावी वाटली नाही. पण याच फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावे यासाठी अजितदादांच्या बंडात धनंजय मुंडे आघाडीवर होते, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.