

Pune News : नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने पुणे जिल्ह्यात कारवाईचा बडगा उगारला आहे. खाद्यपदार्थ अधिक आकर्षक दिसावेत म्हणून त्यात घातक कृत्रिम रंग मिसळणाऱ्यांपासून ते प्रतिबंधित गुटखा विक्री आणि गुळामध्ये साखरेची भेसळ करणाऱ्यांचा पर्दाफाश 'एफडीए'ने केला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारल्यापासून धडाकेबाज कारवायांसाठी ओळखले जाणारे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सूचनेनुसार पुणे विभाग पूर्णपणे ॲक्टिव्ह मोडवर आला असून, वेगवेगळ्या धाडींमध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या मोहिमेत खाद्यपदार्थ आकर्षक दिसण्यासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळ करत कृत्रिम रंगांचा बिनदिक्कत वापर केला जात असल्याचे उघड झाले आहे. पुण्याच्या नऱ्हे परिसरातील एका फरसाण दुकानावर 'एफडीए'ने तपासणी केली असता, तेथे तळलेल्या हिरव्या वाटाण्यांमध्ये घातक कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याचे आढळून आले. प्रशासनाने तातडीने कारवाई करत ७ हजार ४८० रुपये किमतीचा ६८ किलो तळलेल्या वाटाण्यांचा साठा जप्त केला.
दुसऱ्या एका मोठ्या कारवाईत प्रशासनाने खेड आणि आंबेगाव तालुक्यात ५ वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई करत तब्बल १९ लाख रुपयांचा विविध अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे. यामध्ये आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील 'साईराज पान अँड टी हाऊस' आणि 'समीक्षा कोल्ड्रिंक जनरल अँड किराणा स्टोअर्स'च्या पाठीमागील गोदामावर छापा टाकण्यात आला. येथे ३० हजार ३९५ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि इतर तत्सम पदार्थांची बेकायदेशीर विक्री होत असल्याचे आढळले. याप्रकरणी संबंधित आरोपींवर भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत मंचर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दौंड तालुक्यातील काही गुऱ्हाळांवर 'एफडीए'ने टाकलेल्या छाप्यात गुळाच्या नावाखाली ग्राहकांची मोठी फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. गुळामध्ये मोठ्या प्रमाणावर साखरेचे मिश्रण करून तो बाजारात विकला जात असल्याचे अधिकाऱ्यांच्या तपासणीत उघड झाले. या कारवाईत प्रशासनाने तब्बल २० टन साखर आणि १६ टन गूळ जप्त केला असून, या जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत १७ लाख ७९ हजार ३५८ रुपये इतकी आहे. यामध्ये सहजपूर येथील प्रथमेश गूळ उद्योग, सात्विक ऑरगॅनिक गूळ उद्योग, खामगाव फाटा येथील साहिल मलिक आणि दौंड येथील सहादत डी. हुसेन या चार गुऱ्हाळांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून यातील अन्न आणि औषध प्रशासनाची यंत्रणा ऍक्टिव्ह मोडमध्ये आली असून पुण्यातील अवैध व्यवसायांवर मुंढे यांनी लक्ष केंद्रित केल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या या धडक कारवायांमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.