

Pune News : अग्निपथ योजनेअंतर्गत चार वर्षांची खडतर सेवा पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या माजी अग्निवीरांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. माजी अग्निवीरांना शासकीय आणि निमशासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी विविध विभागांतील 'गट-क' संवर्गासह अन्य आस्थापनांमध्ये १ हजार पदे निर्माण करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
केंद्र सरकारने २०२२ मध्ये अग्निपथ योजना सुरू केली. या योजनेंतर्गत १७.५ ते २१ वर्षे वयोगटातील तरुणांना भारतीय सशस्त्र दलात चार वर्षांसाठी भरती केले जाते. चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर कामगिरी, शिस्त आणि कौशल्याच्या आधारे काही अग्निवीरांना नियमित सेवेत कायम ठेवले जाते. उर्वरित अग्निवीरांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे.
माजी अग्निवीरांच्या शिस्त, प्रशिक्षण, कौशल्य आणि शारीरिक क्षमतेचा विचार करून त्यांना राज्य शासनाच्या विविध विभागांतील गट-क संवर्गातील पदांवर नियुक्ती देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समिती स्थापन करण्यात आली आहे.
माजी अग्निवीरांसाठी गृह, राज्य उत्पादन शुल्क, वन आणि नगरविकास विभागात संधी उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. गृह विभागात पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, कारागृह पोलीस, रक्षक, अग्निशामक व बचावकर्ता या पदांचा समावेश आहे. गृह रक्षक दलातील हवालदार, कनिष्ठ निदेशक आणि प्रात्यक्षिक निदेशक आदी पदांचाही विचार करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान आणि वाहनचालक, वन विभागातील वनरक्षक, तसेच महापालिका आणि नगरपालिकांमध्ये अग्निशामक विमोचक व अग्निशामक पदांसाठी माजी अग्निवीरांना संधी देण्याचा प्रस्ताव आहे.एकूणच, लष्करी प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांच्या कौशल्याचा सरकारी सेवेत उपयोग करून घेण्याचा राज्य सरकारचा हा निर्णय माजी अग्निवीरांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.