Pune News : पुणे शहरात सध्या दोन मार्गांवर मेट्रो धावत असून भविष्यात शहरामध्ये मेट्रोचे जाळे पसरवण्यात येणार आहे. यातील स्वारगेट ते कात्रज हा भुयारी मेट्रोचा टप्पा सर्वात महत्त्वाचा मानला जातो. या मार्गाला केंद्र सरकारची मान्यता मिळाल्यावर राज्य सरकारच्या वाट्याचा निधी त्वरित उपलब्ध करून देण्यात येईल, तुम्ही स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम लवकर सुरू करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
अजित पवारांनी आज (23 डिसेंबर) पुण्याच्या विविध समस्यांबाबत बैठक घेतली. यावेळी मेट्रो मार्ग आणि नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीबाबत ते बोलत होते. उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सुनील टिंगरे, भीमराव तापकीर, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यावेळी उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अजित पवार म्हणाले, स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गासाठी केंद्र सरकारकडे आवश्यक मान्यतेसाठी पाठपुरावा करण्यात येईल. या मेट्रो मार्गावरील स्थानके अत्याधुनिक सुविधांनी युक्त करावी. रामवाडी येथून विमानतळापर्यंत मेट्रो लाईन सुविधा देण्याचा विचार व्हावा. नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तेथील रस्ते आणि पुलांच्या कामांना तातडीने गती द्यावी. संगमवाडी ते खराडी रस्त्याचे भूसंपादन करण्याची कार्यवाही लवकर करावी. नगररोड परिसरातील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावी. पोलीस विभागाने या भागात वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
या बैठकीत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करताना स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाच्या प्रगतीबाबत माहिती दिली. या मार्गाचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी 'पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डा'कडे विचाराधीन आहे. त्यास मान्यता मिळाल्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाची त्याला मान्यता मिळेल, यानंतर या मार्गावरील काम सुरू करण्यात येईल, असे हर्डीकर यांनी सांगितले.
(Edited By - Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.