Pune News : कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यात जमा आहे. कुलकर्णी यांना खासदारकी देऊन पक्षाने सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून आगामी लोकसभा उमेदवारीची गणिते बदलणार, हे निश्चित आहे. राज्यसभेवर ब्राह्मण तोही कोथरूड भागातील उमेदवार पाठविल्याने आगामी लोकसभेसाठी गैरब्राह्मण उमेदवाराचा विचार भाजपला करावा लागणार आहे. त्यादृष्टीने पूर्व भागातील वडगाव शेरीचे माजी आमदार जगदीश मुळीक आता तिकिटासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. (Loksabha Election 2024)
राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाल्याने पुणे भाजपकडून आता लोकसभेची व्यूहरचना आखली जात आहे. मेधा कुलकर्णी यांच्या रूपाने भाजपने नाराज असलेल्या ब्राह्मण समाजाला पुन्हा आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यसभेला ब्राह्मण समाजाला संधी दिल्याने सामाजिक समतोल साधण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप गैरब्राह्मण उमेदवार देण्याची शक्यता आहे. लोकसभेसाठी पुण्यातून माजी आमदार जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह काही मराठा चेहरे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मेधा कुलकर्णी या कोथरूडच्या असल्यामुळे आता लोकसभेसाठी पक्षाला पूर्व भागाचा विचार करावा लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे पूर्व भागातील वडगाव शेरीचे माजी आमदार जगदीश मुळीक यांचे पारडे जड ठरू शकते, असा अंदाज बांधला जात आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक ४.५ लाख मतदार हे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील आहेत, हे मुळीक पक्षाच्या नजरेत आणून देत आहेत. (Pune BJP News)
वडगाव शेरी मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्या मतदारसंघात जगदीश मुळीक यांनी कमळ फुलविले. मुळीक यांच्या रूपानेच वडगाव शेरीतून भाजपचा पहिला नगरसेवक निवडून आला आहे. त्यानंतर मुळीक यांनी हा मतदारसंघही ताब्यात घेतला, ते स्वतः आमदार झाले. यासोबत त्यांनी सर्वाधिक १४ नगरसेवकही निवडून आणले. मुळीक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपला पहिल्या क्रमांकावर नेले आहे. (Pune Loksabha News)
भाजपची महत्त्वाची पदे आजपर्यंत पुणे शहराच्या पश्चिम आणि मध्य भागातच देण्यात आलेली आहेत. यामध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष, महापौर, पालकमंत्री, राज्यसभा सदस्य, प्रदेशाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रीय उपाध्यक्ष अशा महत्त्वाच्या पदांचा त्यामध्ये समावेश असल्याने आता लोकसभेसाठी वडगाव शेरीचा विचार व्हावा, यासाठी मुळीक कामाला लागले आहेत. कसबा पोटनिवडणुकीत धंगेकर यांनी भाजपचा अनेक वर्षांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. आता त्याच धंगेकर यांची पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारीची चर्चा सुरू आहे. त्यामुळे धंगेकर फॅक्टर निष्प्रभ करण्यासाठी भाजपही पूर्व भागातील उमेदवार देणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, वडगाव शेरी, पुणे कँटोन्मेंट आणि शिवाजीनगर असा परंपरागत काँग्रेस मतदार असलेल्या भागातून भाजपकडून जगदीश मुळीक यांना उमेदवारी देऊन भाजप धंगेकर फॅक्टरला तोडीस तोड उत्तर देऊ शकतो, त्यातून विजयाचे गणित जुळविण्यासाठी पुणे लोकसभेसाठी भाजपकडून मुळीक यांचे नाव निश्चित होईल का? याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.