Pune News : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तयारीत सर्वच पक्ष आघाडीवर आहेत. जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. कोणत्याही क्षणी कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. त्यातच शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पवार गटांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. यातच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केले असून, शिरूर मतदारसंघासाठी अभिनेते नाना पाटेकर यांचे नाव पुढे केले आहे.
पुण्यातील शिरूर हा शरदचंद्र पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही जोरदार तयारी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता शिरूर मतदारसंघातून अजित पवार गटाकडून अभिनेते नाना पाटेकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता असून, चाचपणी सुरू आहे.
यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना विचारणा केली असता. ‘नाना आले तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे’ असं त्यांनी म्हटलं आहे. अभिनेते नाना पाटेकर हे मात्र शिरूर मतदारसंघातून लढण्यास फारसे उत्सुक नसले तरी त्यांच्या या विधानाने चर्चेची पाल चुकचुकत आहे. अद्याप नानांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसल्याचेही फक्त शक्यताच असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. धाराशिवच्या सभेत बोलताना तुळजाभवानी देवीची शपथ घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) खोटं बोलत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीवेळी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाबाबतचा फॉर्म्युला ठरला होता, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यावर संजय शिरसाट म्हणाले, 'अमित शाह यांची शपथ खरी आहे. पण पहिली अडीच वर्षे भाजप आणि नंतरची शिवसेना असं ठरलं होतं, पण त्यांना युती करायचीच नव्हती. शेवटच्या क्षणाला भाजपने हेसुद्धा मान्य केलं की, आधी अडीच वर्षे शिवसेनेला देऊ. हे खोटं आहे म्हणून त्यांनी शपथ घेऊन सांगावं. पण, भाजपसोबत जायचं नाहीच, हेच त्यांनी ठरवलं होतं, असा आरोप त्यांनी या वेळी ठाकरे यांच्यावर केला. तर खासदार संजय राऊत लाचार असून, “लाचार माणसांना मी अनेकदा सिल्व्हर ओकवर जाताना पाहिले आहे. लाचार लोक काश्मीरमध्ये जाऊन राहुल गांधीला मिठ्या मारताना पाहिलं आहे”, अशी टीका त्यांनी या वेळी केली.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.