

Pimpri-Chinchwad News : 'टँकरमधून एलपीजी गॅसची चोरी करताना तो लिक होऊन नऊ सिलिंडरचा स्फोट झाला. पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे भागात रविवारी (८ ऑक्टोबर) रात्री अकरा वाजता ही घटना घडल्याने संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण होते. सुदैवाने रात्री उशिरा हे स्फोट झाल्याने त्यात कोणतीही प्राणहानी झाली नाही.
पण,आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या जेएसपीएम शिक्षण संस्थेच्या कॉलेजजवळ हे स्फोट झाल्याने त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांची खरडपट्टी काढली. तसेच या दुर्घटनेला त्यांना जबाबदार धरीत चार पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या २४ तासांत करण्यात येतील,असा इशारा काल (ता.९) दिला होता.
या स्फोटात सावंतांच्या संस्थेच्या ब्लॉसम शाळेच्या तीन बस जळाल्याने ते संतप्त झाले होते. त्यांनी स्थानिक वाकड पोलिस ठाण्यावरील चार अधिकाऱ्यांच्या लगेच बदल्या करण्यात येतील,असे सांगितले होते.ते खरे ठरले. मात्र, चार नाही,तर सहा पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या नाही, तर थेट त्यांचे निलंबनच पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सावंतांच्या इशाऱ्याला २४ तास व्हायच्या आत आज केले. (Pimpri-Chinchwad Police)
त्यात वाकड पोलिस ठाण्यावरील एक एपीआय आणि चार पोलिस कर्मचारी आहेत. तर शेजारच्या रावेत पोलिस ठाण्यावरील एपीआयलाही या प्रकरणात घरी बसवण्यात आले आहे. मात्र, वाकड पोलिस ठाण्याचे प्रमुख तथा सिनीअर पीआय या दुर्घटनेला नैतिकरित्या जबाबदार असूनही त्यांच्यावर, मात्र ही कारवाई केली गेली नाही. त्यामुळे बळीचा बकरे हे नेहमीच छोटे मासे होतात आणि मोठ्या माशांना अलगद बाजूला ठेवण्यात येते, या चर्चेला या कारवाईने दुजोरा दिला आहे.
ताथवडेतील गॅस गळती, चोरी आणि स्फोटप्रकरणी वाकड पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यात तिघांना अटक केली. त्यातील महिपाल ऊर्फ राजू चौधरी याला यापूर्वी एप्रिल महिन्यात अशाच गॅस चोरीच्या गुन्ह्यात रावेत पोलिसांनी अटक केली होती. (Pune Political News) त्यात तो गेल्या महिन्यात जामीनावर सुटून बाहेर येताच त्याने शेजारच्या वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ताथवड्यात पुन्हा आपला हा गोरखधंदा सुरु केला होता.रावेत पोलिसांनी त्यावेळीच चौधरींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली असती, तर ताथवडेची घटना टळली असती,असा दावा करीत सीपींनी रावेतच्या चौधरींविरुद्धच्या गुन्ह्यातील आयओ एपीआयला सुद्धा निलंबनाचा बडगा दाखवला.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.