Pune Crime News : कुख्यात गुंड शरद मोहोळ यांच्या हत्येनंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत आठ आरोपींना जेरबंद केलं. त्यानंतर ही हत्या 10 वर्षांपूर्वीच्या वैमनस्यातून केली असल्याचा खुलासा आरोपींनी केला असला तरी पोलिस मात्र या प्रकरणाच्या खोलवर जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलिसांकडून या हत्याप्रकरणाची पाळंमुळं खणून काढण्यात येत आहेत. यामध्ये दररोज नवीन वेगवेगळ्या गोष्टींचा उलगडा होत आहे.
पुण्यातील कोथरुडमधील सुतारदरा भागात शुक्रवारी (ता. 5 जानेवारी) दुपारी गुंड शरद मोहोळ याला ठार करण्यात आलं. चार अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर भरदिवसा गोळ्या झाडल्याने एकच खळबळ उडाली. हल्ल्यानंतर मोहोळला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तिथे त्याला मृत घोषित केले गेले. दरम्यान, या घटनेनंतर हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पुणे (Pune) पोलिसांनी तातडीने यंत्रणा कामाला लावली आणि आठ आरोपींना ताब्यातही घेतलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या खुनाचा कट महिनाभरापूर्वीपासूनच शिजत होता. या कटामध्ये प्रामुख्याने शरद मोहोळ यांच्याजवळचे साथीदार कटकारस्थान रचत होते. आपल्या पाठीमागे शिजत असलेल्या कटाचा सुगावा शरद मोहोळ याला नव्हता. दहा वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा बदला घेण्यासाठी हा कट करण्यात येत होता, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
आता पुढील तपासामध्ये आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत आहेत. यानुसार मोहोळ याची हत्या करण्यापूर्वी आरोपींनी मुळशी (Mulshi) मधील जंगलामध्ये महिनाभरापूर्वी गोळीबाराचा सराव केला होता, असे समोर आले आहे. तसेच या हत्येसाठी तीन पिस्तूल आणि दहा काडतुसे त्यांनी खरेदी केली होती. त्यामुळे या हत्येमागे कोणी मोठे सूत्रधार आहेत का? हे पोलिस पडताळून पाहत आहेत.
दुसरीकडे शरद मोहोळ याचा खून करून पळून जाताना पोळेकर याच्या साथीदारांनी एका गँगस्टरचं नाव घेत आम्ही त्याची पोरं असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शरद मोहोळचा खून हा टोळीयुद्धातून किंवा गॅंगवॉरमधून तर झाला नाही ना? अशी शक्यता पोलिसांकडून (Police) विचारात घेण्यात येत आहे. हत्येतील प्रमुख आरोपी मुन्ना पोळेकर याने दहा वर्षांपूर्वीच्या वादातून ही हत्या केल्याचे यापूर्वी सांगितले आहे.
मात्र आता एका गँगस्टरचं नाव समोर आल्याने शरद मोहोळचा गेम नक्की कोणत्या कारणाने झाला, याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. पोलिसांनी अद्याप त्या गँगस्टरचं नाव जाहीर केलेलं नाही.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.