

Pune News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित बारामती दौऱ्याची तारीख अखेर निश्चित झाली आहे. येत्या ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या परिसराला भेट देणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बारामतीतील प्रशासकीय तसेच राजकीय हालचालींना वेग आला आहे.
मोदी यांच्या बारामती दौऱ्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मोदींच्या बारामती भेटीला आता अधिकृत स्वरूप मिळाले आहे.
मोदी यांच्या या भेटीदरम्यान विद्या प्रतिष्ठान परिसरात उभारण्यात आलेल्या ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे विशेष लक्ष लागले आहे. याशिवाय संस्थेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI संस्थेचीही पंतप्रधानांकडून पाहणी होण्याची शक्यता आहे.
विद्या प्रतिष्ठानमध्ये गौतम बुद्धांचा 4 टन वजनाचा पुतळा बसवण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
पुतळ्याभोवती विविध महापुरुष आणि मान्यवरांची पेटिंग लावण्यात येणार आहेत. यामध्ये राजमाता जिजाऊ, राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णा भाऊ साठे, यशवंतराव चव्हाण आणि शारदाबाई पवार यांच्या चित्रांचा समावेश असेल, असे पवार यांनी सांगितले
या कार्यक्रमासाठी राज्यपालांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निमंत्रित करण्यात आले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या प्रमुखांनाही कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.
याशिवाय खासदार पार्थ पवार आणि उद्योगपती सायरस पूनावाला यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या बारामती भेटीची माहिती निश्चित होताच दौऱ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. प्रशासनाच्या पातळीवर आवश्यक नियोजन केले जात असून, संबंधित यंत्रणांकडून तयारीचा आढावा घेतला जात आहे. विद्या प्रतिष्ठान परिसरात होणाऱ्या कार्यक्रमांच्या अनुषंगानेही हालचाली सुरू झाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.