

Mumbai News: राज्यातील तब्बल 1 लाख 20 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या योजनांवर आता सरकारची थेट नजर राहणार आहे. दुष्काळी परिस्थिती, वाढता खर्च आणि आर्थिक व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर 26 प्रमुख योजनांसह 25 महत्त्वाच्या धोरणांचे तिमाही मूल्यमापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचाही समावेश असल्याने या फेरआढाव्याकडे विशेष लक्ष लागले आहे.
योजनांचा पैसा नेमका कुठे आणि कशा पद्धतीने खर्च होतो, त्याचा अपेक्षित परिणाम मिळतोय का आणि लाभ योग्य व्यक्तीपर्यंत वेळेत पोहोचतोय का, याची माहिती आता अधिक तंत्रज्ञानाधारित पद्धतीने तपासली जाणार आहे. त्यासाठी IIM मुंबईच्या माध्यमातून ‘महा-TAC’ (Maha-TAC) तांत्रिक सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून मूल्यमापनाची यंत्रणा उभारण्यात आली आहे. IIM Mumbaiच्या अधिकृत संकेतस्थळावरही महाराष्ट्र Technical Assistance Cell संदर्भातील नोंद उपलब्ध आहे.
राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे. अर्थसंकल्पात महसुली तूट 40,552 कोटी रुपये आणि राजकोषीय तूट सुमारे दीड लाख कोटी रुपये अपेक्षित धरण्यात आली होती. त्यानंतर नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत 97 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या.
दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी मोफत वीज, लाडकी बहीण योजना आणि प्रस्तावित कर्जमाफीसारख्या खर्चिक निर्णयांचा आर्थिक परिणामही सरकारसमोर आहे. राज्याच्या कर्जाचा बोजा सुमारे 11 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे या पार्श्वभूमीवर नमूद करण्यात येत आहे. कर्जावरील व्याजासाठी यंदा सुमारे 70 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याने दुष्काळी उपाययोजनांसाठी आर्थिक तरतूद करताना सरकारसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
याच कारणामुळे योजनांचा केवळ खर्च न पाहता त्यातून प्रत्यक्ष लाभ किती मिळतो, याचे मूल्यमापन करण्यावर भर दिला जाणार आहे. उद्योग, आयटी, इलेक्ट्रिक वाहन, ग्रीन हायड्रोजन, पर्यटन, गृहनिर्माण आणि महिला धोरणासह 25 प्रमुख धोरणांचाही या प्रक्रियेत आढावा घेतला जाणार आहे.
महा-TACच्या माध्यमातून 26 योजनांचे दर तिमाही समांतर मूल्यमापन होईल. खर्चाची गुणवत्ता, उपयोगात न येणाऱ्या मालमत्ता तसेच विविध विभागांमधील संभाव्य गैरव्यवहाराचे मार्ग यांचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवल्या जातील.
या संपूर्ण प्रक्रियेची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाला थेट ‘LIVE Dashboard’च्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार असून तिमाही अहवाल सादर करणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे या फेरआढाव्यातून योजनांच्या अंमलबजावणीत काय बदल होतात, याकडे आता लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.