

Pune News : पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीटंचाईचे संकट गडद होत असतानाच, पाणीपट्टीच्या सुमारे ९४८-९५० कोटी रुपयांच्या थकबाकीवरून महापालिका आणि जलसंपदा (पाटबंधारे) विभाग आमने-सामने उभे ठाकले आहेत. या वादात पुणेकर भरडले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण पुणेकरांचे पाणी कापले जाण्याची शक्यता वाढली आहे.
हा वाद दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिली आहे.
या प्रकरणात जलसंपदा विभागाने थकबाकी तातडीने भरण्याची नोटीस बजावली आहे. पैसे न भरल्यास शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. महापालिका नागरी वापरासाठी पाणी उचलत असताना करारानुसार घरगुती व व्यावसायिक दराने बिल भरते, असे सांगितले जाते.
मात्र, जलसंपदा विभागाकडून औद्योगिक दराने वाढीव बिल आकारले जात असल्याचा गंभीर आरोप आयुक्त राम यांनी केला आहे. तसेच थकबाकीवर १० टक्के दंड आकारल्यामुळे रक्कम अधिक फुगली असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
या वादावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने जल प्राधिकरणाकडे धाव घेतली असून, थेट मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार केली आहे. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी बैठक घेण्याचे आश्वासन दिले असून, लवकरच ही बैठक होईल, अशी अपेक्षा आहे.
मागील काही काळापासून पाणी बिलाच्या थकबाकीवरून जलसंपदा विभाग महापालिकेची अडवणूक करत असल्याचा आरोप आयुक्त नवलकिशोर राम यांनी केला आहे. २४ तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मित्रमंडळ चौकाजवळ पाइपलाइनचे काम करण्यासाठी जलसंपदा विभाग १० कोटी रुपयांची मागणी करीत आहे. त्याशिवाय 'ना हरकत प्रमाणपत्र' दिले जाणार नाही, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले जात आहे. हीच बाब इतर कामांसाठीही केली जात असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.