Pune News, 21 May : काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बदलाचे वारे वाहताना पाहायला मिळत आहेत. काँग्रेस अंतर्गत गटबाजी रोखण्यासाठी आणि पक्षाला नवीन बळ देण्यासाठी नव्याने नियुक्त्या करण्यात येत आहेत. काँग्रेस हायकमंडने पुणे शहराध्यक्षपदाचा तिढा सोडवण्यासाठी थेट शहराचे दोन तुकडे करत दोन शहराध्यक्षांची घोषणा केली आहे.
यामध्ये अवघ्या 5 महिन्यांपूर्वी शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या प्रशांत जगताप यांची पूर्व पुण्याचे शहराध्यक्ष म्हणून कमान सोपवण्यात आली आहे. तर पश्चिम भागाची धुरा माजी आमदार दीप्ती चौधरी यांच्याकडे देण्यात आली आहे. जगताप यांची यापूर्वी काँग्रेसकडून स्थायी समिती सदस्य म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशांत जगताप यांच्या या अनपेक्षित 'लॉटरी'मुळे पुणे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उफाळून येण्याची शक्यता असून, निष्ठावंतांमध्ये तीव्र असंतोष पसरला जाऊ शकतो. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तत्कालीन शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी थेट काँग्रेसमध्ये उडी घेतली होती.
राष्ट्रवादीत असताना प्रभावी आंदोलन, आपल्या आक्रमक आणि वक्तृत्वपूर्ण शैलीने त्यांनी शहराध्यक्षपद एका वेगळ्या उंचीवर नेले होते. तोच आक्रमक चेहरा काँग्रेसला पुण्यात हवा असल्याने हायकमंडने पक्षाचा इतिहास बाजूला ठेवत, नवीन आलेल्या जगतापांवर इतकी मोठी जबाबदारी सोपवली आहे.
जगताप यांनी राष्ट्रवादीत जी कामगिरी त्यांनी बजावली, ती आता काँग्रेसमध्ये करून दाखवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल. परंतु, त्यांच्या या थेट नियुक्तीमुळे पुणे काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. कारण या शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत काँग्रेसचे माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांचे पुत्र अविनाश बागवे यांचे नाव आघाडीवर होते.
वर्षानुवर्षे पक्षासाठी करणाऱ्या निष्ठावंताला बाजूला सारून, ऐन निवडणुकीच्या तोंडावर 'इन्कमिंग' झालेल्या नेत्याला थेट मानाचे पान दिल्यामुळे बागवे गट कमालीचा नाराज झाला असल्याचं सांगितलं जात आहे. पक्षातील जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल्याच्या या भावनेमुळे आता पुणे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि शह-काटशहाचे राजकारण आणखी तीव्र होणार, हे मात्र नक्की.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.