Pune Porsche Crash News : पुणे शहरासह महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये चर्चेत आलेल्या कल्याणीनगर भागातील हिट अॅण्ड रन प्रकरणात दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन तरुण अभियंत्यांना आपला जीव गमवावा लागला. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने कार चालवित हा अपघात केला. हा अल्पवयीन मुलगा पोर्श कार चालवित होता. हा अपघात झाला त्यावेळी या गाडीमध्ये अल्पवयीन मुलासह गाडीचा ड्रायव्हर आणि संबधित मुलाचा मित्र होता. हा दुसरा मुलगा नक्की कोण होता, हे अद्यापही समोर आलेले नाही.
कल्याणीनगर भागात रविवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला होता. हा अल्पवयीन मुलगा दारुच्या नशेत असल्याचे समोर आले होते. 180 ते 200 किलोमीटर प्रतितास या वेगाने ही गाडी चालविली जात होती. ज्या दुचाकीला पाठीमागून धडक देण्यात आली त्यावरून जाणाऱ्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताच्यावेळी पोर्श गाडीतून दोन व्यक्ती बाहेर आल्या होत्या. तो दुसरा मुलगा कोणाचा होता ? असा प्रश्न विचारला जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा प्रश्न विचारला आहे. या अपघाताच्या वेळी अल्पवयीन आरोपीबरोबर आणखी कोणत्या बड्या व्यक्तीचा मुलगा होता का? याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असलेल्या या अल्पवयीन आरोपीला वाचविण्यासाठी पोलिस (Police) तसेच वेगवेगळ्या स्तरावर जोरदार प्रयत्न करण्यात आले. या अल्पवयीन आरोपीला पोलिस स्टेशनमध्ये पिझ्झा, बर्गर अशी व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याचा आरोप केला जात होता. या मुलाला वाचविण्यासाठी अगरवाल बापलेकांनी ड्रायव्हरवर दबाव टाकत त्याला पैशाचे आमिष दाखविले होते. तसेच या ड्रायव्हरला डांबून देखील ठेवल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल आणि त्यांचे वडील सुरेंद्रकुमार अगरवाल यांना अटक करून कोर्टात हजर केले. त्यावेळी या दोघांना 31 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे.
या अपघातबाबत अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरोपीचे ब्लड सॅम्पल ससून रुग्णालयात बदलण्यात आले. याप्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांसह एका शिपायाला पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. या अपघाताच्या घटनेमध्ये पोलिसांची भूमिका सुरुवातीपासूनच संशयास्पद राहिलेली आहे. कोर्टाने (Court) देखील या मुलाचा सुरुवातीच्या काळात जामीन मंजूर केला होता. हा अपघात झाला तेव्हा या अल्पवयीन मुलाबरोबर आणखी एक मुलगा होता. तो मुलगा नक्की कोण आहे, असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी उपस्थित केला आहे. शहरातील पब संस्कृतीच्या विरोधात आमदार रविंद्र धंगेकर यांनी आंदोलन सुरू केले आहे. कल्याणीनगर अपघाताच्या घटनेनंतर 36 पब का पाडले, अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, अशी मागणी देखील पटोले यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.