

Manchar News : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प केंद्र सरकारच्या नोंदीवरील मूळ आराखड्यानुसार राबविण्यात यावा, अन्यथा चर्चेपुरते मर्यादित न राहता जनतेला सोबत घेऊन थेट रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला.
मंचर येथील शरदचंद्र पवार सभागृहात रविवारी झालेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा इशारा देण्यात आला. वळसे पाटील म्हणाले, “या प्रकल्पाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रभावी काम करणाऱ्या खासदारांना सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन ठाम मागणी केली जाईल.
त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे. पण मार्गी न लागल्यास आंदोलन अटळ आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास पुणे-नाशिक प्रवास अवघ्या दोन तासांत शक्य होईल. खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. शेतमालाला थेट बाजारपेठ उपलब्ध होऊन ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळणार असल्याचे वळसे पाटील (Diliprao Walse-patil) यांनी स्पष्ट केले.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खोडद येथील जी.एम.आर.टी. प्रकल्पामुळे रेल्वे मार्ग बदलण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. जी.एम.आर.टी. प्रशासनाशी थेट चर्चा केली असता अँटेनापासून दहा ते 15 किलोमीटर अंतराच्या बाहेरून रेल्वे मार्ग नेण्यास कोणतीही हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुणे–नाशिक रेल्वे मार्ग पश्चिम दिशेनेच नेणे योग्य ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
आढळराव पाटील यांनी लोकसभा व केंद्र सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याची कागदपत्रे व नकाशा सादर करत सांगितले की, मूळ मार्ग पुणे-हडपसर-आळंदी-चाकण-मंचर-नारायणगाव-संगमनेर-सिन्नर-नाशिक रोड असा होता. मात्र सध्या हा मार्ग पुणे-अहिल्यानगर-शिर्डी-पुणतांबा-नाशिक रोड असा बदलल्याची चर्चा आहे. या बदलामुळे खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुका विकासापासून वंचित राहील, अशी तीव्र चिंता त्यांनी व्यक्त केली.
राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याचा निर्धार
दिलीप वळसे पाटील राज्याचे अर्थमंत्री असताना त्यांनी रेल्वे मार्गाचा ५० टक्के खर्च महाराष्ट्र सरकार करेन, अशी हमी दिली होती. त्यानंतरच खऱ्या अर्थाने रेल्वे मार्गाच्या कामाला गती आली. पण गेल्या सात वर्षात मात्र या प्रकल्पाविषयी भाषणबाजी शिवाय काहीच काम झाले नाही. हा मार्ग होण्यासाठी वळसे पाटील व मी कायम जनतेसोबत राहणार आहोत.या बैठकीला विविध पक्षांचे पदाधिकारी, सहकार क्षेत्रातील नेते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजकारण बाजूला ठेवून या प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.