

इंदापूर (पुणे): पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद निवडणुकीप्रमाणे दत्तात्रेय भरणे–पाटील – आप्पासाहेब जगदाळे पुन्हा एकत्र आल्याने गेल्या निवडणुकीप्रमाणे जिल्हा बँकेच्या इंदापूर तालुक्यातील जागा बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदा भाजप मध्ये असलेले प्रदीप गारटकर– प्रवीण माने कोणती भूमिका घेतात यावर निवडणुकीचे भवितव्य असणार आहे. जर निवडणूक झाली तर तालुक्यातील नेत्यासाठी प्रतिष्ठेची आणि चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी इंदापूर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे ठराव आणि प्रतिनिधी निश्चितीच्या प्रक्रियेला महत्त्व प्राप्त झाले आहे. तालुक्यातील सहकारी संस्थांवरील प्रभावासाठी विविध गटांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
इंदापूर तालुक्यातून‘अ’ वर्गातून विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे, तर ‘ब’ वर्गातून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे प्रतिनिधित्व करीत आहेत. आगामी निवडणुकीत त्यांच्याच नावाची चर्चा असून फक्त सहकार कायद्याच्या नव्या नियमावर त्यांच्या उमेदवारीची गणिते अवलंबून असणार आहेत.
भरणेवाडी येथे 11 सप्टेंबर रोजी कृषीमंत्री भरणे, पाटील, जगदाळे यांचे प्रतिनिधीसह सहकार क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी, सहकारी संस्थांचे अध्यक्ष, संचालक तसेच विविध संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत आगामी जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याची भूमिका मांडण्यात आली.
इंदापूरच्या राजकारणात यापूर्वी परस्परविरोधी राजकीय भूमिका घेतलेले दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सध्या एकत्र आले आहेत. या राजकीय समीकरणाची झलक यापूर्वीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पाहायला मिळाली. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही या दोन्ही नेत्यांच्या एकत्रित भूमिकेचा सहकार क्षेत्रातील गणितावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इंदापूरच्या सहकारात भरणे,पाटील,जगदाळे यांचे वर्चस्व असले तरी राजकारणात आता भाजपवासी झालेले प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने यांच्या भूमिकेकडेही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष लक्ष लागले आहे. त्यांचा निर्णय तालुक्यातील सहकाराच्या राजकीय समीकरणांना कोणते वळण देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इंदापूरच्या 'अ' वर्ग मतदारसंघात तालुक्यातील 240 सहकारी सोसायट्यांचे प्रतिनिधी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या सोसायट्यांवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे,जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे वर्चस्व आहे.तर भाजप कोणती भूमिका घेणार यावर निवडणुकीचे गणित अवलंबून असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.