

Pune News, 29 Jul : पुण्यातील व्यावसायिक तरुण केतन अग्रवाल खून प्रकरणात त्याच्या होणाऱ्या पत्नीने त्याला किल्ले लोहगडावरून ढकलून देण्याचा कट रचला होता, हे निष्पन्न झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपी सिया गोयलची चर्चा संपूर्ण देशभरात पोहचली आहे.
सध्या सिया गोयल न्यायालयीन कोठडीत असली तरी या नावाची आणखी एक कथित "सिया"चा कारनामा समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील एका पोलीस पाटलाची ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमध्ये चांगला परतावा मिळेल हे आमिष दाखवत "सिया" नावाच्या कथित तरुणीने ५६ लाख रुपयांचा गंडा घातला आहे.
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एका पोलीस पाटलाची सोशल मीडियावर एका जाहिरातीला भुलून ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ५६.२५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुळशी तालुक्यात कार्यरत असलेले पोलीस पाटील यांनी तक्रार दिली आहे.
नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत संबंधित पोलिस पाटील यांनी टप्प्याटप्प्याने ५६ लाखांची गुंतवणूक केली मात्र, त्यांना एक रुपयाही परत काढता आला नाही. संबंधित प्रकरण स्वतःला "सिया" असे नाव सांगणाऱ्या एका महिलेसह तिच्या अन्य साथीदारांनी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी सिया नावाच्या महिलेसह इतर अज्ञात आरोपींविरुद्ध पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सोशल मीडियाची ओळख पडली महागात
नोव्हेंबर २०२५ मध्ये सुरू झालेल्या या प्रकाराची जाणीव तक्रारदार यांना तीन महिन्यांनी झाली जेव्हा त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची सुरुवात सोशल मिडियावरील एका जाहिरातीपासून झाली. ही जाहिरात प्रसिद्ध ब्रोकरेज कंपनीच्या नावाने असल्याचा भास निर्माण करण्यात आला. त्या जाहिरातीवर क्लिक करताच तक्रारदाराला एका व्हॉट्सॲप वरील गुंतवणुकीशी निगडीत असलेल्या एका ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले.
पोलीस पाटलाला "सिया" ने केला संपर्क
ग्रुपमध्ये सहभागी केल्यानंतर तक्रारदार यांना "सिया" नावाच्या महिलेने संपर्क साधला. त्यांना तांत्रिक गोष्टी सांगून मोबाईलमध्ये एक ट्रेडिंग ॲप ऍप्लिकेशन इंस्टॉल करण्यास सांगितलं. विश्वास संपादन करण्यासाठी ॲपमध्ये सुरुवातीला बनावट नफा दाखवण्यात आला. तसेच, सवलतीच्या दरात आयपीओ शेअर्स मिळतील, असे आमिषही त्यांना दाखवले गेले.
तक्रारदाराने जशी-जशी अधिक रक्कम गुंतवली, तसं त्या ॲपवरील डॅशबोर्डवर पोर्टफोलिओचे मूल्य वाढत असल्याचे त्यांना दिसू लागलं. अखेरीस त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य तब्बल १० कोटी रुपये झाल्याचे ॲपमध्ये दर्शविण्यात आले. आता एवढी रक्कम आपल्याला मिळणार म्हणून तक्रारदार यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला मात्र पैसे परत कुठे मिळत होते? आरोपींनी जमा झालेले कथित पैसे सोडवण्यासाठी आणखी ३० लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून भरण्याची मागणी केली.
पैसे परत मिळत नसल्याने आपण ही रक्कम भरणार नसल्याचे चिडलेल्या तक्रारदाराने आरोपींना सांगितले. पैसे भरणार नाही असं सांगताच आरोपींनी त्यांच्याशी संपर्क तोडला आणि गुंतवलेली रक्कमही परत दिली नाही. यानंतर तक्रारदाराने पौड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.