

Pune News : खराडी, मुंढवा आणि केशवनगर परिसरातील तीव्र वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका करण्यासाठी मुळा-मुठा नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाचे काम अखेर अंतिम टप्प्यात आले आहे. केशवनगरकडील सुमारे ७०० मीटर लांबीच्या जोडरस्त्याचे काम येत्या १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असून, स्वातंत्र्यदिनीच हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती पुणे महापालिकेकडून देण्यात आली आहे.
आयटी कंपन्या, व्यावसायिक संकुले आणि मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पूर्व पुण्यात विशेषतः खराडी, मुंढवा, मगरपट्टा, हडपसर, वाघोली आणि वडगाव शेरी या भागांत रोज सकाळी आणि संध्याकाळी नकोशी ठरणारी वाहतूक कोंडी होते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागाने तीन वर्षांपूर्वी 'सार्वजनिक-खासगी भागीदारी' तत्त्वावर २३ कोटी २० लाख रुपयांच्या या पुलाच्या कामाला मंजुरी दिली होती.
गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पातील पुलाचे मुख्य काम पूर्ण झाले असून, खराडीच्या बाजूने सिग्नल यंत्रणेसह इतर आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. मात्र, केशवनगरच्या बाजूने रेणुकामाता मंदिर ते गोदरेज सोसायटी दरम्यानच्या ७०० मीटर जोडरस्त्याचे काम प्रलंबित असल्याने हा पूल सुरू होऊ शकला नव्हता. सध्या पावसाळ्यामुळे डांबरीकरणाच्या कामात तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. याशिवाय या रस्त्यासाठी आवश्यक असलेली सुमारे २५० मीटर लांबीची संरक्षक भिंत उभारण्याचे कामही सुरू आहे.
"पुलाच्या मार्गातील शंभर झाडे काढण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सध्या पदपथ आणि डांबरीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू असून १५ ऑगस्टपर्यंत ही सर्व कामे पूर्ण करून पूल नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत." अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
प्रकल्पाचा पट (दृष्टिक्षेप):
एकूण प्रकल्प खर्च: ₹२३ कोटी २० लाख (PPP मॉडेल)
पुलाची लांबी व रुंदी: २४६.४० मीटर लांबी, २४ मीटर रुंदी
रचनात्मक वैशिष्ट्ये: दुभाजक (१ मीटर), स्वतंत्र पदपथ (२ मीटर) आणि दोन्ही बाजूंना १ मीटरचे सेवा मार्ग.
थेट फायदा: खराडी ते हडपसर/मगरपट्टा दरम्यानचा प्रवास अधिक जलद होणार असून नगर रस्ता आणि सोलापूर रस्त्यावरील ताण कमी होणार.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.