

Pune Fake Baba: पुण्यातील खराडी भागात स्वतःला देवाचा अवतार भासवून भाविकांचे लैंगिक आणि शारीरिक शोषण करणाऱ्या एका हायप्रोफाईल भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला आहे. मंगळवारी (१६ जून) मध्यरात्री पुणे पोलिसांनी खराडीतील उबाळेनगर भागातील एका गुप्त आश्रमावर रात्रीच्या अंधारात थेट सर्जिकल स्ट्राईक केला. या छाप्यात पोलिसांनी मुख्य भोंदूबाबा राधामोहन मिश्रा, त्याचा सहकारी स्वामी कमल नयन आणि इतर सहा महिलांना अटक केली आहे. या कारवाईनंतर भोंदू मिश्रा आणि त्याच्या टोळीचे अत्यंत अघोरी आणि काळे कारनामे तपासात समोर येत आहेत.
पीडितेला विजेचे झटके आणि मूत्र प्राशन!
आरोपी राधामोहन मिश्राने एका पीडित महिलेला आपण देवाचा अवतार असल्याची भीती दाखवली होती. त्यानंतर तिचे मानसिक, शारीरिक आणि लैंगिक शोषण करण्यात आले. एवढ्यावरच न थांबता या आश्रमात महिलेला बेदम मारहाण करणे, विजेचे झटके देणे आणि जबरदस्तीने मूत्र प्राशन करायला लावणे असे अत्यंत अमानुष आणि अघोरी कृत्य केले जात होते.
बाहेर 'अंकलजी', आत 'चरणामृत'
पोलीस तपासात पीडित महिलांनी दिलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. आरोपी मिश्राने त्याच्या अनुयायांना बाहेरच्या जगात सामान्य व्यक्तीसारखे वागण्याचा कडक सल्ला दिला होता. त्याचेa अनुयायी त्याला सार्वजनिक ठिकाणी संशय येऊ नये म्हणून ‘अंकलजी’ म्हणून संबोधत असत. मात्र, आश्रमाच्या खासगी खोलीत जाताच त्याचे स्वरूप बदलत असे. तिथे अनुयायांना त्याच्या पाया पडणे, चरणामृत घेणे आणि त्याच्या प्रत्येक अघोरी आदेशांचे पालन करणे सक्तीचे होते.
बंगल्याखाली भुयारी मार्ग आणि छुप्या कॅमेऱ्यांची नजर
उबाळेनगर परिसरात या भोंदूबाबाचा सुमारे १२ हजार चौरस फूटांवर पसरलेला एक आलिशान बंगला आहे. पोलिसांच्या संभाव्य कारवाईपासून वाचण्यासाठी त्याने या बंगल्याखाली थेट भुयारी मार्ग तयार करण्याचाही कट रचला होता. याशिवाय, त्याने एका महिलेला तिच्या पतीपासून घटस्फोट घ्यायला लावून विभक्त केले आणि तिच्याच घरी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली. अखेर या छळाला कंटाळून महिलेने ते कॅमेरे फोडले आणि आई-वडिलांकडे आश्रय घेतला.
'खोटे बोलाल तर नरकात जाल' म्हणत ब्लॅकमेलिंग
भोंदू राधामोहन मिश्राने भक्तांच्या मनात नरकाची भीती निर्माण केली होती. 'खोटे बोलाल तर नरकात जाल', असे सांगून तो भाविकांकडून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील आणि मनातील प्रत्येक गुपित गोष्ट लिहून घेत असे. भक्तांनी लिहून दिलेल्या याच गोपनीय गोष्टींचा आणि कमकुवतपणाचा गैरफायदा घेऊन तो नंतर त्यांना धमकावत आणि ब्लॅकमेल करत असल्याचे उघड झाले आहे.
३ IPS अधिकारी आणि १०० हून अधिक पोलिसांचा मध्यरात्री छापा
या हायप्रोफाईल भोंदूचा पर्दाफाश करण्यासाठी पुणे पोलिसांच्या १०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी आणि अप्पर पोलीस आयुक्तांसह ३ आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांनी मंगळवारी मध्यरात्री या गुप्त बंगल्यावर आणि तळघरावर एकत्र छापा टाकला. या छाप्यात पोलिसांच्या हाती मोठे पुरावे लागले असून, तिथून १२ लॅपटॉप, एक टॅब, ११ मोबाईल संच, १९ हार्ड डिस्क आणि अनेक पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले आहेत. या इलेक्ट्रॉनिक उपकरणांव्यतिरिक्त पोलिसांनी घटनास्थळावरून १० जिवंत काडतुसे, साडेसहा लाखांची रोख रक्कम, अनेक डीव्हीडी आणि शेकडो संशयास्पद वैद्यकीय गोळ्या जप्त केल्या आहेत.
सध्या या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी आरोपींवर लैंगिक अत्याचार, कट रचणे, तसेच 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा विरोधी अधिनियम' कायद्यान्वये गुन्हे दाखल केले असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.