Pune News : राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये वाहनांच्या 'फिटनेस प्रमाणपत्र' वितरणात नियम धाब्यावर बसवून मोठा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नियमांना बगल देऊन अपात्र वाहनांना फिटनेस प्रमाणपत्रे वाटल्याचे चौकशीत उघडकीस आल्यानंतर आता परिवहन विभाग ॲक्शन मोडमध्ये आला आहे.
या प्रकरणी पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह राज्यातील ९ प्रमुख आरटीओ कार्यालयांमधील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे थेट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले आहेत.
५ मार्च २०२६ रोजी सह परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष चौकशी समितीच्या अहवालातून आरटीओचा हा 'फिटनेस घोटाळा' चव्हाट्यावर आला आहे.
चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालात अनेक गंभीर त्रुटींवर बोट ठेवण्यात आले आहे. नमुना ३८ 'अ' जारी झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत अंतिम 'नमुना ३८' फिटनेस प्रमाणपत्र देणे बंधनकारक असताना अनेक प्रकरणांत वेळेचे उल्लंघन करत मुदतीनंतर नियमबाह्यपणे प्रमाणपत्रे देण्यात आली.
तसेच इतर राज्यांनी नमुना ३८ 'अ' जारी केल्यास अंतिम प्रमाणपत्र देण्याचा अधिकार केवळ महाराष्ट्रातील मूळ नोंदणी प्राधिकरणाला असतो; मात्र काही परिवहन कार्यालयांनी या अधिकारांचे उल्लंघन करत मूळ प्राधिकरणाची परवानगी न घेताच परस्पर प्रमाणपत्रे बहाल केली. याशिवाय १ जानेवारी २०१९ नंतर उत्पादित काही प्रवाशी वाहनांमध्ये 'व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस' आणि 'स्पीड लिमिट डिव्हाइस' यांसारखी आवश्यक सुरक्षा उपकरणे नसतानाही फिटनेस प्रमाणपत्रे मंजूर करण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.
समितीच्या तपासणीत राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड, पनवेल, वाशी, ठाणे, अंधेरी, वडाळा, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ९ प्रमुख आरटीओ कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळली आहे.
या घोटाळ्यानंतर आरटीओ प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्यातील सर्व खाजगी ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन मध्ये मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती केली जाईल आणि संपूर्ण राज्यभरात एकसमान तसेच कठोर मानक कार्यपद्धती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
.
वाहनांची 'फिटनेस' तपासणी ही केवळ कागदोपत्री प्रक्रिया नाही, तर ती थेट प्रवासी आणि रस्त्यावरील प्रत्येक नागरिकाच्या जिवाशी संबंधित आहे. केवळ पैशांसाठी नियमांना बगल देऊन अपात्र वाहनांना प्रमाणपत्र देण्याचा प्रकार अत्यंत गंभीर असून, चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांची गय केली जाणार नाही. अस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.