

पुणे : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. सोमवार, २० जुलै रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत कोथरुड येथील गांधी स्मारक निधी भवन, इथं त्यांचं पार्थीव अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात आले असून, त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात समाजवादी विचारांचे तरुण घडवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. आयुष्यभर महात्मा गांधींच्या विचारांची कास धरलेले तसंच पुरोगामी वर्तुळात अत्यंत सडेतोड आणि स्पष्टवक्ते म्हणून त्यांची ओळख होती. (Kumar Saptarshi passes away)
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, माजी आमदार, युवक क्रांती दलाचे संस्थापक आणि 'सत्याग्रही' मासिकाचे संपादक अशी डॉ. कुमार सप्तर्षी यांची महाराष्ट्राला ओळख आहे. त्यांच्या निधनामुळं जुन्या पिढीतला एक खंदा समाजवादी कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. डॉ. सप्तर्षी यांना शनिवारी अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं एरंडवणे येथील जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारांपूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.
समाजातील काही अनिष्ठ रुढी, परंपरा यांना झुगारुन देण्याच्या उद्देशानं त्यांनी समाज परिवर्तनाची व्यापक चळवळ उभी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी महात्मा गांधी यांच्या समाजवादी विचारांची त्यांनी आयुष्यभर कास धरली. याकामासाठी युवकांचं व्यापक संघटन उभारण्यासाठी त्यांनी युवक क्रांती दलाची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी हजारो तरुणांना समाजभान दिलं, त्यांच्यामध्ये लोकशाही मुल्ये रुजवली.
गांधी स्मारक निधीच्या माध्यमातून त्यांनी आजवर लोकशाहीवादी, समाज परिवर्तनाचे आणि तरुणांमध्ये संविधानभान घडवण्यासाठी अनेक कार्यक्रम घेतले. ते एक प्रभावी वक्ते देखील होते, त्यांच्या बोलण्यामध्ये एखादा विषय मांडताना मिश्किलता आणि उदाहरणासह विषय पटवून देण्याची हातोटी होती. अत्यंत अभ्यासू, निर्भिड आणि कुठलाही आडपडदा न ठेवता थेटपणे ते आपली भूमिका मांडायचे. त्यामुळं तरुणांमध्ये ते विशेष लोकप्रिय होते. समाजाच्या उत्थानासाठी आयुष्यात शेवटपर्यंत ते रस्त्यावरची लढाई लढत राहिले. गांधी, जयप्रकाश नारायण आणि समाजवादी विचारधारेचा त्यांच्याव जीवनावर विशेष प्रभाव होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.