

Abhijeet Dipke: देशात जेव्हा जेव्हा आंदोलने झाली तेव्हा तेव्हा आंदोलनकर्त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपण आंदोलनाच्या माध्यमातूनच स्वतंत्र झालेलो आहोत. लोकशाही आंदोलनामुळे सुरू आहे. आम्हाला फेक म्हणण्यापेक्षा व्यक्त होत असलेल्या तरुणांचे म्हणणे समजून घ्यावे. मात्र, हे सरकार त्याबाबत चर्चाच करत नाही, अशी माहिती ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके यांनी आज दिली.
‘नीट’, सीबीएसईसह विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणांमुळे देशातील एक कोटीहून अधिक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असून त्यांच्या भविष्याशी खेळ करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात आज (ता. ११) दुपारी ४ वाजल्यापासून शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे देखील आंदोलनात सहभागी होणार असून आंदोलनात पक्षाचा शिक्षण विषयक जाहीरनामा देखील सादर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अँड. असीम सरोदे आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी यावेळी उपस्थित होते.
देशभरातील एक कोटीहून अधिक विद्यार्थ्यांवर परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे अन्याय झाला आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. आम्ही कोणाशी भांडण्यासाठी नव्हे, तर शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहोत. सरकारशी चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. मात्र आमची भूमिका आणि विचार समाजमाध्यमांवरून दडपण्याचा प्रयत्न होत आहे,’’ असा आरोप दिपके यांनी केला.
पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असल्याने या आंदोलनाची सुरुवात येथून होत असल्याचे सांगून दिपके यांनी भविष्यात नागपूर, लखनऊ आणि बेंगळुरू येथेही अशाच प्रकारची आंदोलने केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
डॉ. चौधरी यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविताना सांगितले की, ‘‘हे आंदोलन गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अहिंसक विचारांवर आधारित आहे. लोकशाही वाचवायची असेल तर जनआंदोलनाशिवाय पर्याय नाही. अशा आंदोलनांची विश्वासार्हता निर्माण होणे गरजेचे आहे.’’
अँड. सरोदे यांनीही सरकारने या प्रश्नावर संवेदनशीलतेने प्रतिसाद देण्याची गरज व्यक्त केली. ‘‘परीक्षांमधील गैरव्यवस्थांमुळे विद्यार्थ्यांचे जीव जात असताना सरकार गंभीरपणे प्रतिसाद देताना दिसत नाही. चुका मान्य करून माफी मागण्याची प्रवृत्ती सत्ताधाऱ्यांमध्ये दिसून येत नाही,’’ अशी टीका त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.