

नितीन बारवकर
Shirur News : शिरूर नगर परिषदेतील, राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या सत्ताधारी आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाच नगरसेवकांनी येथे संयुक्त पत्रकार परीषद घेत सत्ताधारी आघाडीवर जोरदार टीकास्त्र डागले. आम्ही केवळ विकासासाठी एकत्र आलो होतो, परंतू नगर परिषदेला कलेक्शन सेंटर बनविलेल्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पदाधिकाऱ्यांमुळे भ्रमनिरास झाला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
रवींद्र ढोबळे, मितेश गादिया, डॉ. सुनिता पोटे, चारूशीला कोळपकर व सोनाली जामदार या नगरसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परीषदेत शिरूर नगर परिषदेचा सर्व कारभार वाघोलीतून चालला असल्याचा आरोप करण्यात आला. आम्ही निवडणूकीत स्वतंत्रपणे लढलो, मात्र गटबंधन करताना, आमचे नेते प्रकाश धारिवाल व माजी आमदार अशोक पवार यांच्यासमोर शहराच्या सर्वसमावेशक विकासाचे धोरण ठरविण्यात आले होते.
कॉमन मिनीमम प्रोग्रामचे सूत्र मांडले. त्यामुळे आम्ही गटबंधन केले. मात्र, पहिल्या सर्वसाधारण सभेपासून कधीही विकासाचे नियोजन करताना आम्हाला विश्वासात घेतले नाही. कुठल्याही मुद्द्यांवर विचारविनीमय केला नाही. कामाची दिशा ठरविताना, टेंडर देताना आम्हाला अंधारात ठेवले. एकत्र असल्याचे केवळ नाटक केले, मात्र वर्षभरात एकदासुद्धा आघाडीची एकत्र मिटींग, चर्चा झाली नाही. चूकीच्या मुद्द्यांना आम्ही कडाडून विरोध केल्यानंतर तर आम्हाला वाळीत टाकले. त्यामुळेच आम्ही आघाडीतून बाहेर पडण्याचा पवित्रा घेतला असल्याचे, ढोबळे यांनी सांगितले.
अद्यापपर्यंत आम्ही गटांत असतानाही भाजपचा पाठिंबा घेताना आम्हाला एका शब्दाने देखील विचारले नाही. आम्ही गटातून बाहेर पडू इच्छित असताना मुक्त देखील करीत नाहीत. पक्षादेशही बजावतात. याबाबत कायदेशीर लढा देणार असून, वेळ पडली तर उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला. शहराच्या विकासासाठी यापुढील काळात नगर परिषदेत प्रखर विरोधकाची भूमिका बजावणार असून त्यासाठी लोकशाही मार्गाने चूकीच्या कामांबाबत आवाज उठविला जाईल, असे त्यांनी सांगितले.
पाणीपुरवठ्यासारख्या संवेदनशील विषयातही सत्ताधारी व प्रशासन अजिबात गंभीर नसल्याचा आरोप, डॉ. पोटे यांनी केला. चुकीच्या कामांना सुरवातीपासून विरोध करताना मी पाणीपुरवठ्याबाबत अनेक सुधारणा सुचविल्या. त्रूटींबाबत माहिती मागितली, यंत्रणा दुरूस्ती, पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन याबाबत दोनशेहून अधिकवेळा पत्रव्यवहार केला. निधीवाटपाबाबत लेखी पत्राद्वारे माहिती मागितली. स्मरणपत्रेही दिली. मात्र माझ्या पत्रांना केराची टोपली दाखवली. माहितीच्या अधिकारात माहिती मागितली, ती सुद्धा अद्याप दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. नगर परिषदेतील सत्ताधारी मंडळींना फक्त सत्तेचे पडले आहे. सर्वसामान्य जनतेचे त्यांना काहीही देणेघेणे राहिले नसल्याचा आरोप त्यांनी केला. रिल्सवर आधारीत काम असलेल्या सत्ताधाऱ्यांची रिॲलिटी कळल्यानेच गटातून बाहेर पडण्याची भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले. कोळपकर व जामदार यांनीही गेल्या वर्षभरात आपल्या वॉर्डात सूचविलेली कुठलीही कामे झाली नसल्याचा आरोप केला.
माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे म्हणाले, माजी सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांनी एकोप्याने कामकाज करण्याचा सल्ला दिल्याने आम्ही एकत्र आलो होतो. त्यांच्या सूचनेवरूनच मितेश गादिया यांना उपनगराध्यक्षपदी संधी मिळाली होती. मात्र, चुकीच्या पद्धतीने त्यांच्याविरूद्ध अविश्वास ठराव आणून नेत्याचा विश्वासघात केला आहे. तोंडावर गोड बोलणारांनी नेत्याच्या पाठीत खंजीर खूपसला आहे. सत्ताधाऱ्यांच्या बगलबच्च्यांनाच कामे मिळतात आणि त्यातून त्यांना टक्केवारीचा मलिदा मिळतो.
माझ्यावर अविश्वास आणताना नमूद केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. उभ्या आयुष्यात मी कधीही मनमानी केली नाही. उलट सत्ताधाऱ्यांच्या मनमानीविरोधात आवाज उठविला. आराध्य दैवत रामलिंगाला स्मरून मी कुठलेही असभ्य वर्तन केले नसल्याचे शपथेवर सांगतो. सत्ताधाऱ्यांनीच विकासाला खीळ बसविली असून, त्यांची दादागिरी व गुंडशाही वाढत आहे. त्यांनी केलेले आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून बाजूला होईन, माजी उपनगराध्यक्ष मितेश गादिया म्हणाले.
नगरसेविका तथा सभापती पाणीपुरवठा समिती डॉ. सुनिता पोटे यांनी सांगितले की, नगर परिषदेच्या एसटीपी प्लॅण्टच्या कामासाठी दोन कोटींचा निधी आला होता, मात्र त्या निधीचे काय झाले माहित नाही. सध्या हा प्लॅण्ट केवळ तीस टक्के कार्यान्वीत आहे. शहराचे सांडपाणी या प्लॅण्टमधून थेट घोडनदी पात्रात सोडले जाते. माझ्या विभागातील कामाची देखील मला माहिती मिळत नाही. केवळ नात्यागोत्यांना कंत्राटे दिली जातात. सत्ताधाऱ्यांकडून धमकावले जाते.
नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांनी सांगितले की, नगर परिषदेत एक वर्ष आमच्या सोबत सत्तेत असलेल्यांना आताच सगळे चुकीचे चालल्याचा साक्षात्कार झाला असून, त्यांचे बोलणे हास्यास्पद असल्याचे जाणकार शिरूरकरांना ज्ञात आहे. अंतर्गत कलहातून त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून, ते नैराश्यातून तथ्यहीन बोलत आहेत. आम्ही सर्वांना सोबत घेऊन, एकमेकांशी विचारविनीमय व सल्लामसलत करूनच नगर परिषदेचा कारभार पारदर्शीपणे चालवित असून ऑनलाईन व्यवहार असल्याने भ्रष्टाचाराचा विषयच उद्भवत नाही. विकासकामांत सर्वांना समान न्याय दिला आहे. नगर परिषदेतील प्रत्येक कामाचा ठेका ऑनलाइन पद्धतीने दिला जातो, त्यामुळे त्यात बगलच्च्यांना किंवा नात्यागोत्यांना कामे कशी देता येतील. प्रकाशभाऊ धारिवाल यांच्या नावाचा ते चुकीच्या पद्धतीने वापर करीत असून, त्यांनीच भाऊंच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.
शहरातील सर्व प्रभागांतील विकासकामांचे नियोजन प्रशासन पातळीवर करताना सर्वसमावेशक धोरण ठरवून उपलब्ध निधीतून समान कामे करण्याचेच प्रशासनाचे धोरण असते. त्यात आदूजाभाव करता येत नाही. काही कामांचा प्राधान्यक्रम ठरवून ती कामे मार्गी लावली जातात. याचा अर्थ एखाद्या प्रभागाला किंवा लोकप्रतिनिधीला डावलले असे म्हणता येत नाही. नगर परिषदेचा निधी मूळातच मर्यादीत असून, राज्य व केंद्र शासनाच्या निधी उपलब्धतेनूसार कामांचे नियोजन केले जात आहे, असे मुख्याधिकरी प्रीतम पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.