NCP Sharad Pawar: शरद पवारांचे 5 नगरसेवक सत्ताधारी आघाडीतून बाहेर! शिरूर नगर परिषदेत सत्तासंघर्ष

Shirur Nagar Parishad: शिरूर नगर परिषदेत सत्तासंघर्ष; राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाच नगरसेवकांनी सत्ताधारी गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता.
NCP spokesperson appointments cancelled
NCP spokesperson appointments cancelledSarkarnama
Published on
Updated on

नितीन बारवकर

शिरूर (जि.पुणे) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आठ व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाच सदस्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या 'शिरूर नगर परिषद गट' या सत्ताधारी आघाडीला अंतर्गत राजकीय कलहातून तडे गेले आहे. उपनगराध्यक्षांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाच नगरसेवकांनी सत्ताधारी गटातून बाहेर पडण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे नगर परिषदेतील सत्तेची समीकरणे झपाट्याने बदलली असून, सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसला हादरा बसला आहे.

डिसेंबर २०२५ ला झालेल्या शिरूर नगर परिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे नगराध्यक्षपदी निवडून आल्या होत्या. तर भाजपचे सर्वाधिक ११ नगरसेवक निवडून आले होते. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सात तर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाच नगरसेवक निवडून आले होते. एका अपक्षानेही या निवडणूकीत बाजी मारली होती. १२ हे बहुमताचे संख्याबळ कुठल्याच पक्षाला गाठता न आल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती.

या स्थितीत एका अपक्षासह दोन्ही राष्ट्रवादी च्या नगरसेवकांनी एकत्र येत १४ जानेवारी २०२६ ला जिल्हाधिकाऱ्यांकडे 'शिरूर नगर परिषद गट' नावाने स्वतंत्र गटाची नोंदणी करून सत्ता स्थापन केली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने सर्वाधिक सदस्य निवडून येऊनही भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले होते.

या सत्तास्थापनेनंतर उपनगराध्यक्षपदासह पाणीपुरवठा समितीचे सभापतीपद व महिला व बालकल्याण समितीचे उपसभापतीपद राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांकडे गेले होते. केवळ राजकीय तडजोडीतून जुळवून घेतलेल्या या गटातील दोन्ही पक्षांचे सदस्य मात्र मनाने एक न झाल्याने किरकोळ कुरबूरी, हेवेदावे, आरोप - प्रत्यारोप आणि राजकीय चढाओढी चालूच होत्या. अखेर आज ही अंतर्गत खदखद उफाळून आली.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडून आलेले उपनगराध्यक्ष मितेश प्रदीप गादिया, माजी नगराध्यक्ष रवींद्र उर्फ शाम मनोहर ढोबळे, पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनिता संतोष पोटे, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती स्वप्नाली योगेश जामदार, सदस्या चारूशिला गणेश कोळपकर या नगरसेवकांनी आज नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांना पत्र दिले असून, सत्ताधारी शिरूर नगर परिषद गट या गटातून मुक्त करण्याची मागणी केली आहे.

NCP spokesperson appointments cancelled
Modi Cabinet Reshuffle: मोदी मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? वैष्णवांना बढती, गडकरींचे खाते बदलणार; 17 नव्या चेहऱ्यांची एन्ट्री

पक्षाचे नेते व स्थानिक पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेतून सत्ताधारी गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे ढोबळे यांनी सांगितले. सत्ताधारी गटातून आम्हाला मुक्त करावे, अशा आशयाचे पत्र नगराध्यक्षा पाचर्णे यांना दिले असून, सत्ताधारी गटात आम्हाला सापत्नभावाची वागणूक दिली जात असल्याने तसेच विकासकामांमध्ये दूजाभाव केला जात असल्याने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांनी सत्तेतून बाहेर पडताना अनेक गंभीर आरोप केले आहेत. नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभा किंवा विशेष सभांतून आमच्या मताची किंवा विचारांची दखल घेतली गेली नाही, या सभांतील विषय कुठल्याही चर्चा किंवा विचारविनीमयाशिवाय सभेमध्ये घेतले, त्याबाबत विचारणा करूनही कुठलेही समाधानकारक उत्तर दिले गेले नाही. विशेष सभेपूर्वी किंवा नंतर आमच्या कुठल्याही मतांचा विचार झाला नाही. दूजाभावाची वागणूक देताना दैनंदीन कामकाजामध्येसुद्धा आमच्या गटातील सदस्यांना डावलण्याची भूमिका वारंवार घेतल्याचे निदर्शनास आले असल्याचे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

NCP spokesperson appointments cancelled
Maval Tahsildar News: मावळच्या 'महसूल' खुर्चीवरून युतीत जुंपली! सुनील शेळके की भाजप नेत्यांची मर्जी चालणार?

आमच्या पक्षाच्या सदस्यांनी सत्तास्थापनेसाठी पाठिंबा दिला असतानाही कुठल्याही विकासप्रक्रियेत समाविष्ट न केल्याने नगर परिषदेच्या कारभारामध्ये पारदर्शकतेचा अभाव दिसून येऊन भ्रष्टाचाराला पोषक वातावरण तयार झाले असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. गटनेत्यांना व पक्षप्रमुखांना या बाबतची स्पष्ट कल्पना वेळोवेळी देऊनही काहीही फरक पडत नसल्याने आम्ही सत्ताधारी गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे ढोबळे यांनी सांगितले.

सत्तेची समिकरणे बदलण्याची शक्यता

नगर परिषदेतील सत्ताधारी शिरूर नगर परिषद गटातून बाहेर पडण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाच सदस्यांनी घेतल्याने सत्ताधारी गटाकडील बहुमत संपुष्टात येण्याची शक्यता असून, धोरणात्मक निर्णय घेताना मोठ्या अडचणी उभ्या राहणार आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ११ नगरसेवक निवडून आलेल्या भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक एकत्र येण्याची दाट चिन्हे आहेत. तसे झाल्यास उपनगराध्यक्षपदासह विविध विषय समित्यांवरही याच गटाचे प्राबल्य राहून सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हातून सत्तेच्या चाव्या हिसकाविल्या जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com