

Pune News: पुणे शहरातील वाहतूक कोंडी आणि वाढत्या प्रदूषणाची समस्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने विविध उपाय योजना केल्या जातात. आता वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी थेट पुणेकरांच्या खिशात हात घालण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध तज्ज्ञ संस्थांचे प्रतिनिधी, संबंधित सरकारी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि वाहतूक नियोजन क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले होते. या बैठकीत पुणेकरांच्या खिशाला कात्री लावण्याबाबत विचार विनिमय झाला.
त्यानुसार शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिवाजीनगर आणि मध्यवर्ती पेठ परिसरात ‘लो एमिशन झोन’ (कमी प्रदूषण क्षेत्र) लागू करण्याबाबत प्रशासनाकडून विचारमंथन सुरू आहे. या क्षेत्रात जास्त प्रदूषण करणाऱ्या वाहनांना प्रवेशासाठी विशेष प्रदूषण शुल्क लावण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
त्यानुसार गाड्या पुणे शहरातील वायू प्रदूषणाचे प्रमुख कारण आहेत. २०२० च्या अभ्यासानुसार, महानगरातील PM2.5 प्रदूषणापैकी ४६ टक्के वाहनांमुळे होते, जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. २०२३-२४ च्या सर्वेक्षणात पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे ७० टक्के वाहने BS-4 किंवा जुनी असल्याचे दिसले. BS-6 मानकांमुळे उत्सर्जन कमी होत असले तरी जुनी वाहने प्रदूषण वाढवत राहत आहेत.
अभ्यासानुसार 2000 पूर्वी नोंदणी झालेली 1 कार जवळपास 11 आधुनिक ‘भारत स्टेज-6’ कारइतके प्रदूषण करते, तर जुन्या तंत्रज्ञानाच्या 1 ट्रकमुळे सुमारे 14 आधुनिक ट्रकांइतके प्रदूषण होते. ‘भारत स्टेज-6’ डिझेल कारमधून होणारे सूक्ष्म कणांचे उत्सर्जन ‘भारत स्टेज-3’ डिझेल कारपेक्षा सुमारे 90 टक्के कमी असल्याचेही नमूद करण्यात आले.
शिवाजीनगर आणि पेठ परिसरात ‘लो एमिशन झोन’ लागू करण्याचा मनोमन विचार सुरू आहे. या क्षेत्रात ‘भारत स्टेज-३’ किंवा त्यापेक्षा जुने इंजिन तंत्रज्ञान असलेल्या वाहनांना प्रवेशासाठी दररोज प्रदूषण शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे. हे शुल्क आगाऊ भरले नसेल तर नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
पुढील टप्प्यात ही अट ‘भारत स्टेज-४’ वाहनांनाही लागू करण्याचा आणि लो एमिशन झोनचा विस्तार पुण्यातील इतर भागांमध्ये करण्याचा प्रशासन विचार करत आहे. या संपूर्ण व्यवस्थेची अंमलबजावणी कॅमेऱ्यांच्या मदतीने करण्याचा प्रस्तावही बैठकीत मांडला गेला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.