

Someshwar Sugar Factory : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच कारखान्याच्या वार्षिक अहवालातील एका फोटोवरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांचा फोटो कारखान्याच्या अहवालातून वगळल्याची चर्चा सुरू झाली असून, यावरून शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी कारखाना प्रशासन आणि विद्यमान नेतृत्वावर निशाणा साधला आहे.
सोमेश्वर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी आज होत आहे. त्यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या अहवालात पार्थ पवार यांचा फोटो नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, कारखान्याची पंचवार्षिक निवडणूकही तोंडावर आली आहे. त्यामुळे अहवालातील फोटोचा मुद्दा केवळ औपचारिकतेपुरता न राहता त्याला राजकीय संदर्भ प्राप्त झाला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना सतीश काकडे यांनी कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षांवर थेट टीका केली. “कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षांना पार्थ पवारांचा फोटो अहवालात घेण्याची लाज वाटत असेल किंवा पार्थ पवारांना ते आपल्या लेव्हलचे समजत नसतील,” असा टोला काकडे यांनी लगावला.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी तब्बल ६०१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर ५५६ अर्ज पात्र ठरले, तर माघारीनंतर ५१४ उमेदवार रिंगणात आहेत. कारखान्याच्या २१ जागांसाठी एवढ्या मोठ्या संख्येने इच्छुक मैदानात असल्याने विविध राजकीय गटांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक इच्छुक असल्याची चर्चा असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भाजप आणि शिवसेनेकडूनही पॅनेल उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. अशा परिस्थितीत कारखान्याच्या अधिकृत अहवालातून पार्थ पवारांचा फोटो नसल्याचा मुद्दा समोर आल्याने निवडणुकीच्या राजकारणात त्याची चर्चा रंगली आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर अहवालातील फोटोवरून सुरू झालेला वाद आता सभेतही चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे. एकीकडे २१ जागांसाठी शेकडो इच्छुकांमधून पॅनेलची बांधणी करण्याचे आव्हान प्रमुख नेत्यांसमोर आहे, तर दुसरीकडे कारखान्याच्या अहवालातील फोटोवरून नेतृत्वाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर सोमेश्वरमध्ये उमेदवारी, पॅनेलची बांधणी आणि बंडखोरीचे गणित आधीच तापलेले असताना आता पार्थ पवारांच्या फोटोचा मुद्दा कोणता राजकीय रंग घेतो, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.