Someshwar Election: 'सोमेश्वर'च्या बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न फसला! तावरे-शिवतारेंचा विरोध, युगेंद्र पवारांचं ‘शेतकरी पॅनेल’ही मैदानात

Someshwar Sugar Factory election : सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पॅनेलची तयारी सुरू झाली आहे. तावरे-शिवतारेंच्या विरोधामुळे बिनविरोधचा प्रयत्न फसला असून ६०१ अर्ज दाखल झाले आहेत.
Someshwar Sugar Factory
Someshwar Sugar Factory ElectionSarkarnama
Published on
Updated on

Someshwar Sugar Factory election : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने बारामतीच्या राजकारणाला पुन्हा एकदा उकळी आली आहे. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांनीच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षासमोर आव्हान उभे केले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षानेही निवडणुकीत उतरण्याची तयारी केल्याने ‘सोमेश्वर’ची निवडणूक आता बहुरंगी होण्याची चिन्हे आहेत.

सोमेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न होता. मात्र, माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील पराभवाची सल मनात असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेच्या निवडणुकीतील पराभवाचे राजकीय उट्टे काढण्यासाठी शिवसेना (शिंदे)चे आमदार विजय शिवतारे यांनीही सोमेश्वरच्या आखाड्यात उतरण्याची तयारी केली आहे.

त्यामुळे एकीकडे महायुतीतील मित्रपक्षांची नाराजी, दुसरीकडे शरद पवार गटाचे आव्हान आणि त्यात अजित पवारांच्या अनुपस्थितीत पहिलीच मोठी सहकारी निवडणूक, अशा तिहेरी कोंडीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष सापडल्याचे चित्र आहे.

‘माळेगाव’ची सल अजूनही कायम

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही पक्षांच्या राजकारणावर परिणाम करणारा ठरला. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे हे एकमेव भाजपचे उमेदवार विजयी झाले. मात्र, माळेगाव गटात भाजपचे नेते रंजन तावरे यांचा झालेला पराभव पक्षासाठी धक्कादायक मानला गेला.

दुसरीकडे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवूनही शरद पवार गटाला एकही जागा मिळाली नाही. या पराभवाची सल कायम असून, आता सोमेश्वरच्या माध्यमातून त्याची परतफेड करण्याची तयारी या गटाने सुरू केली आहे. युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘शेतकरी पॅनेल’ उभे करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

Someshwar Sugar Factory
UGC Approval News : कॉलेजला जाण्याची गरज नाही! घरबसल्या बि. कॉम, एमसीए करा; यूजीसीची मोठी घोषणा

शिवतारेंचा ‘सोमेश्वर’मध्ये थेट शिरकाव

फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषद ही आमदार विजय शिवतारे यांच्या राजकीय प्रतिष्ठेचा विषय बनली होती. त्यांच्या आग्रहामुळे ही दोन्ही गावे पुणे महापालिकेच्या हद्दीतून वगळून स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्यात आली. मात्र, पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने ३२ पैकी १९ जागा जिंकत सत्ता मिळविली.

या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांच्यात आघाडी होती. शिवसेनेला आठ, तर भाजपला पाच जागा मिळाल्या. अपेक्षित सत्ता न मिळाल्याने शिवतारे यांच्या राजकीय गणिताला धक्का बसला. आता सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी लक्ष घातले असून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Someshwar Sugar Factory
शिंदे की ठाकरे? शिवसेना निकालानंतर बदलू शकतात महाराष्ट्रातील 5 समीकरणे

अजितदादांच्या अनुपस्थितीत ‘राष्ट्रवादी’ची पहिली मोठी परीक्षा

अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेली सोमेश्वर कारखान्याची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षासाठी केवळ सहकारी संस्थेची निवडणूक राहिलेली नाही. बारामतीच्या राजकारणातील पक्षाची पकड, महायुतीतील मित्रपक्षांशी असलेले संबंध आणि अजित पवारांच्या अनुपस्थितीत पक्षाचे नेतृत्व किती प्रभावीपणे निवडणूक हाताळते, याचीही परीक्षा या निवडणुकीत होणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी मेळावा घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. अजित पवारांनी उभे केलेले राजकीय आणि सहकार क्षेत्रातील वर्चस्व कायम ठेवण्याचे मोठे आव्हान आता सुनेत्रा पवार यांच्यासमोर आहे.

६०१ अर्जांनी वाढवली धाकधूक

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून तब्बल ६०१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची छाननी १५ सप्टेंबरला होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरनंतरच प्रत्यक्षात किती पॅनेल आणि किती उमेदवार मैदानात राहणार, याचे चित्र स्पष्ट होईल. मात्र, सध्याच्या राजकीय हालचाली पाहता निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास मावळल्याचे चित्र आहे.

एकंदरीत, सोमेश्वरच्या साखर कारखान्याच्या निवडणुकीत यंदा ऊसापेक्षा राजकारणाचीच मोळी मोठी होण्याची चिन्हे आहेत. ३० सप्टेंबरनंतर या राजकीय संघर्षाचा खरा चेहरा समोर येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com