Pune Metro News: दक्षिण पुण्याची वाहतुक कोंडीतून सुटका होणार! मेट्रो कात्रजच्या घाटातून शिवापुरपर्यंत धावणार
Pune News: पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणणारा स्वारगेट-कात्रज मेट्रोमार्ग पुढे शिवापूर टोलनाका परिसरातून प्रस्तावित रिंगरोडपर्यंत वाढविण्याच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावास पुणे महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने बैठकीत मंजुरी दिली. अंतिम निर्णयासाठी हा प्रस्ताव मुख्य सभेकडे पाठविण्यात आला आहे.
कात्रज घाट मार्ग हा पुणे शहराला सातारा, कोल्हापूर आणि दक्षिण महाराष्ट्राशी जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा रस्ता आहे. या मार्गावर दररोज प्रचंड प्रमाणात वाहनांची वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. विशेषतः कात्रज आणि शिवापूर टोलनाका परिसरात ही समस्या अत्यंत गंभीर स्वरूपाची झाली आहे.
या संदर्भात नगरसेविका वर्षा तापकीर आणि तेजश्री बदक यांनी शहर सुधारणा समितीसमोर मांडला आहे. स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाचा विस्तार शिवापूर टोलनाका ते प्रस्तावित रिंग रोडपर्यंत करण्यात आल्यास या भागातील नागरिकांना जलद, सुरक्षित आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होईल. यामुळे खासगी वाहनांचा वापर कमी होऊन वाहतूक कोंडीतून सुटका मिळेल आणि प्रदूषणही लक्षणीय प्रमाणात कमी होईल, असे या प्रस्तावात सुचवले आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून, तो पुढील प्रक्रियेसाठी मुख्य सभेकडे शिफारस करण्यात आला आहे.
दक्षिण पुणे, कात्रज परिसर तसेच शिवापूर टोलनाका आणि प्रस्तावित रिंगरोडलगत झपाट्याने वाढणारी वसाहत व वाढता वाहतूक ताण लक्षात घेता मेट्रो विस्तार अत्यंत आवश्यक आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना जलद, सुरक्षित व पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे.
प्रस्तावित रिंगरोडशी मेट्रोचे प्रभावी कनेक्टिव्हिटी निर्माण झाल्यास शहरातील वाहतूक वितरण अधिक संतुलित होईल आणि भविष्यातील शहरी नियोजनाला मोठी चालना मिळेल, असे शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षा स्मिता वस्ते यांनी नमूद केले.
या विस्तारामुळे कात्रज परिसराला आणि, शिवापूर टोलनाका परिसर तसेच रिंगरोडलगतच्या विकसित होत असलेल्या भागांना मोठा फायदा होणार असून खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

