

पिंपरी : महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी बदल्यांचा सपाटा लावला आहे. त्यातही आघाडी सरकार आणि त्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणलेल्या अधिकाऱ्यांची, तर मुदतपूर्व उचलबांगडी करण्यात आली. मात्र, या बदल्या अविचाराने आणि घाईघाईने केल्याने त्यातील अनेक वादग्रस्त ठरल्या. तर, बदली झालेल्या काही अधिकाऱ्यांना नियुक्त्याच देण्यात आल्या नाहीत. त्यातील चार आयएएस सध्याही काम न करता पगार घेत आहेत.
काम न करताही या चार आयएएस अधिकाऱ्यांना पगार देण्यास आम आदमी पार्टीने (आप) तीव्र आक्षेप घेतला आहे. ही चूक राज्य सरकारची व त्यातही या बदल्या करणारे व त्यांना नियुक्ती देणारे मुख्यमंत्री (सध्या एकनाथ शिंदे) आणि मुख्य सचिवांची (मनोज सौनिक) असल्याने त्यांच्याकडून या चार अधिकाऱ्यांच्या वेतनाचे पैसे वसूल करण्यात यावेत, अशी मागणी आपचे प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला `सरकारनामा`शी बोलताना केली.
विनाकाम वेतन देण्यावर यापूर्वी ॲाडिट आक्षेप आले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे हा मुद्दा विरोधी बाकावरील आमदाराकडून अधिवेशनात उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे.
वैभव वाघमारे या २०१९ च्या बॅचच्या आयएएस अधिकाऱ्याला २७ एप्रिलपासून नेमणूक देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना काम न करताही गेल्या दोन महिन्यांपासून पगार दिला जात आहे. २००२ च्या बॅचचे ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ.प्रवीण गेडाम यांना ३१ मे पासून नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे ते सुद्धा दोन महिन्यांपासून काम न करताही वेतन घेत आहेत.
डॉ.सोनिया सेठी (१९९४ ची बॅच) या दोन जूनपासून नेमणुकीच्या प्रतिक्षेत आहेत. तर, रुचेश जयवंशी यांनाही बदलीनंतर ८ जूनपासून नियुक्ती देण्यात आलेली नाही. एरव्ही जेथे म्हणजे ज्या विभागात नेमणूक झाली असती तेथून या अधिकाऱ्यांचा पगार निघाला असता. मात्र, ती न झाल्याने ही चार खास पदे सामान्य प्रशासन विभागात निर्माण करून तेथून त्यांचे वेतन सध्या दिले जात आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या बदल्यांच्या धडाक्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचीही टर्म पूर्ण होण्याच्या आतच उचलबांगडी झाली. आयएएस अधिकाऱ्यांच्या जोडीने आयपीएस आणि राज्य शासनाच्या सेवेतीलही पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांच्य़ाही धडाधड बदल्या नव्या सरकारने केल्या.
मात्र, त्या पूर्ण विचाराअंती न केल्याने काही लगेच रद्द करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. काहींत दुरुस्ती केली गेली. काहींचे बदलीचे ठिकाण बदलण्यात आले. तर, काहींना नियुक्तीच देण्यात आली नाही. त्यात वरील चार सनदी अधिकारी आहेत. मुदत पूर्ण न होता बदली झालेल्या काही अधिकाऱ्यांनी (उदा. पिंपरी महापालिकेच्या उपायुक्त स्मिता झगडे) `मॅट`मध्ये धाव घेतली आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.