

माळेगाव (पुणे): राज्यातील राजकारणाला अंतर्मुख करणाऱ्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाची छाया आज बारामती येथील मतमोजणी केंद्रावर स्पष्टपणे जाणवली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निकालाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना यश मिळाले असले, तरी या विजयावर आनंदाचा जल्लोष नव्हता, तर अजितदादांच्या आठवणींनी गहिवरलेले मन होते.
बारामती मतमोजणी केंद्रातून विजयी उमेदवार बाहेर पडत असताना नेहमीचा उत्साह, गुलाल, फटाके किंवा घोषणाबाजी कुठेही दिसली नाही. उलट डोळ्यांत अश्रू, हातात हात, आणि मनात एकच पोकळी अजितदादांची अनुपस्थिती. “हा विजय आमचा नसून दादांचा आहे,” अशी भावना शामल वाबळे यांच्यासह अनेक विजयी उमेदवारांच्या शब्दांतून उमटत होती.
बारामती हा अजित पवार यांचा अनेक वर्षे राजकीय गड मानला जातो. इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या जडणघडणीत त्यांचा वाटा होता. त्यामुळेच आजचा विजय साजरा करण्याऐवजी अनेकांनी तो शांतपणे स्वीकारला. मतमोजणी केंद्रावर उपस्थित असलेले कार्यकर्ते, कर्मचारी आणि पत्रकार यांच्यातही एक प्रकारची स्तब्धता होती. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी उपस्थित असलेले अप्पर पोलीस निरीक्षक गणेश बिरादार यांच्यासह पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी हे देखील शांतपणे बसून होते.
जिल्हा परिषद सुपा (ता. बारामती) गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पल्लवी प्रमोद खेत्रे यांनी विजय मिळवला. निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यांत आनंदापेक्षा अश्रू अधिक होते. “दादांनी दिलेल्या संस्कारांचा हा कौल आहे,” असे त्या म्हणाल्या. बारामती पंचायत समिती सुपा गणातून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप पुरस्कृत सौ. उज्वला पोपट खैरे, कार्हाटी गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सौ. शामल सुनील वाबळे, तर गुणवडी गणातून शुभांगी सुनील आगवणे यांनी विजय मिळवला.
जिल्हा परिषद गुणवडी गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शुभांगी कचेर शिंदे यांनाही मतदारांनी कौल दिला. शिर्सुफळ गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भाजप पुरस्कृत अनिकेत प्रभाकर गावडे हे विजयी झाले. पणदरे गटाचे विजयी उमेदवार मंगेश जगताप यांच्यासह अनेकांनी एकमुखाने भावना व्यक्त केल्या की, “आजचा विजय साजरा करण्याचा नाही, तर अजितदादांच्या आठवणी जपण्याचा दिवस आहे.” अनेकांनी अजित पवार यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत विजय स्वीकारला.
अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये मतमोजणी झाली. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे विजयी उमेदवार मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना डोळ्यातील अश्रू अन् एकमेकांना सावरणे, अशा पद्धतीने त्यांनी आपल्या विजयाबाबतच्या भावना व्यक्त केल्या.
बारामतीच्या राजकीय इतिहासात ही मतमोजणी आनंदाच्या जल्लोषासाठी नव्हे, तर भावनांच्या ओलाव्यासाठी लक्षात राहील. सत्ता, आकडे आणि पदे क्षणिक असतात; पण नेतृत्व, नातेसंबंध आणि माणुसकी कायम राहते, हे आजच्या शोकाकुल वातावरणातून प्रकर्षाने दिसून आले, असे मत बारामती पंचायत समितीचे विजयी उमेदवार किरण तावरे (सांगवी) यांनी व्यक्त केले
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.