Balasaheb Thackeray Birth Anniversary : व्यंगचित्रकार ते शिवसेनाप्रमुख

Shivsena pramukh Balasaheb Thackeray : मार्मिक ते शिवसेना आणि प्रबोधनकारांचं 'बाळ'
Balasaheb Thackeray
Balasaheb ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Bal Thackeray Jayanti 2024 :

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे... म्हणजे अन्यायाने पेटून उठलेला मराठी मातीतला धगधगता अंगार... स्पष्ट विचार, रोखठोक शैलीचा झंझावात, राजकीय व्यंगावर आसूड ओढणारा व्यंगचित्रकार. करारी नेतृत्व आणि तितकेच हळवे व्यक्तिमत्व, दूरदर्शी विचार आणि पारदर्शी भूमिका ही बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray) ओळख. म्हणून त्यावेळी विरोधकही ज्यांचं नाव मोठ्या अदबीनं घेत असत, यातून बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व स्पष्ट होतं.

अशा या महाराष्ट्राच्या वाघाचा आज जन्मदिन. 23 जानेवारी 1926 रोजी जन्म झालेला हा वाघ आज आपल्यात असता तर 98 वर्षांचा असता. आणि हो वाघ कधीच म्हातारा होत नसतो. बाळासाहेब ठाकरेंचं अगदी तसंच होतं. आजही राज्याच्या राजकारण सतत बाळासाहेबांचं नाव घेतलं जातं आणि त्यांचीच उदाहरणे दिली जाताच.

Balasaheb Thackeray
Bal Thackeray: 'मार्मिक'पणा हा बाळासाहेबांच्या स्वभावातच मुरलेला...; इंदिराजी, पवारांनीही त्यांचं कौतुकच केलं...

'मुंबई आपली आहे आपली. इकडे आवाजही आपलाच हवा. तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा, पण न्याय मिळालाच पाहिजे' ही होती बाळासाहेबांची ठाकरी शैली.

मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी उठलेला झंझावाती आवाज होता शिवसेनेचा (Shiv sena) आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा. तो काळ मराठी माणसांची अस्मिता पणाला लावणार होता. मराठी माणूस मुंबईतून हद्दपार तर होणार नाही ना? अशी भीती निर्माण झाली होती. अशावेळी बाळासाहेब ठाकरे मराठी माणसांच्या मागे ठामपणे उभे राहिले.

'एकजुटीने राहा... जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्रही (Maharashtra) टिकेल...' अशी त्यांनी केलेली गगनभेदी गर्जना महाराष्ट्रात घुमली आणि भारताच्या कानावर आदळली. याच कानमंत्राने मरगळलेल्या जनतेला नवसंजीवनी मिळाली आणि पुढे 19 जून 1966 रोजी शिवसेना जन्माला आली.

बाळ केशव ठाकरे म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी झाला. त्यांच्या आईचं नाव रमाबाई. वडील केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे. ते समाजसुधारक होते. समाजसुधारणेचं बाळकडू जन्मतःच लाभल्यानं अन्यायाविरोधात पेटून उठणं बाळासाहेबांच्या रक्तात भिनलं होतं.

कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी व्यंगचित्रकार (Cartoonist) म्हणून काम केलं. मुंबईतील फ्री प्रेस जर्नल (Free Press Journal) या इंग्रजी दैनिकात त्यांनी व्यंगचित्रकार म्हणून सुरुवात केली. त्यानंतर राजकारणातील चुकीच्या आघातांवर रेषांच्या माध्यमातून प्रहार करणाऱ्या बाळासाहेबांनी 1960 मध्ये 'मार्मिक' हे स्वतःचं साप्ताहिक सुरू केलं. विखुरलेल्या मराठी माणसाला शिवसेनेच्या रूपात भक्कम नेतृत्व मिळवून दिलं. शिवसेनेच्या जन्माची बीजं मार्मिक साप्ताहिकामध्ये रुजली होती. मराठी माणसाचे प्रश्न मार्मिकमधून सतत अधोरेखित केले गेले. त्यासाठी 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या तत्त्वाचा अंगिकार केला.

Balasaheb Thackeray
Bal Thackeray Birth Anniversary : बिनधास्त बाळासाहेब : भाजपाला गोचीडाची उपमा आणि युती तोडण्याची धमकी

बेळगाव-कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून 1969 मध्ये शिवसेनेनं आंदोलन उभारलं आणि याच आंदोलनानं शिवसेनेची पर्यायानं बाळासाहेबांच्या प्रचंड ताकदीची कल्पना देशाला आली. 30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला मेळावा झाला.

या मेळाव्यात प्रबोधनकार ठाकरे यांनी 'हा बाळ मी आज तुम्हाला दिला' असे उद्गार काढले. त्यानंतर बाळासाहेब आणि शिवसेना हे समीकरण बनलं ते कायमचं. बाळासाहेबांनी शिवसेनेची पाळमूळ गावागावात रुजवली. गावखेड्यांत शिवसेना शाखा दिसू लागल्या. या मेळाव्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवतीर्थावरील मराठी माणसांची प्रचंड गर्दी, असं समीकरण तयार झालं ते कायमचंच! सोबतच 'दसऱ्याला बाळासाहेबांच्या विचाराचं सोनं' हे समीकरणही रुढ झालं.

दसरा मेळाव्यात शिवतीर्थावरून बाळासाहेब शिवसैनिकांना, महाराष्ट्राला काय संदेश देतात याकडे जनतेसह सर्व राजकारण्यांचं लक्ष लागलेलं असायचं. विरोधकांच्या कानपिचक्या घेणारी, ठाकरी शैलीतील त्यांची भाषणं चांगलीच गाजली. 'मार्मिक' असो किंवा शिवसेनेचं 'सामना' हे मुखपत्र असो, त्यांच्या लेखणीची आणि शब्दांची धार कायमच अन्यायाला भेदणारी ठरली.

Balasaheb Thackeray
Bal Thackeray Birth Anniversary: बाळासाहेबांपुढं मस्तक झुकवण्यातसुद्धा थरार होता...

बाळासाहेबांना सत्तेचा मोह कधीच नव्हता, त्यामुळेच महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आल्यानंतरही मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर ते कधी विराजमान झाले नाहीत. ते लढेल ते केवळ जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी. त्यांनी अनेक नेते घडवले. गरिबांना घरे, एक रुपयात झुणका-भाकर वृद्धाश्रम, बॉम्बेचे मुंबई असे नामकरण, अशा अनेक योजनांमागे बाळासाहेबच होते. परप्रांतीयांसह व्हॅलेंटाईन डे सारख्या पाश्चिमात्य सेलिब्रेशनला त्यांनी कडाडून विरोध केला. ठाकरी शैलीत आंदोलनं उभारली. बाबरी ढाचा पडला तेव्हा कोणीच जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं. तेव्हा 'सामना' या मुखपत्रातून बाळासाहेबांनी ठामपणे सांगितलं होतं की तो ढाचा माझ्या शिवसैनिकांनी पाडला असेल तर मला त्यांचा अभिमान आहे.

Balasaheb Thackeray
Balasaheb Thackeray Birth Anniversary : घराणेशाहीच्या आरोपानंतर बाळासाहेबांनी थेट राजीनामा दिला अन् दुसऱ्याच दिवशी...

परप्रांतियांना विरोध, संयुक्त महाराष्ट्रासाठी आंदोलन, बाबरी ढाचा पाडण्यासाठीचा पुढाकार यामुळे शिवसेनेवर संकुचित, जातीयवादी, फॅसिस्ट अशी टीका झाली. बाळासाहेबांची तुलना हिटलर, हुकूमशहाशी करण्यात आली, मात्र बाळासाहेब विचारांवर ठाम राहिले त्यांच्या याच करारी बाण्याचा, निस्वार्थी समाजकारणाचा विरोधकही आदर करायचे. जनतेचा, शिवसैनिकांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. नितांत श्रद्धा होती. त्यांच्या एका शब्दावर शिवसैनिक जीवाची बाजी लावायला तयार असत. बाळासाहेब ठाकरे हे अफलातून रसायन होतं.

शिवसेनेची ओळख कायमच आक्रमक कार्यकर्त्यांचा पक्ष राहिली आहे. शिवसेनेची आंदोलनं, शिवसेनेचे बंद ते बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं इत्यादींमधून शिवसेनेची आक्रमक वाढत गेली. आपल्या भारदस्त वक्तृत्वानं बाळासाहेब जनमानसावर गारुड टाकत. त्यांच्या भाषणाला मिळणारा प्रतिसाद पाहता खूपच कमी राजकीय नेत्यांना हे सुख अनुभवायला मिळाल्याचं दिसतं. भाषणात बाळासाहेब ठाकरे मराठी भाषेचा पुरेपूर वापर करत. हास्यविनोद, व्यंग, उपहास, टीका, मिश्लिलता, टोमणे, वाक्यप्रचारांचा समावेश त्यांच्या भाषणात बेमालूम असे.

Balasaheb Thackeray
Balasaheb Thackeray Birthday : बाळासाहेबांनी नाशिकवर प्रेम केले अन् या गोदानगरीनेही शिवसेनेला भरभरून दिले...

शिवसेनेच्या या ढाण्या वाघानं 17 नोव्हेंबर 2012 रोजी मुंबईतील त्यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी शेवटचा श्वास घेतला आणि एक झंझावाती वादळ शांत झालं. शिवाजी पार्क मैदानात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र आजही त्यांनी न्यायासाठी चेतवलेला आवाज, 'जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाहीत' हा महाराष्ट्राच्या जनतेला दिलेला विचार महाराष्ट्र्भर घुमतोय आणि कायम घुमतच राहणार..!

Balasaheb Thackeray
Balasaheb Thackeray Birth Anniversary : ...अन् बाळासाहेबांनी शरद पवारांसह भागीदारीत सुरू केलेला व्यवसाय गुंडाळावा लागला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com