Santosh Deshmukh Case: राजकारणातील नैतिकतेचे धिंडवडे काढल्याची नोंद महायुती सरकारच्या नावे इतिहासात होणार

Santosh Deshmukh murder case : गंभीर आरोप झालेला एक नेता, एक मंत्री पक्षासाठी, सरकारसाठी इतका महत्वाचा आहे का की त्यासाठी राजकारणातील नैतिकतेला तिलांजली द्यावी लागली? मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी त्यांच्या पक्षाने, मुख्यमंत्र्यांनी इतकी वाट का पाहिली?
Dhananjay Munde Resignation
Dhananjay Munde ResignationSarkarnama
Published on
Updated on

Santosh Deshmukh Death Case : धनंजय मुंडे यांचा विश्वासू सहकारी वाल्मिक कराड याच्या गुंडांकडून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूरपणे करण्यात आली. या गुंडांनी मारहाण करताना फोटो, व्हिडीओ काढले होते. एसआय़टीने पुरावे म्हणून हे फोटो दोषारोपपत्रासोबत जोडले आहेत. ते फोटो माध्यमांनी दाखवल्यानंतर महाराष्ट्र पुन्हा सुन्न झाला. त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला.

गंभीर आरोप झालेला एक नेता, एक मंत्री पक्षासाठी, सरकारसाठी इतका महत्वाचा आहे का की त्यासाठी राजकारणातील नैतिकतेला तिलांजली द्यावी लागली? मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी त्यांच्या पक्षाने, मुख्यमंत्र्यांनी इतकी वाट का पाहिली? लोक म्हणतात तसे तुमचेही हात तर अडकलेले नाहीत ना? विलंब लावला म्हणजे अब्रू वाचेल, लोक विसरतील, असे वाटले असेल का राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना? पण तसे अजिबात झालेले नाही. उलट, राजकारणातील नैतिकतेचे जाहीर धिंडवडे काढल्याबद्दल महायुती सरकारची इतिहासात नोंद होणार आहे.

मस्साजोग (ता. केज, जि. बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने दोषारोपपत्र दाखल केले आहे. धनंजय मुंडे यांचा विश्वासू सहकारी वाल्मिक कराडचे कार्यकर्ते, गुंडांनी संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करताना फोटो काढले, चित्रीकरण केले होते. ते फोटो, चित्रीकरण एसआयटीने पुरावे म्हणून सादर केले आहेत.

सोमवारी हे फोटो माध्यमांनी दाखवले. ते पाहून संवेदनशील माणसांच्या अंगावर काटा आला आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा सुन्न झाला. त्यानंतर कुठे राजीनामा देण्याची आणि घेण्याची बुद्धी धनंजय मुंडे, अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना सुचली. राजकीय हितसंबंधांच्या समोर समाज किती हतबल आहे, याची जाणीव अनेकांना झाली. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नैतिकतेचा दुष्काळ पडला आहे.

आपल्या विरोधात खट्ट झाले, आरोप झाले तर राजीनामा देणारे दिग्गज मुख्यमंत्री, मंत्री, नेते महाराष्ट्राने पाहिले आहेत. याच राज्यात राजकारणातील नैतिकतेचे धिंडवडे निघाले आहेत. महायुती सरकारकडे प्रचंड बहुमत आहे, ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू असली तरी नैतिकतेचा निकष लावला तर हे सरकार सपशेल अपयशी ठरलेले आहे. मस्साजोग (ता. केज, जि. बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत क्रूरपणे केली. मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी हे कारण पुरेसे होते, नैतिकतेची चाड असती तर...!

Dhananjay Munde Resignation
Munde vs Dhas : पंकजाताईंना बीड, राज्य, देशाचे प्रश्न विचारू नका, त्यांची कॅटेगरी इंटरनॅशनल; सुरेश धसांचा संताप

मी त्यांना कोणकोणत्या प्रकरणांतून वाचवले आहे.... काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा असे म्हणतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. गेल्या 5-6 वर्षांत राज्यात पक्षफुटीची लागण झाली होती. पक्षातून बाहेर पडल्यानंतर वरिष्ठांवर टीका करण्याची, आरोप करण्याचीही पद्धत रूढ झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसलाही फुटीची लागण झाली. अजितदादा पवार यांच्यासोबत गेलेले धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर आरोप केले होते. त्यावर माध्यमांनी पवार यांना प्रश्न विचारले. त्यावेळी शरद पवार म्हणाले होते, त्यांची नाव घेण्याचीही माझी इच्छा नाही. त्यांना अनेक प्रकरणांतून वाचवले आहे. शरद पवार हे धनंजय मुंडे यांचे नावही का घेऊ इच्छित नव्हते, याची चांगलीच जाणीव आज महाराष्ट्राला झाली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्र गोंधळात, संभ्रमात पडला आहे. धनंजय मुंडे यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे, त्यांच्या निकटवर्तीय, विश्वासू कार्यकर्त्यांच्या क्रौर्याने महाराष्ट्राचे समाजमन हादरून गेले आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. मस्साजोग येथील एका पवनचक्की कंपनीकडून खंडणी उकळण्यासाठी आलेल्या मुंडेंच्या पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षारक्षकाला मारहाण केली होती.

Dhananjay Munde Resignation
Dhananjay Munde Resignation: मोठी बातमी: महायुतीची पहिली 'विकेट' पडली! धनंजय मुंडे यांचा राजीनामा

कंपनीचा हा सुरक्षारक्षक मस्साजोगचा होता. त्यामुळे सरपंच संतोष देशमुख मध्ये पडले. ते खंडणीच्या आड आले आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू कार्यकर्ता, परळीचा माजी नगराध्यक्ष वाल्मिक कराड याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून केला. खून करण्याती पद्धत अत्यंत क्रूर होती. त्याचे वर्णन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सभागृहात केले. ते एकूण महाराष्ट्र अंतर्बाह्य हादरून गेला. असे कसे होऊ शकते, असा प्रश्न सर्वांनाच पडला.

काका गोपीनाथ मुंडे यांचे बोट धरून धनंजय मुंडे यांनी राजकारणात पाऊल ठेवले. काही वर्षांनी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांनाच हिसका दाखवत बंडखोरी केली. त्यांचे राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजाताई मुंडे या मंत्री असताना विरोधी पक्षनेते असलेल्या धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा आरोप करत राजकारणातून त्यांचे बस्तान उठवण्याचा प्रयत्न केला. काही कारणांमुळे आता पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांची दिलजमाई झालेली आहे.

धनंजय मुंडे यांच्या वैयक्तिक आयुष्यातही गोंधळ, घोटाळे आहेतच. करुणा शर्मा-मुंडे याच त्यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा निकाल न्यायालयाने नुकताच दिला आहे. निवडणुकीच्या वेळी शपथपत्रात धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांचा उल्लेख केलेला नव्हता. करुणा यांच्या भगिणी रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांनी आपल्यावर दुष्कर्म केल्याचा आरोप केला होता. रेणू शर्मा यांनी ते प्रकरण नंतर मागे घेतले.

करुणा मुंडे यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने विविध आरोप केले. वाल्मिक कराडने धनंजय मुंडे आणि बीडच्या जिल्ह्याधिकाऱ्यांसमोर आपल्याला जबर मारहाण केली होती, असाही त्यांचा आरोप आहे. या आहेत बाहेर आलेल्या गोष्टी. परळी तालुक्यात वाल्मिक कराड आणि त्याच्या गुंडांची किती टोकाची दहशत आहे, हे आमदार धस यांनी उघड केले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील विविध शहरांत मोर्चे काढण्यात आले. त्यात धस यांनी मुंडे, कराड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे कारनामे जाहीरपणे सांगितले आहेत. दुर्दैव असे, की धनंजय मुंडे यांच्या बचावासाठी त्यांचा पक्षही पुढे आला. काही लोक, समाजही पुढे आले. आपण माणूस म्हणून संपलो आहोत, गट-तटांमध्ये अत्यंत वाईट पद्धतीने विभागलो गेलो आहोत, हे त्यामुळे सिद्ध झाले आहे.

महाविकास आघाडीचे सरकार पाडून महायुती सत्तेवर आली. या सरकारमध्ये धनंजय मुंडे हे काही काळ कृषिमंत्री होती. कृषिमंत्री असताना त्यांनी विविध घोटाळे केल्याचे आरोप झाले. घोटाळ्यांना विरोध करणाऱ्या काही प्रामाणिक आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. पिकविमा घोटाळा तर राज्यभर गाजत आहे. परळी तालुक्यातील लोकांना अन्य जिल्ह्यांतील सरकारी जमिनीवरही पिकविमा उतरवून रक्कम कशी हडप केली, याचे पुरावे आमदार धस यांनी सभागृहात दाखवले आहेत.

धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी आणखी किती कारणे हवी होती? मात्र महायुतीत अंतर्गत विरोधाभास आहेत. धनंजय मुंडे प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसला शक्य तितके बदनाम करून त्या पक्षाला हालचाल करू द्यायची नाही, असे धोरण भाजपचे होते. बदनामी झाली तर राष्ट्रवादीचीच होईल, असा होरा मुख्यमंत्री फडणवीस यांचा असावा किंवा मुंडे यांचा राजीनामा घेतल्यास ओबीसी समाज नराज होईल, असे त्यांना वाटत असावे. दोषी सिद्ध झाल्याशिवाय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली.

Dhananjay Munde Resignation
Swargate Rape Case: स्वारगेट बलात्कार पीडितीनं वसंत मोरेंना सांगितली आपबिती; म्हणाली, तात्या मला वाचवा!

प्रचंड बहुमत मिळालेले सरकार इतक्या लवकर लोकांच्या मनातून उतरेल, असे कोणालाही वाटले नव्हते. संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या अत्यंत संवेदनशील अशा मुद्द्यावर पक्षप्रमुख अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टाळाटाळ करणारी निव्वळ राजकीय भूमिका घेतील, असेही कोणाला वाटले नव्हते. राष्ट्रवादीच बदनाम होईल, असे फडणवीस यांना वाटले असेल तर ते चूक ठरले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे भूमिका घेण्यासारखे काय आहे? अमुक जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद हवे, अशा अत्यंत महत्वाच्या प्रश्नामध्ये तो पक्ष गुंतून पडलेला आहे.

धनंजय मुंडे यांनी आधीच राजीनामा दिला असता तर.... अब्रू वाचली असती पक्षाची आणि सरकारचीही. पण तसे झाले नाही. एसआयटीने पुरावे म्हणून जोडलेली संतोष देशमुख यांना मारहाण करतानाची छायाचित्रे समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. मुंडे यांच्यासह त्यांच्या पक्षाला आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना अखेर बुद्धी सुचली आणि या सर्वांनी महाराष्ट्रावर जणू उपकारच केले! तोपर्यंत राजकारणातील नैतिकतेचे धिंडवडे निघाल आणि त्यासाठी या सरकारची इतिहासात नक्कीच नोंद होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com