Pune News : संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 22 वर्ष पूर्ण झाली असतानाच बुधवारी नवीन संसदभवनातही एक खळबळजनक घटना घडली.दोन संशयित तरुणानी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीमधून सभागृहात उडी मारत गोंधळ घातल्याचा प्रकार घडला.त्यामुळे सभागृहात सर्वच सदस्यांच्या मनात काही क्षणांसाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, काही सदस्यांनी हिंमत दाखवनू सभागृहातील बाकड्यांवर गोंधळ घालणाऱ्या आरोपींना पकडले आणि सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिले आहे. मात्र, या प्रकारामुळे संसदेच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये त्रुटी असल्याचे समोर आले असून या अनुभवातून सुरक्षा व्यवस्थेमध्ये आणखी काटेकोरपणा आणणे गरजेचे असल्याचे मत माजी पोलीस महासंचालक प्रवीण दिक्षीत यांनी 'सरकारनामा'शी व्यक्त केले आहे.
नवीन संसदेच्या लोकसभा सभागृहात दोन तरुणांनी केलेल्या घुसखोरीच्या प्रकारानंतर संसदेच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान येथील सुरक्षा व्यवस्थेचे स्वरुप आणि त्यामधील त्रुटींची शक्यता याबाबत मत व्यक्त करताना माजी पोलीस महासंचालक प्रवीण दिक्षीत म्हणाले, संसदेची सुरक्षा व्यवस्थाही संसदीय सुरक्षा समितीच्या माध्यमातून लोकसभा अध्यक्षांच्या अखत्यारितच काम करत असतात. (Parliament Security Breach)
लोकसभा अध्यक्षांच्या निगरानीखालीच सभागृहात काही विशेष सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली जाते. या सुरक्षा रक्षकांचे काम हे फक्त लोकसभेची सुरक्षा पाहणे हेच असते. तसेच संसदेत सुरक्षेच्यादृष्टीने सभागृहाच्या आतील आणि बाहेरील बाजूस सुरक्षा रक्षकांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असतो. यामध्ये दिल्ली पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल, दिल्ली अग्निशमन सेवा, इंटेलिजन्स ब्युरो, SPG आणि NSG संसदेच्या सुरक्षा या सर्वांचा समावेश होतो असेही दिक्षीत यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभेचे कामकाज चालू असताना जे व्हिजिटर्स येत असतात, ते कोणत्यातरी खासदाराच्या शिफारशीनेच प्रेक्षक गॅलरीमध्ये येऊ शकतात. त्यासाठी त्यांना पासेस दिले जातात अन्यथा कोणाला प्रवेश दिला जात नाही. दरम्यान बुधवारी जो काही लोकसभेच्या दालनात जो प्रकार घडला, त्यामध्ये दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारल्या, त्यानंतर एकाने बाकड्यावर गोंधळ घालत बुटातून स्मोक गॅसच्या कांड्या काढल्या आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सुरक्षेतील त्रुटीमुळेंच घडल्याचे स्पष्ट होत असल्याचेही ते म्हणाले. यासाठी सुरक्षा येणाऱ्या प्रत्येक व्हिजिटर्सची संपूर्ण तपासणी करणे गरजेचे आहे. (Loksabha Winter Session)
प्रवीण दिक्षीत (Pravin Dixit) म्हणाले, संसदेत येणाऱ्या प्रत्येक व्हिजिटर्सची तपासणी सुरक्षा यंत्रणाकडून केली जाते. मात्र,ज्या प्रमाणे विमानतळावर प्रवाशांना बूट काढायला लावून फ्रेस्किंग केले जाते जाते. त्याच प्रमाणे संसदेमध्ये येणाऱ्या व्हिसिटर्सची देखील तपासणी करणे गरजेचे आहे. कदाचित त्या पद्धतीने तपासणी केली जात नसल्याचे माहिती असल्यानेच आजच्या घुसखोरांनी त्या त्रुटीचा फायदा घेतला आणि बुटातून स्मोक कँडल आत आणले असण्याची शक्यता आहे. ही सुरक्षा व्यवस्थेची त्रुटी दूर करणे गरजेचे असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.(Pravin Dixit)
सुरक्षा व्यवस्थेकडून बुट काढून तपासणी न केल्यानेच असा प्रकार घडला असल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधताना दिक्षीत म्हणाले की, बुधवारी घडलेल्या घटनेच्या अनुभवातून आता सुरक्षा व्यवस्था आपल्या तपासणी पद्धतीमध्ये बदल करेल. तसेच जे आरोपी सापडले आहेत. त्यावर लोकसभा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली पार्लिमेट्री सुरक्षा समिती चौकशी करून योग्य कारवाई करतील, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, लोकसभेच्या दालनात बुधवारी घडलेल्या या घटनेमुळे नवीन संसदभवनाच्या इमारतीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने त्रुटी असल्याचे समोर आले आहे. प्रेक्षक गॅलरीला सुरक्षा जाळी नाही का? त्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था चोख नव्हती का? तसेच ज्या पद्धतीने विमानतळावर सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी केली जाते तशी तपासणी का केली जात नाही, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.