
Mumbai, 13 February : राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा असताना दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर ठाकरे गट आणि पवारांची राष्ट्रवादी आमने सामने आलेली असतानाच दिल्लीत ठाकरेंच्या तीन खासदारांनी शिंदे गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनाला हजेरी लावल्याचे पुढे आले आहे, त्यामुळे ठाकरेंना गल्लीपासून दिल्लीपर्यंत धक्क्यांवर धक्के बसत आहेत. कारण राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनीही साथ सोडली आहे.
केंद्रीय मंत्री आणि शिंदे गटाचे नेते प्रताप जाधव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्व खासदारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. शिंदेंच्या या स्हेनभोजनाला ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी हजेरी लावली होती, त्यामुळे ठाकरेंच्या रणनीतीला पुन्हा एकदा अपयश आल्याचे मानले जात आहे.
राज्यात काही दिवसांपासून ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू झाली होती. त्या वेळी ठाकरे गटाचे काही खासदार हे एकनाथ शिंदेंच्या (Eknath shinde) शिवसेनेत प्रवेश करणार, अशी चर्चा रंगली होती. त्या वेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी सर्व खासदारांना बोलावून पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी बंडू जाधव, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते. त्या वेळी केवळ संजय दिना पाटील हे गैरहजर होते. ते संजय राऊत यांच्यासोबत आहेत, असे त्यावेळी सावंतांनी सांगितले होते.
दरम्यान, आपले निवडून आलेले खासदार पुन्हा फुटू नयेत, यासाठी उद्धव ठाकरे यांनी राज्याबरोबरच दिल्लीतही फिल्डिंग लावली होती. त्यासाठी ठाकरेंनी काही नेते कामाला लावले हेाते. मात्र, त्यानंतरही ठाकरे गटाच्या तीन खासदारांनी शिंदे गटाच्या स्नेहभोजनाला आमंत्रण लावले आहे. त्यामुळे ठाकरेंची रणनीती पुन्हा एकदा फेल झाल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
रत्नागिरीतील राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केलेला असतानाच दुसरीकडे राजधानीतही ठाकरे गटाला सुरुंग लावण्यात शिंदे यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, यातील किती खासदार प्रत्यक्षात शिंदे गटात प्रवेश करणार, याबाबत मात्र स्पष्टता नाही. मात्र, ठाकरेंचा आदेश डावलून ते खासदार शिंदेंच्या छावणीत शिरण्याची तयारी मात्र करत असल्याचे या स्नेह भोजनाच्या उपस्थितीवरून तरी दिसून येत आहे.
संजय दिना पाटलांचीही स्नेहभोजनाला हजेरी?
अरविंद सावंत यांच्या दिल्लीत बंगल्यावर झालेल्या ओळख परेडला गैरहजर असलेले संजय दिना पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील सत्कारानंतर श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला उपस्थिती लावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्याबरोबर संजय पाटील हे आहेत, असे सांगणारे अरविंद सावंत तोंडवर पडल्याचे दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.