
Maharashtra political history : राजकारण आणि राजकीय नेत्यांविषयी सध्या फारसं चांगलं बोललं जात नाही. राजकारण हे स्वकल्याणाचा, स्वतःची विविध संकटांतून सुटका करून घेण्याचा मार्ग असल्याचा हा काळ आहे. समाजाचं कल्याण व्हावं, शिक्षण घेऊन समाज प्रगतिपथावर गेला पाहिजे, असा विचार करणारी राजकारणात एक पिढी होऊन गेली. सध्याचं राजकीय चित्र पाहता हे खरं वाटणार नाही. मात्र समाजाच्या कल्याणासाठी वाहून घेतलेले, स्वातंत्र्यपूर्व काळातही मुलांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू करणारे नेते राज्यात होऊन गेले आहेत.
राजारामबापू पाटील हे त्यापैकीच एक मोठं नाव. अत्यंत शांत, संयमी स्वभावाचे धनी असलेले राजारामबापू दूरद्रष्टेही होती. शिक्षण, सहकार चळवळीच्या माध्यामातून शेतकरी, ग्रामीण भागातील नागिरकांच्या जीवनात सामाजिक-आर्थिक बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं.
सांगली आणि सातारा जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शेक्षणिक आणि सहकार क्षेत्रात क्रांती करणारे, या जिल्ह्यांच्या विकासाचा पाया रचणारे राजारामबापू अनंत पाटील यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी कासेगाव येथे झाला. हे गाव सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात आहे. शालेय जीवनातच ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. बीएनंतर त्यांनी एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं. कासेगावचे ते पहिलेच वकील ठरले. 1942 मधील भारत छोडो आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. राजारामबापू यांचे वडिल अनंत पाटील आणि काका ज्ञानू बुवा यांचा स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय सहभाग होता. त्यामुळं बापूंवर लहानपणापासूनच देशसेवेचे, देशप्रेमाचे संस्कार झाले होते.
कोल्हापूरला कायद्याचं शिक्षण घेत असताना ते सेवादलाचे सदस्य बनले. त्यांच्यावर गांधींजींच्या विचारांचा प्रभाव पडला आणि त्यातूनच त्यांनी खादीचा पुरस्कार सुरू केला होता. शिक्षण आणि त्याच्या जोडीने देशसेवा असा त्यांचा प्रवास सुरू होता. वडील, काका स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय होतेच, त्यातच राजारामबापूंवर गांधीजींचा प्रभाव होता. त्यामुळं तेही स्वातंत्र्यलढ्यात उतरले. काही दिवस भूमिगत राहून त्यांना काम करावं लागलं होतं. परिसरातील मुलांच्या शिक्षणाची गरज लक्षात घेऊन 1945 मध्ये त्यांनी कासेगाव शिक्षण संस्थेची स्थापना केली. ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनाचा पाया ज्ञानावर आधारित असला पाहिजे, असं बापूंना वाटत असे. त्यातूनच त्यांनी शिक्षणसंस्थेची उभारणी केली आणि त्याचं जाळं निर्माण केलं.
राजारामबापू यांनी शिक्षण संस्था सुरू केली त्यावेळी त्यांच वय होत अवघं 25 वर्षांचं! राज्याच्या राजकारणात बापूंचं नाव आजही आदरांनं घेतलं जातं, त्यामागचं हेही एक कारण आहे. जून 1945 मध्ये बापूंनी कासेगाव येथे आझाद विद्यालय सुरू केलं. काही काळ त्यांनी या शाळेत अध्यापनाचंही काम केलं. त्याचदरम्यान 1946 मध्ये सातारा जिल्हा लोकल बोर्डाची निवडणूक जाहीर झाली. बापूंनी ही निवडणूक लढवली. बाळासाहेब देसाई यांनीही ही निवडणूक लढवली. दोघंही विजयी झाले, त्यांची सत्ता आली. या दोघांनी निवडणूक लढवावी, अशी यशंवतराव चव्हाण यांची इच्छा होती. देसाई लोकल बोर्डाचे अध्यक्ष बनले, तर बापूंच्या खांद्यावर जिल्हा स्कूल बोर्डाच्या चेअरमनपदाची जबाबदारी येऊन पडली.
अशा पद्धतीनं बापूंचा राजकारणात प्रवेश झाला होता. आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात बापूंनी दक्षिण सातारा जिल्ह्यातील जवळपास 500 गावांपैकी 180 गावांत शाळांचं बांधकाम केलं. खासगी शाळांना मिळणाऱ्या अनुदानात त्यांनी वाढ केली. ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडवायचं असेल, तर शिक्षण आवश्यक आहे, हे बापूंनी ओळखलं होतं. त्यातूनच त्यांनी 1945 मध्ये कासेगाव शिक्षण संस्थेची स्थापना केली. स्कूलन बोर्डाचे अध्यक्ष झाल्यानंतरही त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात भरीव योगदान दिलं. शिक्षण, कृषी आणि सहकार क्षेत्रातील बापूंचं योगदान ग्रामीण महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्यात महत्वाचं ठरलं. नेता दूरदृष्टीचा असेल तर सामाजिक-आर्थिक बदल घडतात, हे राजारामबापू पाटील यांनी दाखवून दिलं.
बापूंनी अभियांत्रिकी महाविद्यालयं सुरू केली. साखरले येथील माळरानावर साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. पुढं या कारखान्यामुळं परिसरातील शेतकऱ्यांच्या घरी समृद्धी नांदू लागली. शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळत नव्हता. याचा विचार करून त्यांमी इस्लामपूर येथे वाळवा दूध संघाची स्थापना केली. सहकारी बँका, दूध संघ, ग्राहक भांडार, सूतगिरण्या, पाणीपुरवठा संस्था स्थापन करून त्यांनी सहकार क्षेत्रातील जाळं विणलं. त्यामुळं ग्रामीण भागातील लोकांसह शेतकऱ्यांच्या प्रगतीला मोठा हातभार लागला. वाळवा तालु्क्यात त्यांनी सुरू केलेल्या माध्यमिक शाळा, महाविद्यालयांमुळं तरुणांच्या शिक्षणाची मोठी सोय झाली.
काँग्रेसच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी 1957 मध्ये बापूंची निवड झाली. 1959 मध्ये ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनले. वाळवा मतदारसंघातून 1962 मध्ये त्यांनी विधानसभेची पहिली निवडणूक लढवली आणि विजयी झाले. पहिल्यांदा निवडून गेल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं. त्यापुढच्या दोन निवडणुकांतही ते निवडून आले. 1978 मध्ये त्यांची विधानपरिषदेवर निवड झाली. 1962 ते 1980 या कालावधीत मंत्रिमंडळात असलेल्या बापूंनी महसूल, ऊर्जा उद्योग, ग्रामविकास, विधी आणि न्याय आदी खात्यांची जबाबदारी सांभाळली. मंत्रिपदावर असताना त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय़ घेतले. महसूलमंत्री असताना त्यांनी राज्यभरात एकाच पद्धतीची करआकारणी करण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक समजला जातो.
बापू्ंनी शिक्षण संस्था सुरू केली त्यावेळी सांगली जिल्हा अस्तित्वात नव्हता. हा जिल्हा मुंबई प्रांतात होता. या जिल्ह्यात वसंतदादा पाटील यांनी आपले राजकीय स्थान बळकट करण्यास सुरुवात केली होती. दादांनी 1952 आणि 1957 च्या विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त केला होता. 1957 हा राजारामबापू पाटील यांच्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीचा काळ. राजारामबापूंनी 1962 पासून सलग तीनवेळा वाळवा मतदारसंघातून विजय मिळवला होता. 1962 ची निवडणूक बापूंसाठी पहिली नव्हती. त्यांनी 1957 मध्ये विधानसभेची पहिली निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
बापूंनी ती निवडणूक शिराळा मतदारसंघातून लढवली होती. त्यावेळी वाळवा आणि शिराळा हा एकच मतदारसंघ होता. त्यांच्याविरोधात यशवंतराव चंद्रू पाटील रिंगणात होते. पाटील यांनी अवघ्या 800 मतांनी बापूंचा पराभव केला होता. या पराभवानं बापू डगमगले नाहीत. समाजसेवेचा वसा त्यांनी सुरूच ठेवला. केवळ मतदारसंघ नव्हे तर त्यांनी जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केलं. अर्थातच त्यावेळी काँग्रेसमय वातावरण होतं. पुढील निवडणुकीत त्याचा बापूंना फायदा झाला. पराभवानंतर न डगमगता सार्वजनिक जीवनात राहून लोकांची सेवा केल्याचं फळ बापूंना मिळालं.
1962 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 264 पैकी 215 जागांवर विजय मिळाला. बापूंनी राज्यभरात प्रचाराची धुरा सांभाळली होती. ते स्वतः वाळवा मतदारसंघात उमेदवार होते. त्यांनी त्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे भाई एन. डी. पाटील यांचा पराभव केला होता. बापू पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले आणि त्यांना मंत्रिमंडळातही स्थान मिळालं. काँग्रेसला राज्यात घवघवीत यशं मिळालं होतं. यामागं बापूंचेही प्रयत्न होते, त्यांनी घेतलेली मेहनत होती. त्यामुळंच पहिल्यांदी निवडून येऊनही त्यांनी मंत्रिपद मिळालं. बापूंनी सप्टेंबर 1966 मध्ये जमीन महसूल विधेयक सादर करत लँड रेव्हेन्यू कोडमध्ये दुरुस्त्या केल्या. त्यामुळं शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज मिळणं सोपं झालं. दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातून पाणी नेणे- आणणं सोपं झालं.
महाराष्ट्राची दुसरी पंचवार्षिक निवडणूक 1967 मध्ये झाली. त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वंसतदादा पाटील होते. त्यामुळं अर्थातच ही निवडणूक दादांच्या नेतृत्वाखाली झाली. वाळवा मतदारसंघातून बापूंनी पुन्हा एकदा एन. डी. पाटील यांचा पराभव केला. वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात बापूंना पुन्हा संधी मिळाली. उद्योग आणि वीज या महत्त्वाच्या खात्यांचा कारभार बापूंना मिळाला. याच काळात राजारामबापू आणि वसंतदादा यांच्यात वाद निर्माण झाला. त्याला कारण ठरले होते वारणा नदीवरील धरण. हे धरण कुठं बांधायचं, हा मुद्दा वादाच्या केंद्रस्थानी होता.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी बंडखोरी करून विजय मिळवला. त्यानंतर पुन्हा एकदा बापू-दादा घराण्यातील वादाची चर्चा सुरू झाली होती. वारणा नदीवर धरण बांधण्याचा निर्णय 1967 मध्ये केंद्र सरकारनं घेतला होता. धरण कोठे बांधायचे आणि ते किती साठवण क्षमतेचं असावं, यावरून बापू आणि दादा यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. जवळपास 5 वर्षे हा वाद सुरू होता आणि दोघांनीही आपली बाजू जोरकसपणे मांडली हौती. हा वाद चांगलाच पेटला होता, त्यासाठी मोर्चेही निघत होते.
वारणा नदीच्या खोऱ्यातील खुजगावच्या हद्दीत हे धरण व्हावं, त्यामुळं मोठं पाणलोट क्षेत्र मिळेल, असं बापूंचं म्हणणं होतं. या मुद्द्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश नेते बापूंच्या सोबत होते. मात्र या धरणात काही गावे जाणार होती. ही गावे स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होती. त्यावेळी आतासारखा पुनर्वसनाचा कायदा नव्हता. शेजारच्या सातारा जिल्ह्यात कोयना धरणाची उभारणी झाली होती आणि त्यामुळं प्रभावीत झालेल्या लोकांचं अद्याप पुनर्वसन झालं नव्हतं, त्यामुळं खुजगाव येथे धरण बांधण्यास सबंधित गावांतील स्वातंत्र्यसैनिक आणि कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध होता.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली या गावांतील लोकांनी इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र लढा दिला होता. प्रतिसरकारची उभारणी या परिसरातील गावांच्या जंगलात झाली होती. इंग्रजांसोबतच्या चकमकीत दोघे शहीद झाले होते. खुजगाव येथे धरणाची उभारणी झाली असती तर ही गावे पाण्याखाली गेली असती. त्यामुळं वसंतदादा पाटीलही गावकऱ्यांसोबत आले आणि खुजगाव येथे धरणाच्या उभारणीला विरोध केला. त्यामुळं त्यांचे राजारामबापूंशी मतभेद झाले आणि दोघांचे राजकीय मार्ग वेगळे झाले. बापू जनता पार्टीत गेले. नंतर काही वर्षांनी ते काँग्रेसमध्ये परतले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ते अत्यंत निकटवर्तीय होते.
राजारामबापू यांना राजकारणात शह देण्यासाठी पुढे दादांनी प्रयत्न केले. 1978 च्या निवडणुकीत राजारामबापूंचा पराभव झाला. यासाठी दादांनी प्रयत्न केले होते. जिल्हा परिषदेचे सभापती विलासराव शिंदे यांना दादांनी उमेदवारी दिली आणि पाठबळही दिलं होतं. त्या पराभवानंतर बापूंना विधान परषदेवर घेण्यात आलं. वारणा नदीवरील धरण अखेर चांदोरी येथे झालं. तो वाद अर्थातच विकासासाठी होता, सत्तेसाठी किंवा राजकीय कुरघो़्ड्यांसाठी नव्हता, हे आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. दादा आणि बापूंच्या राजकीय वारसदारांमध्ये सध्याही सुप्त संघर्ष पाहायला मिळतो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर दादांचे नातू विशाल पाटील आणि बापूंचे पुत्र माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात शाब्दिक संघर्ष झाला होता.
दरम्यान, 1972 मध्ये विजयी झाल्यानंतर बापूंना मंत्रिमंडळात संधी मिळाली होती. 1978 मध्ये त्यांचा पराभव झाला असला, तरी त्यांच्या पक्षाचे म्हणजे जनता पार्टीचे 99 उमेदवार विजयी झाले होते. त्याचवेळी पुलोदचा प्रयोग झाला होता. शरद पवार मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या मंत्रिमंडळातही बापूंना संधी मिळाली होती. बापूंनी शिक्षण, सहकारक्षेत्रात लावलेल्या रोपट्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालं आहे. राजारामबापूंनी त्यांच्या हयातीत 2 साखर कारखाने सुरू केले. त्यांच्याप्रमाणेच शांत, संयमी स्वभावाचे असलेले त्यांचे पुत्र जयंत पाटील यांनी बापूंच्या साम्राज्याचा विस्तार केला आहे.
खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री असताना 1982 मध्ये घेतला होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी, हा त्यामागचा हेतू होता. राजारामबापूंनी 1983 मध्ये साखराळे येथे अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन सुरू केलं. वयाच्या 64 व्या वर्षी 17 जानेवारी 1984 रोजी राजारामबापूंच अकाली निधन झालं. त्यांचा राजकीय वारसा जयंत पाटील चालवत आहेत. जयंत पाटील हे दिग्गज नेते आहेत. तेही वडिलांप्रमाणेच शांत, संयमी राजकारणी आहेत.
राजारामबापू सहकारी साखर कारखाना हा ऊसाला सर्वाधिक दर देणाऱ्या कारखान्यांपैकी एक ठरला आहे. बापूंच्या हयातीत त्यांनी दोन साखर कारखाने सुरू केले होते. आता त्याचे चार यूनिट सुरू आहेत. बापूंनी वाळवा सहकारी बँक सुरू केली होती. नंतर या बँकेचे नामकरण राजारामबापू सहकारी बँक असे करण्यात आले. कासेगाव शिक्षण संस्थेतर्फे शाळा, महाविद्यालयांसह शुगर टेक्नॉलॉजी कॉलेज, अभियांत्रिकी महाविद्यालय चालवले जाते. भावी पिढीच्या गरजा ओळखून राजारामबापू यांनी शिक्षण, सहकारक्षेत्रात भरीव काम केलं. शाश्वत विकासाच्या राजकारणात राजारामबापूंचं नाव ठळक अक्षरांत कोरलं गेलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.