BJP political strategy : शिवसेना, राष्ट्रवादी, तृणमूलनंतर आणखी दोन पक्ष रडारवर; ‘महाशक्ती’समोर निभाव लागणार का?

Opposition politics India : तृणमूल काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आल्यास काँग्रेस आणि माकपप्रणित डाव्या आघाडीला विरोधकांची भूमिका बजावण्याची पुन्हा संधी मिळेल.
Narendra Modi, Amit Shah
Narendra Modi, Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Regional parties India : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत पराभव तर झालाच; पण निकालानंतर लगेचच विधिमंडळ पक्षात उभी फूट पडली. प्रादेशिक पक्षफुटीच्या मालिकेतील हा चौथा प्रसंग. विरोधी पक्षातील प्रभावी नेत्याला हाताशी धरून त्या पक्षामध्ये फूट पाडून मूळ पक्षच पळविण्याचा प्रयत्न गेल्या चार वर्षांत चारवेळा झाला. जून २०२२ मध्ये शिवसेना, तर जून २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अशाच पद्धतीने पळविण्यात आले. दीड महिन्यांपूर्वीच आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील सात खासदार फुटले. आता या रांगेत आणखी दोन पक्ष असून महाशक्तीसमोर त्यांचा निभाव लागणार का, असा सवाल या चार घटनांवरून पडल्याशिवाय राहत नाही.

पक्षफुटीचा पुढला अंक

तृणमूल काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीची तुलना महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेल्या पक्षफुटीशी केली जात आहे. पण पद्धत तीच असली तरी त्यामागचा उद्देश वेगळा आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी शिवसेनेत फूट घडवून आणली गेली. त्यामुळे भाजप-शिवसेनेचा सत्तेत परतण्याचा मार्ग प्रशस्त झाला. पण पश्चिम बंगालमध्ये भाजप दोन-तृतीयांश बहुमतासह सत्तेत असून, त्या पक्षाला संख्याबळात वाढ करण्याची गरज नसतानाही हे घडले.

ममतांपुढील पर्याय

रस्त्यावरील सततच्या आंदोलनांनी सत्ताधारी पक्षाची कोंडी करण्यात ममता बॅनर्जींचा हातखंडा आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभव पचवून त्या पुन्हा नव्या जोमाने संघर्ष करू शकतात. त्या ७१ वर्षांच्या असल्या आणि निवडणुकीत व्यक्तिगत पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांची हिंमत खचलेली नाही. विधानसभेत सत्ताधारी भाजपला धारेवर धरणे आणि रस्त्यावरील आंदोलनाची जोड देऊन सत्ताधाऱ्यांच्या नाकीनऊ आणण्याच्या ममता बॅनर्जींच्या क्षमतेची त्यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी आणि सध्याचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांना पूर्ण कल्पना आहे. ममतांपुढे आता पर्याय आहे, तो या मार्गाने जाण्याचाच.

Narendra Modi, Amit Shah
Court verdict news : तब्बल 10 वर्षांनी आमदारकी रद्द केली, हायकोर्टाने सुप्रीम कोर्टालाच धरलं जबाबदार; नेमकं काय घडलं?

माकप, काँग्रेसची भूमिका

तृणमूल काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आल्यास काँग्रेस आणि माकपप्रणित डाव्या आघाडीला विरोधकांची भूमिका बजावण्याची पुन्हा संधी मिळेल. त्यामुळे ममता बॅनर्जींना राष्ट्रीय पातळीवर ‘इंडिया’ आघाडीचा आधार व समर्थन मिळू नये, असे पश्चिम बंगालमधील काँग्रेस आणि डाव्या आघाडीच्या नेत्यांना वाटते. अर्थात इंडिया आघाडीतील राष्ट्रीय नेत्यांचे पाठबळ लाभले तरीही ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसचा घसरता आलेख सावरला जाण्याची शक्यता कमी आहे.

फुटीचे परिणाम

तृणमूल काँग्रेसमधील फुटीचा लाभ संसदेत भाजपला होण्याची शक्यता आहे. लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे २८, तर राज्यसभेत १३ खासदार आहेत. त्यापैकी भाजपच्या गळाला लागणाऱ्या खासदारांमुळे लोकसभेत मोदी सरकारला बहुमताच्या दिशेने वाटचाल करता येईल, तर राज्यसभेत दोन तृतीयांश बहुमत संपादन करणे शक्य होणार आहे.

Narendra Modi, Amit Shah
West Bengal news : भाजप उमेदवाराविरोधात अचानक माघार घेणाऱ्या माजी आमदाराला अटक; निकालाआधीच अंडरग्राऊंड, पोलिसांनी काढला माग

पुढील लक्ष्य ‘सप’ व ‘आप’

एप्रिल २०२६ मध्ये आम आदमी पार्टीच्या (आप) राज्यसभेतील दहापैकी सात खासदारांना फोडून भाजपमध्ये सामील करण्यात आले. आता उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष आणि पंजाबमधील आप भाजपच्या रडारवर आहेत. या दोन्ही राज्यांत पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असून, त्यापूर्वीच ९१ आमदार असलेल्या पंजाबमधील ‘आप’ला खिंडार पाडण्याचा; तसेच लोकसभेत ३७ खासदार असलेला समाजवादी पक्ष फोडण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यास नवल वाटणार नाही.

राजकारणाचे दरबारीकरण

केवळ अस्मिताबाजीचे राजकारण नेहमी यशस्वी होत नाही आणि पक्ष मनमानी पद्धतीने चालवल्यास पक्षाचा ऱ्हास अटळ असतो, हे धडे विधानसभा निवडणुकीने तृणमूल काँग्रेसला शिकवले आणि सत्ता गमावण्याची वेळ आली. पण तेवढ्यापुरता हा धक्का मर्यादित राहिला नाही, तर पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनाच राजकीयदृष्ट्या पूर्णपणे निष्प्रभ करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तृणमूल काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत नाराजी असली तरी त्याची परिणती फुटीत होण्यास ‘महाशक्ती’चा हातभार आहे, याविषयी कुणालाही संदेह नाही. विधानसभा अध्यक्षांनी त्वरित फुटीर गटाला मान्यताही दिली. आता आमचीच ‘तृणमूल काँग्रेस’ खरी असा दावा फुटीर गट करेल. निवडणूक आयोगही त्याला मान्यता देण्याची शक्यताच जास्त. सारे जणू काही ‘टॅम्प्लेट’प्रमाणे घडणार. हे जे निवडणुकोत्तर दरबारी राजकारण घडते आहे, ते तांत्रिकदृष्ट्या दोषरहित दाखवता येईलही; परंतु लोकशाही प्रणालीच्या मूल्यांशी विसंगत आहे.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडायला हवा. प्रादेशिक पक्षांचे राजकीय आव्हान चिरडून टाकण्याच्या प्रयत्नांत ठिकठिकाणच्या स्थानिक अस्मिता, सांस्कृतिक स्वायत्तता यांच्यावरही रूळ फिरवला जाता कामा नये. भारतीय जनता पक्षाने ती काळजी घ्यायला हवी. केंद्र व राज्यांच्या कार्यक्षेत्राची सुस्पष्ट आखणी हे जसे भारतीय संघराज्याचे वैशिष्ट्य आहे, तसेच सांस्कृतिक विविधता हेही आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे धागे मजबूत असायलाच हवेत; परंतु ती एकात्मता विविधतेने नटलेल्या परंपरांचा आदर राखून, त्यांचा अवकाश कायम ठेवूनच खऱ्या अर्थाने दृढ होणार आहे. या विविधतेलाही ‘मिले सूर मेरा-तुम्हारा...’ हे परिमाण आहेच. पण सत्ताकारणाच्या खेळात एकात्मतेचे धागे विसविशीत होता कामा नयेत, याचे भान ठेवायला हवे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com