
Beed News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीमध्ये इनकमिंग जोरात सुरु आहे. सर्वच पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाबरी मुंडे यांनी माजलगाव मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. आता बाबरी मुंडे व त्यांचे वडील राजाभाऊ मुंडे यांनी प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
बाबरी मुंडे यांच्या या पक्षप्रवेशामुळे बीड जिल्ह्यतील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होणार आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे निकटवर्तीय असलेल्या राजाभाऊ मुंडे, बाबरी मुंडे या दोघांचे भाजपमधून बाहेर पडणे हे पक्षासाठी धक्का मानला जात आहे. त्याचबरोबर, धनंजय मुंडे यांचा फोटो बॅनरवर नसणे आणि प्रकाश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल करण्याचा निर्णय घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी यानिमित्ताने चव्हाट्यावर आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बुधवार व गुरुवार दोन दिवस बीडमध्ये होते. मात्र, त्यांचे स्वागत करणाऱ्या बॅनरवर धनंजय मुंडे यांचा फोटोच नसल्याने खळबळ उडाली आहे. मुंडे पितापुत्रांनी पक्षप्रवेश केल्यानंतरही हा गहाळ फोटो राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. नुकत्याच झालेल्या धारुर खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत त्यांनी भाजपला डावलून सोळंके, आडसकर व मुंडे यांच्यामदतीने संचालक मंडळ बिनविरोध आणले. आता जिल्हा परिषद, नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत या पिता-पुत्राचा राष्ट्रवादी काँग्रेसला किती फायदा होतो? आणि पंकजा मुंडे यांना नुकसान हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भाजप नेते आणि पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय बाबरी मुंडेसोबत त्यांचे वडील राजाभाऊ मुंडे आणि अनेक कार्यकर्तेही राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि कार्यकर्त्यांकडे होणारे दुर्लक्ष ही त्यांनी पक्षसोडण्याची मुख्य कारणे सांगितली आहेत. या प्रवेशामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार आहे. आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्याचा फायदा अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला होणार आहे.
भाजप सोडताना पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा मुंडे पिता-पुत्रांनी उपस्थित केला. आम्ही पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले, पक्षाच्या कठीण काळात एकनिष्ठ राहिलो. पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना आणि निवडणुकांना पक्षाकडून पुरेसे लक्ष दिले जात नाही. जर पक्षातच योग्य सन्मान आणि न्याय मिळत नसेल, तर तिथे थांबण्यात काय अर्थ? असे मत व्यक्त करीत मुंडे पिता-पुत्रांनी नव्या राजकीय वाटचालीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची निवड केली आहे.
अजित पवारांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश
वडवणी येथे पक्षप्रवेश सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित बाबरी मुंडे, राजाभाऊ मुंडे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावेळी बाबरी मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यापुढे आमची राजकीय वाटचाल आणि ध्येय हे आमदार प्रकाश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली असेल. अजित पवार यांनी जी जबाबदारी दिली, ती आम्ही पूर्ण क्षमतेने पार पाडू, असे स्पष्ट करीत त्यांनी योग्य तो संदेश दिला आहे.
पक्षप्रवेशाच्या सोहळ्याच्या बॅनरवरून रंगला वाद
मुंडे पिता-पुत्रांच्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याप्रसंगी लावण्यात आलेल्या बॅनरवरूनही नव्या वादाला तोंड फुटले आहे. या बॅनरवर राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा फोटो नसल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यातील प्रभावी नेते असतानाही त्यांना डावलण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
बाबरी मुंडे आणि राजाभाऊ मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता येत्या काळात धनंजय मुंडे व प्रकाश सोळंके यांच्या गटबाजीला उधाण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात धनंजय मुंडे व प्रकाश सोळंके यांच्यातील गटबाजी उफाळून येणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.