BJP-Akali Alliance : भाजपला अकाली दलाची गरज का? युतीमागे अमित शाहांची रणनीती, सत्तेत परण्याचा मार्ग मोकळा!

BJP-Akali Dal Alliance Analysis : अकाली दलाला ग्रामीण भागात आणि शीख मतदारांमध्ये ऐतिहासिक राजकीय आधार राहिला आहे. तर, भाजपला शहरी भागात पाठींबा मिळतो आहे. त्यामुळे ही युती पुन्हा सत्तेत परण्याचा मार्ग असल्याचे बोलले जात आहे.
BJP-Akali Dal Alliance Analysis
BJP-Akali Dal Alliance Analysissarkarnama
Published on: 
Updated on: 

कोमल जाधव

Panjab Politics : पंजाबच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पुन्हा जुन्या मित्राकडे मैत्रीचा हात पुढे केला. आणि मित्राने सुद्धा तो हात हातात घेतला. जवळपास सहा वर्षांपूर्वी कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून तुटलेली शिरोमणी अकाली दल आणि भाजप ही युती आता पुन्हा जुळली आहे. पण भाजपला अचानक अकाली दलाची गरज का भासली? पंजाबमध्ये स्वबळावर विस्तार करण्याची भूमिका घेणाऱ्या भाजपनं पुन्हा युतीचा पर्याय का निवडला? यामागे पंजाबचं नेमकं राजकीय गणित काय आहे? सगळे समजून घेऊया

भाजप आणि अकाली दलाची युती ही काही वर्षांपुरती मर्यादित नव्हती. जवळपास 25 वर्षं हे दोन्ही पक्ष एकत्र होते. या युतीमध्ये अकाली दल हा मोठा भागीदार होता, तर भाजप प्रामुख्यानं शहरी मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवत होता. 117 जागांच्या पंजाब विधानसभेत अकाली दल 94, तर भाजप 23 जागांवर युतीमध्ये लढत होते.

म्हणजेच पंजाबच्या ग्रामीण भागात आणि शीख मतदारांमध्ये अकाली दलाचे असलेलं पारंपरिक राजकीय अस्तित्व, तर शहरी भागात भाजपची ताकद, असे या युतीचे गणित होते. मात्र, 2020 मध्ये केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांवरून पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन तीव्र झालं. या कायद्यांना अकाली दलाने विरोध केला आणि अखेर सप्टेंबर 2020 मध्ये भाजपसोबतची युती तोडली. त्यानंतर दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे राजकीय वाटचाल करत होते. मात्र, या वाटचालीत आता थेट राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

स्वतंत्रपणे लढणाऱ्या या पक्षांची पंजाबच्या राजकारणात पिछेहाट झाली. 2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या, तर अकाली दलाला तीन जागा मिळाल्या. म्हणजेच दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले, पण त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पंजाबमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. पक्षाला सुमारे 18.5 टक्के मतं मिळाली, मात्र 13 पैकी एकही जागा जिंकता आली नाही. दुसरीकडे अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांनी भटिंडा मतदारसंघातून विजय मिळवला. म्हणजेच भाजपला पंजाबमध्ये मतांचा काही आधार मिळत असला, तरी त्याचं विधानसभा जागांमध्ये रूपांतर करण्याचं आव्हान कायम आहे, हेच ओळखून पुन्हा जुने मित्र एकत्र आले आहेत.

अकाली दलाचा पारंपरिक मतदारवर्ग

पंजाबमध्ये शेतकरी आणि शीख मतदारांचे राजकीय महत्त्व मोठे आहे. अकाली दलाला ग्रामीण भागात आणि शीख मतदारांमध्ये ऐतिहासिक राजकीय आधार राहिला आहे. भाजपला या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अकाली दलाची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक नेत्यांचे जाळे उपयोगी पडू शकते, असं राजकीय विश्लेषण आहे. भाजपची शहरी भागातील ताकद आणि अकाली दलाचा ग्रामीण भागातील प्रभाव एकत्र आणण्याचा प्रयत्न या युतीतून होऊ शकतो. मात्र, भाजपसाठी ही युती केवळ अकाली दलाचा मतदारवर्ग मिळवण्यापुरती मर्यादित नाही. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आहे, तर काँग्रेसही प्रमुख विरोधी पक्ष म्हणून मैदानात आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी आप आणि काँग्रेसला आव्हान देण्यासाठी विरोधी मतांचं विभाजन टाळणे, हा युतीमागचा एक राजकीय विचार आहे.

BJP-Akali Dal Alliance Analysis
BJP Akali Dal Alliance : ज्या भाजपला 'शीख संस्थांवर कब्जा करणारा' म्हणाले, त्याच भाजपच्या चरणी बादल कुटुंब! भगवंत मान यांचा घणाघात

सत्तेत परण्याचा मार्ग मोकळा

व्होटर वाइबने नुकत्याच केलेल्या सर्व्हेमध्ये पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला तब्बल 33.5 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर, काँग्रेसला 27.6 टक्के मते मिळणार आहे. तर, भाजपला 14 टक्के आणि अकाली दलला 12.5 टक्के मतं मिळत असल्याचे दिसत आहे. वारिस पंजाब दे या पक्षाला देखील 8 टक्के मत मिळत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अकाली दल आणि भाजप एकत्र आल्याने त्यांच्या मतांची टक्केवारी 28 च्या पुढे जाईल. आणि आपला टक्कर देऊन सत्तेत येऊ शकतात, अशी चर्चा आहे.

युतीसमोर आव्हान?

2020 मध्ये कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्ष वेगळे झाले होते. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपबद्दल निर्माण झालेला अविश्वास दूर करणं हे एक आव्हान असेल. त्याचबरोबर भाजपमधील काही जुन्या नेत्यांचा अकाली दलासोबत पुन्हा युती करण्याला विरोध असल्याच्याही चर्चा होती. त्यामुळे केवळ जागावाटपच नव्हे, तर दोन्ही पक्षांमधील स्थानिक पातळीवरील समन्वयही महत्त्वाचा ठरणार आहे.

पंजाबमध्ये भाजपला आपला राजकीय विस्तार करायचा आहे, तर अकाली दलाला पुन्हा आपलं राजकीय अस्तित्व मजबूत करायचं आहे. भाजपला अकाली दलाचा पारंपरिक मतदारवर्ग आणि संघटनात्मक ताकद हवी आहे, तर अकाली दलाला भाजपची राष्ट्रीय पातळीवरील ताकद आणि निवडणूक व्यवस्थापनाचा फायदा मिळू शकतो. मात्र, या युतीचं खरं यश ठरणार आहे ते जागावाटप, शेतकरी मतदारांचा प्रतिसाद आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील समन्वयावर आहे. त्यातूनच ही युती सत्ताधारी आप आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसपुढे आव्हान उभे करणार की नाही हे ठरणार आहे.

BJP-Akali Dal Alliance Analysis
Amarinder Singh : माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह थेट सोनिया गांधींच्या दरबारात! पंजाब निवडणुकीआधी घरवापसीच्या चर्चांना उधाण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.