
Latur News : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अवघ्या चार महिन्यातच विधानपरिषदेच्या निवडणुका होत आहेत. विधान परिषदेमधील रिक्त पाच जागांसाठी २७ मार्चला मतदान होणार आहे. विधान परिषदेतील पाच पैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. या तीन जागेवरील उमेदवारांची घोषणा भाजपने रविवारी सकाळी केली. यामध्ये जुन्या-नव्याचा समतोल राखत माजी आमदार दादाराव केचे, नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी, छत्रपती संभाजी नगरचे माजी उपमहापौर संजय केनेकर या तिघांना उमेदवारी दिली. मात्र, हे करीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे लाडके आमदार अभिमन्यू पवार यांच्यासाठी त्याग करणाऱ्या माजी आमदार बसवराज पाटलांच्या पदरी पुन्हा निराशाच आली आहे.
महायुतीमध्ये (Mahayuti) सर्वाधिक तीन जागा भाजपच्या वाट्याला आल्या होत्या. विधानपरिषदेतील भाजपचे नागपुरातील आमदार प्रवीण दटके, सांगली जिल्ह्यातील गोपीचंद पडळकर, लातूर जिल्ह्यातील रमेश कराड हे तिघेजण विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या.
भाजपच्या वाट्याला सर्वाधिक तीन जागा येत असल्याने अनेकजण इच्छुक होते. त्यामुळे प्रदेश भाजपकडून इच्छुकांची नावे दिल्ली दरबारी पाठविण्यात आली होती. जवळपास राज्यातील इच्छुक असलेल्यापैकी छाननी करून 20 जणांच्या नावाची यादी दिल्लीतील हायकमांडकडे पाठविण्यात आली होती. या 20 पैकी तीन जणांच्या नावाची घोषणा रविवारी सकाळी दिल्लीतूनच करण्यात आली. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले होते.
मराठवाड्यातील रमेश कराड यांच्या जागेवर लातूर जिल्हयातील अर्चना पाटील-चाकुरकर अथवा बसवराज पाटील-मुरूमकर या दोघांपैकी एकाला संधी दिली जाईल असे वाटत होते. मात्र, त्या जागेवर छत्रपती संभाजीनगर येथील माजी उपमहापौर संजय केणेकर यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे बसवराज पाटील (Baswaraj Patil) यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच असली आहे.
लातूर शहर मतदारसंघातून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अर्चना पाटील यांना अल्पशा मताने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे या रिक्त जागेसाठी त्यांना संधी मिळण्याची शक्यता होती. त्यांच्या नावाची चर्चा दिल्ली दरबारी सुरु होती. मात्र, ऐनवेळी त्यांचे नावदेखील मागे पडले.
धाराशिव जिल्हयातील आमदार बसवराज पाटील-मुरूमकर यांचे नाव देखील याच जागेसाठी चर्चेत होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानपरिषदेला संधी देण्याच्या अटीवर काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. औसा मतदारसंघातून ते दोन टर्म आमदार राहिले होते. मात्र, भाजपचे उमेदवार अभिमन्यू पवार यांनी २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव केला होता. त्यामुळे पाटील पुन्हा एकदा २०२४ ची विधानसभा ते काँग्रेसकडून लढतील, असे वाटत असतानाच त्यांनी काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने सुरुवातीला ते धाराशिव लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, ही जागा भाजपच्या वाट्याला येणार नसल्याने त्यांचे नाव मागे पडले होते.
बसवराज पाटील यांना विधानसभा निवडणूक लढण्यासाठी मतदारसंघच नसल्याने त्यांना शांत बसावे लागले होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अभिमन्यू पवार यांच्या विरोधात तगडा उमेदवार रिंगणात नसल्याने ते वनवे निवडून आले होते. त्यामुळेच त्याची परतफेड करण्याची संधी अभिमन्यू पवार यांच्याकडे चालून आली होती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके आमदार असलेले अभिमन्यू पवार त्यांची ताकद मुंबई दरबारी लावून बसवराज पाटील यांना संधी मिळवून देतील, असे सर्वांनाच वाटत होते.
विशेष म्हणजे भाजपच्या वाट्याला येत असलेल्या तीनही आमदारकीची मुदत केवळ 13 महिन्याची आहे. त्यामुळे काही जण 13 महिन्यासाठी आमदार होण्यास तयार नसल्याने भाजपने दुसऱ्या फळीतील नेत्याला संधी दिली आहे. विधानपरिषदेत खरे तर अभ्यासू आमदाराची गरज असते. विधिमंडळाचे विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असल्याने याठिकाणी अनुभवी व अभ्यासू व्यक्तीची गरज असते. त्यामुळे या ठिकाणी सर्वांनाच बसवराज पाटील यांच्यासारख्या तीन टर्म आमदार असलेलया माजी मंत्र्याची वर्णी लागेल, अशी शक्यता शेवटच्या क्षणापर्यंत होती.
बसवराज पाटील 1999 साली उमरगा विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा काँग्रेसकडून निवडून आले होते. पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर त्यांची वर्णी विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून लागली. त्यानंतर त्यांना 2004 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते रवींद्र गायकवाड यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर 2009 साली त्यांचा हक्काचा उमरगा विधानसभा मतदारसंघ अनुसूचीत जागेसाठी राखीव झाला होता.
त्यानंतर बसवराज पाटील यांना मतदारसंघ बदलावा लागला होता. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी औसा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढविताना विजय मिळवला होता. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत त्यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला होता. त्यानंतर 2019 साली सलग तिसऱ्यांदा विजयी होतील, अशी शक्यता असताना त्यांना भाजपच्या अभिमन्यू पवार यांनी पराभूत केले होते. तर 2024 च्या विधानसभा निवडणूक त्यांनी लढली नव्हती. त्यामुळे त्यांना विधानपरिषदेवर संधी देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाईल, अशी शक्यता होती.
माजी मंत्री बसवराज पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या कार्यकत्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या लाडक्या आमदारासाठी त्याग करूनही बसवराज पाटलांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली असल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे. काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची वर्णी विधानपरिषदेवर लावून त्यांचे पुनर्वसन करण्याची संधी भाजपच्या हातातून निसटली आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.