
Raigad News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. रायगडावर शनिवारी दुपारी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास त्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर शाह यांनी सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीच्या निमित्ताने डिनर डिप्लोमसीचे आयोजन करण्यात आले होते. महायुतीमध्ये गेल्या बऱ्याच दिवसापासून रायगड व नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे. त्याच वेळी केंद्रीयमंत्री शाह रायगड दौऱ्यावर होते. त्यामुळे शाह यांची ही भेट रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवण्यासाठी निर्णायक ठरू शकते? त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमित शाह (Amit Shah) तटकरे कुटुंबीयांच्या घरी जेवायला गेले, याला केवळ योगायोग मानता येणार नाही. या भेटीला राजकीय भेट म्हणूनच पाहिले जात आहे. या डिनर डिप्लोमसी प्रसंगी अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील उपस्थित होते. त्यामुळे यावेळी रायगडाचा पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवण्यासाठी अनौपचारिक चर्चा झाली असण्याची शक्यता अधिक आहे.
अमित शाह यांनी तटकरे यांच्या निवासस्थानी जाऊन जेवण केल्याने अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्याबाबत सकारात्मकता वाढली आहे, असे संकेत यामधून मिळत आहेत. या वेळी झालेल्या चर्चेत भाजपचा (BJP) जर अदिती तटकरे यांच्या नावाला स्पष्ट पाठिंबा मिळाल्यास अदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री केले जाऊ शकते. त्यामाध्यमातून गेल्या काही दिवसापासून महायुतीमध्ये उफाळून आलेली अंतर्गत नाराजी कमी करण्याचा प्रयत्न महायुतीमधील या नेतेमंडळीचा असणार आहे.
या राजकीय भेटीतून शिंदे गटाची असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न असणार आहे. शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे तीन आमदार आहेत. त्यामुळे मंत्रिपद शिवसेनेला मिळावे यासाठी ते अडून बसलेले आहेत. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद दूर करण्याचा प्रयत्न यावेळी निश्चितच झाला असणार आहे. त्यामुळे यामधून समेटासाठी नेमकी काय रणनीती सुरु आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे अजित पवार गटाचे सध्याचं राजकीय बळ आणि त्यांचे महायुतीमधले स्थान पाहता येत्या काळात भाजपला गरज भासणार आहे. त्यासोबतच तटकरे कुटुंबाची रायगड जिल्ह्यात असलेली ताकद पाहता भाजपसाठी त्याचा भविष्यात राजकीय उपयोग होणार आहे. त्याचमुळे अमित शाह यांनी राज्यातील सत्ता समीकरणे पाहता व केंद्रातील अजित पवार गटाचे लोकसभेतील एकमेव खासदार असलेल्या सुनील तटकरे यांच्या कुटुंबासोबतचे संबंध अधिक दृढ केले, असल्याची समजते. त्यामुळे या भेटीच्या माध्यमातून शाह यांनी अनेक राजकीय समीकरणांची जुळवाजुळवा देखील केली आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह हे सुनील तटकरे यांच्या घरी जेवणासाठी जातात त्याला राजकीयदृष्टया खूप महत्त्व आहे. यावेळी डिनर डिप्लोमसीतून नेमकी काय चर्चा झाली हे पुढे आले नसले तरी नक्कीच यावेळी अनेक अनौपचारिक चर्चा झाली असणार मात्र, या चर्चेतून नेमके काय ठरले, हे समजण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सत्तेत थेट सहभाग आहे. महायुती सरकारमधील घटक पक्ष म्हणून त्यांनी विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केली आहे. अजितदादांकडे उपमुख्यमंत्री पदासह अर्थखाते आहे. त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील बारामती, पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये प्रभावी नेटवर्क आहे. प्रशासकीय बाबींचा अजितदादांना प्रदीर्घ अनुभव आहे.
त्यासोबतच मराठा समाजात त्यांनी चांगला ठसा उमटवला आहे. इतर नेत्यांच्या तुलनेत अजित पवार यांची काम करण्याची शैली अधिक प्रभावी आहे. त्यामुळे काही जणांच्या मते, ही अमित शाह यांची ही भेट जरी केवळ सौजन्य भेट होती असे सांगितले जात असले तरी अनेक राजकीय विश्लेषकाच्या मते, ही भेट म्हणजे राजकीय रणनीतीचा भाग मानला जात आहे. मात्र, त्यामध्ये नेमके काय घडले हे समजण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागणार आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.