Eknath Shinde : ठाकरेंचे 13 खासदार फुटले, शिंदेंनी 15 तिकीट वाटले, शाह-फडणवीसांनी तिकीट कापले; मुख्यमंत्र्यांचा 'गेम' तर नाही ना?

Shivsena Eknath Shinde Group Loksabha Election 2024 Exit Poll Results : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात धक्कादायक निकालांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ सहा जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama

Shivsena Political News : शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद तर मिळवले, मात्र लोकसभा निवडणुकीच्या 'एक्झिट पोल'च्या अंदाजांनी त्यांची झोप उडवली आहे. शिवसेनेतून बंडखोरी करणे ही फार मोठी जोखीम असते, कारण बंडखोरी करणाऱ्या अनेक शिवसेना नेत्यांची कारकीर्द संपुष्टात आली आहे किंवा त्यांना पराभवाचा तरी सामना करावा लागला आहे. एक्झिट पोल खरे ठरले तर मुख्यमंत्री शिंदे यांचे काय होणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

महाविकास आघाडी सरकार पाडून भाजपने(BJP) बदला घेतला खरा, मात्र त्यासाठी एकनाथ शिंदे यांचा वापर करण्यात आला. महायुतीचे सरकार स्थापन झाले, ते आणखी स्थिर करण्यासाठी अजित पवार यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसही फोडण्यात आली. शिंदे आणि अजितदादा यांच्यासोबत प्रत्येकी 40 आमदार सरकारच्या बाजूने आले. भाजपचे काम झाले. काम झाल्यानंतर त्यांची गरज संपली, अशा तऱ्हेने भाजप वागल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आले.

एक- एक जागा पदरात पाडून घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांना कसरत करावी लागली. मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या 40 आमदारांनी शिवसेना सोडताना राजकीय कारकीर्द पणाला लावली होती, मात्र उपमुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ठरवून शिंदे यांचा 'पॉलिटिकल गेम' तर केला नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे.

जनमत विरोधात...

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरचा घटनाक्रम लक्षात घेतला की ही शंका साधार आहे, याची खात्री पटेल. शिंदे यांच्या दोन विद्यमान खासदारांना तिकिटे नाकारण्यात आली. यवतमाळच्या खासदार भावना गवळी या सलग पाचवेळा निवडून आल्या होत्या. जनमत विरोधात आहे, असे कारण देऊन त्यांनी मैदानातून बाजूला सारण्यात आले.

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना शिंदे यांनी उमेदवारी जाहीर केली होती. तेथेही जनमत त्यांच्या विरोधात आहे, असे सांगून पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी रद्द करण्यास भाजपने मुख्यमंत्र्यांना भाग पाडले. उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघ मिळावा, यासाठीही शिंदेंनी जोर लावला होता. मात्र अखेरच्या क्षणी ही जागाही त्यांच्या हातून निसटली. या सर्व बाबींना कंटाळून मुख्यमंत्री शिंदे एकेदिवशी काही तास नॉट रिचेबल झाले होते.

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Mawal Lok Sabha Exit Poll : ठाकरेंच्या शिलेदाराचं काम महाविकास आघाडीनं केलं नाही? 'एक्झिट पोल'मध्ये बारणेंची हॅटट्रिक तर वाघेरे 'बॅकफूट'वर

'शिंदे आणि अजितदादांपेक्षा ठाकरेंची ताकद मोठी...'

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे शिंदे गटाचे आहेत. त्यांनाही उमेदवारी देऊ नये, यासाठी भाजपने मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर प्रचंड दबाव टाकला होता. तेथून ऱाष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते. मात्र आधी धोका झाल्यामुळे शिंदे यावेळी ठाम राहिले. त्यामुळे त्यांना नाशिकची जागा मिळाली. शिंदे यांच्या शिवसेनेने 15 जागा लढवल्या. त्यापैकी सहा उमेदवार निवडून येतील, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 आमदार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि त्यांचे 40 आमदार दिमतीला असूनही महायुती 30 चा आकडा गाठणार नाही, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे, गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला 41 जागा मिळाल्या होत्या. शिंदे आणि अजितदादांपेक्षा उद्धव ठाकरे यांची ताकद मोठी आहे, हे यावरून दिसून येते.

महायुतीला 30 जागाही मिळणार नसतील तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या 40 आमदारांचा उपयोग काय, असा प्रश्न भाजपमधून आज ना उद्या उपस्थित केला जाऊ शकतो. केवळ उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कटुंबियांवर टीका करण्यासाठी, त्यांच्यावर सातत्याने तुटून पडण्यासाठी भाजपने शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारांचा पुरेपूर वापर करून घेतला, मात्र त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही, असे एक्झिट पोलचे अंदाज आहेत.

कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दोन आकडी जागा मिळतील, असा अंदाज एक्झिट पोल करणाऱ्या बहुतांश संस्थांनी वर्तवला आहे. शिंदेंचा शिक्का चालणार नाही, हे अमित शाह आणि फडणवीस यांच्या लक्षात तर आले नसेल ना, असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे.

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Pune police officer video viral : पोलिस अधिकाऱ्याने तरुणाकडून चक्क दाबून घेतले पाय; व्हिडिओ व्हायरल !

हा प्रश्नही साधार आहे. शिंदेंचे उमेदवार निवडून यावेत, यासाठी एखादा नेता जिवाचे रान करताना दिसून आला नाही. भाजपच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघांमध्ये तगडी यंत्रणा राबवण्यात आली होती. लातूर लोकसभा मतदारसंघ हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ही जागा भाजपच्या हातून निसटूनच गेली होती.

काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांचा एकतर्फी विजय होईल, असे वातावरण होते. हे लक्षात आल्यानंतर भाजपने आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर जबाबदारी सोपवली. लातूरमध्ये अटीतटीची लढत होत असल्याचा अंदाज 'एक्झिट पोल'मधून समोरआला आहे. शिंदेंचे उमेदवार असलेल्या मतदारसंघांत भाजपने अशी यंत्रणा कार्यान्वित केली होती का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Ajit Pawar On NCP Victory: यापुढे अरुणाचल प्रदेशमध्ये विकासाची गंगा वाहणार, विजयी उमेदवारांचं अभिनंदन करताना अजितदादांची गॅरंटी

अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिंदे यांचा मुद्दाम तर गेम केला नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळातही सुरू झाली आहे. मराठा आरक्षण आंदोलन हाताळण्यातही राज्य सरकारला अपयश आले. त्यामुळे मराठा समाज सरकारवर नाराज आहे. याचे खापर शिंदे यांच्या डोक्यावरच फुटणार आहे. चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी शिंदे यांची अवस्था झाली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल यायच्या आधीच छगन भुजबळ यांनी विधानसभेच्या 80 ते 90 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला हव्या आहेत, असे विधान केले आहे.

भाजपचे 105 आमदार आहेत. भाजप त्यापेक्षा अधिक जागा लढवणार हे निश्चित आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही शिंदे यांची कोंडी होणार आहे. मंत्रिपदे न मिळाल्यामुळे शिंदेंचे काही आमदार नाराज आहेत. विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे शिंदे यांची डोकेदुखी पुन्हा वाढणार आहे. शिवसेनेतू बंड केल्यामुळे लोकांच्या नाराजीचा फटका सहन करणाऱ्या शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारांच्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Pune Lok Sabha Constituency Election : मुरलीअण्णांच्या सेलिब्रेशनचे प्लॅनिंग अन् जगदीश मुळीकांची हाताची घडी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com