पासवानांच्या निधनानंतर वर्षाच्या आतच काका-पुतण्याने केले पक्षाचे तुकडे

केंद्रीय मंत्री पशुपती पारस आणि चिराग पासवान यांचे दोन गट तयार झाले आहेत.
Pashupati  Paras, Chirag Paswan
Pashupati Paras, Chirag Paswansarkarnama
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : काका-पुतण्यांतील वादात अखेर लोक जनशक्ती पक्षाचे तुकडे झाले आहेत. केंद्रीय मंत्री पशुपती पारस (Pashupati Kumar Paras) आणि पक्षाचे संस्थापक दिवंगत रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान (Chirag Paswan) यांचे दोन गट तयार झाले आहेत. निवडणूक आयोगानं या दोघांच्याही गटाला स्वतंत्र नाव व चिन्ह दिलं आहे. त्यामुळं आता बिहारमधील पोटनिवडणूकीमध्ये मुळ लोक जनशक्ती पक्षाचे अस्तित्व नसेल.

निवडणुक आयोगाने (ECI) तीन दिवसांपूर्वीच लोक जनशक्ती पक्षाचे बंगला हे चिन्ह गोठवले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार तूर्तास बंगला हे निवडणूक चिन्ह पशुपती पारस अथवा चिराग पासवान यांच्यापैकी कोणालाही मिळणार नाही. सद्यःस्थितीत हंगामी उपाययोजना म्हणून दोन्ही गटांना आपल्या उमेदवारांसाठी नवे नाव आणि स्वतंत्र निवडणूक चिन्ह घेता येईल, अशी सूचना निवडणूक आयोगाने केली आहे.

Pashupati  Paras, Chirag Paswan
मंत्र्यांचा मुलगा मोकाट पण प्रियांका गांधींवरच गुन्हा दाखल अन् अटकही!

दोघांनीही पक्षावर आपला दावा सांगत आयोगाकडं धाव घेतली आहे. आता आयोगानं दोघांनाही पक्षाचे नवे नवा व नवे चिन्ह दिलं आहे. त्यानुसार पारस यांच्या पक्षाचे नाव राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष आणि चिन्ह शिलाई मशिन असेल. तर चिराग पासवान यांच्या पक्षाला लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) असं नाव देण्यात आलं आहे. तर त्यांना हेलिकॉप्टर हे चिन्ह देण्यात आलं असून त्यांना आगामी पोटनिवडणूकीत आपल्या उमेदवारांसाठी याचा वापर करता येईल.

दरम्यान, रामविलास पासवान यांच्या निधनाला पुढील दोन दिवसांत वर्ष पूर्ण होईल. त्याआधीच त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे दोन तुकडे झाले आहेत. त्यांच्या निधनानंतर पारस यांनी पक्षातील इतर खासदारांना सोबत घेत वेगळा गट केला आणि पक्षावर दावा सांगितला. लोकसभाध्यक्षांकडूनही या निवडीला मान्यता मिळाल्यानंतर पारस यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची नियुक्ती करून स्वतःला पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर केले. दुसरीकडे, चिराग पासवान यांनीही लोकजनशक्ती पक्षाची कार्यकारिणी बोलावून पारस गटाचे निर्णय पक्षविरोधी असल्याचे म्हणत फेटाळले होते. सोबतच चिराग पासवान यांनी पारस यांच्याआधी निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन निवडणूक चिन्हावर हक्क सांगितला होता.

लोकजनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांच्या निधनानंतर पासवान कुटुंबीयांमध्ये त्याचप्रमाणे लोकजनशक्ती पक्षातही फाटाफूट होऊन पक्षावरील नियंत्रणावरून वाद सुरू झाला होता. पक्षात दोन गट पडले होते. लोकजनशक्ती पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी चिराग पासवान यांचे नेतृत्व झुगारून पशुपती पारस यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com