Shivsena News: इम्तियाज जलील यांचा 'तो' सल्ला ठाकरेंच्या तालमीत तयार झालेल्या शिंदे अन् त्यांच्या शिलेदारांच्या पचनी पडणार का..?

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : शिवसेनेच्या दोन्ही गटांतील शाब्दिक लढाई संपण्याची चिन्हे नाहीत. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शिंदे गटातील नेते भाषेची मर्यादा, विधीनिषेध पाळत नाहीत, याबाबत अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. आता एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सल्ला दिला आहे.
Uddhav Thackeray-Eknath Shinde-Imtiaz Jaleel News
Uddhav Thackeray-Eknath Shinde-Imtiaz Jaleel NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे पोस्टर विविध शहरांत झळकले होते. या पोस्टरवर अर्थातच खासदार शिंदे यांच्यासह त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांचे फोटो होते. काही पोस्टरवर एक असा फोटो होता, जो लक्ष वेधून घेत होता, नावीन्यपूर्ण होता. हा फोटो होता 'फॉर्च्युनर' या महागड्या 'एसयूव्ही'चा! हा फोटो का छापला असेल, असा प्रश्न अनेकांना पडला असणार. पक्ष सोडायचा असेल तर सोडा, पण ज्यांनी मोठे केले त्यांच्याविषयी वाईट तर बोलू नका, हा इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी शिंदे गटाला दिलेल्या सल्ल्यामुळे हे पोस्टर सर्रकन डोळ्यांसमोरून गेले.

ज्येष्ठांचा आदर करा, हे सर्वच धर्म सांगतात. भारतीय संस्कृतीतही ज्येष्ठांना मानाचे स्थान आहे. भारतीय कुटुंबव्यवस्थेचे जगभरात कौतुक होते, ते या व्यवस्थेत ज्येष्ठांना असलेल्या मान-सन्मानामुळे, ज्येष्ठांच्या सहवासात घडणाऱ्या सुसंस्कृत पिढीमुळे. ज्येष्ठांचा सन्मान करण्याची समृद्ध परंपरा भारताच्या, महाराष्ट्राच्या राजकारणातही आहे. आता या परंपरेला छेद गेला आहे की काय, अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांची भाषा ऐकून लोकांना आता वीट आलेला आहे.

राज्यातील राजकारणात 2019 नंतर आमूलाग्र बदल झाला. या बदलाला सुरुवात तशी 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरुवात झाली होती. 2019 नंतर राज्यात या बदलाने प्रचंड वेग घेतला. समाजमाध्यमांवर ज्येष्ठ नेत्यांची, महिलांची खिल्ली उडवण्यात येऊ लागली. अशा बाबींचा आनंद घेणारा एक वर्ग निर्माण झाला. घटनात्मक पदांवरील नेत्यांविषयी आवमानकारक भाषा वापरली जाऊ लागली. शिवसेना (Shivsena) भाजपची युती 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर तुटली आणि सर्वाधिक आमदार असूनही भाजपला सत्तेबाहेर राहावे लागले. त्यावेळेपासून राजकीय परिस्थिती कमालीची बिघडली.

Uddhav Thackeray-Eknath Shinde-Imtiaz Jaleel News
CM Fadnavis On Datta Gade : दत्तात्रय गाडेचा अक्षय शिंदे होणार! मुख्यमंत्री फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले...

एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केला. पक्ष सोडायचा असेल तर सोडा, मात्र ज्यांनी तुम्हाला मोठे केले, त्यांच्याविषयी वाईट बोलू नका, असा सल्ला त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिला आहे. शिंदे यांच्या गटाला असा सल्ला यापूर्वीही अनेकांनी दिलेला आहे. सर्वाधिक आमदार असूनही सत्तेबाहेर बसावे लागलेल्या भाजपने महाविकास आघाडीचे सरकार पाडले आणि शिवसेना फुटली. शिंदे यांच्यासह 40 आमदार आणि काही खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यानंतर शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठाकरेंवर केलेली टीका सर्वांनी ऐकलीच आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या बहुतांश आमदारांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरू झाली. अगदी सामान्य माणसाला रस्त्यावरून उचलून बाळासाहेब ठाकरे यांनी आमदार, खासदार, मंत्री केले. खुद्द एकनाथ शिंदे यांनीही कधीकाळी ऑटोरिक्षा चालवली आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे पोस्टर विविध शहरांत झळकले होते. या पोस्टरवर शिंदे आणि त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांचे फोटो होते. काही पोस्टरवर आणखी एक फोटो होता, जो लक्ष वेधून घेत होता. फॉर्च्युनर गाडीचा तो फोटो होता.

Uddhav Thackeray-Eknath Shinde-Imtiaz Jaleel News
Swargate Rape case : असंवेदनशीलपणा भोवला; CM फडणवीस अन् अजितदादांनी कडक शब्दात टोचले कान

शिवसेनेने विविध पदे दिल्यामुळे ऑटोरिक्षा जाऊन 'फॉर्च्युनर' आली, हे एकनाथ शिंदेही नाकारणार नाहीत. अर्थात, शिवसेनेच्या विस्तारासाठी शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनीही मेहनत केली, हे नाकारता येत नाही. या लोकांनी पक्ष सोडला, ही कृती चूक की बरोबर, हा विषय येथे नाही. विषय आहे तो ज्यांच्यासोबत राहून मोठे झालो त्यांच्यावर टीका करताना वापरल्या जाणाऱ्या भाषेचा. शिवसेनेच्या राजकारणाचा बाज हा रांगडा आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे अनेक सामान्य तरुण मोठे झाले. मोठे झालेले हेच लोक आता भाषेची मर्यादा विसरले आहेत.

शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करू नये, असा याचा अर्थ नाही. शिवसेना सोडणाऱ्यांवर गद्दारीचा शिक्का बसतो, शिवसेनेत तशी पद्धतच आहे. यापूर्वी शिवसेना सोडणाऱ्यांना शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कधी काळी गद्दार म्हटलेच असणार. एकाच घरात राहिलेले दोन भाऊ वेगळे झाले म्हणून त्यांनी एकमेकांवर मर्यादा सोडून टीका करायची? आपण ज्या घरातून बाहेर पडलो त्या घरात मागे राहिलेल्या ज्येष्ठांवर, सहकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा विधीनिषेध न बाळगता टीका करायची? अजितदादा पवारही पक्षातून बाहेर पडले, मात्र अजितदादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शरद पवार यांच्यावर अशा पद्धतीने कधीही टीका केलेली नाही, हे तरी शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे.

Uddhav Thackeray-Eknath Shinde-Imtiaz Jaleel News
Uddhav Thackeray meeting : उद्धव ठाकरेंच्या बैठकीला दोन आमदार गैरहजर; स्वतःच सांगितले 'हे' कारण

सर्वच राजकारणी काचेच्या घरात राहतात. राजकीय नेत्यांना उंची गाड्या, त्यांचे उंची राहणीमान कसे परवडते? याची जाणीव महागाईत भरडून निघालेल्या लोकांना आहे. अशांपैकीच एकाला निवडावे लागते, अशी आपली राजकीय व्यवस्था आहे, त्यामुळे लोक हतबल आहेत. शिवाय धर्माचा मुद्दा आणून काही राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेत आहेत. त्यामुळे आपल्याला काहीही बोलण्याची जणू मुभाच मिळाली आहे, असे या नेत्यांना वाटत आहे. 2024 च्या निवडणुकीनंतर राजकीय संस्कृती सुधारेल, ही अशा फोल ठरली आहे. इम्तियाज बोलले ते सामान्य नागरिकांच्या मनातील भावना आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com