Loksabha Election 2024 : मी लोकांचे फोन घेतो...! मुद्दा छोटा की मोठा? तरीही महायुतीच्या नेत्यांना बेजार करणारा

Omprakash Rajenimbalkar : कोणती विकासकामे केली, असा प्रश्न विचारणाऱ्या महायुतीच्या नेत्यांची कोंडी करण्याचा ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडून प्रयत्न. मी सर्वांचे फोन कॉल घेतो, या मुद्द्याचा राजेनिंबाळकर यांच्याकडून अत्यंत खुबीने वापर
Omprakash Rajenimbalkar
Omprakash RajenimbalkarSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv Political News :

लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप, उमेदवार निश्चिती अद्याप झालेली नाही. असे असले तरी प्रचाराचा धुराळा उडू लागला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. एकमेकांची उणीदुणी काढली जात आहेत. ही निवडणूक अन्य एका कारणाने महत्त्वाची ठरणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट, हे ते कारण. फुटीरांचा आता पुन्हा एकदा 'गद्दार' असा उल्लेख सुरू करण्यात आला आहे. या मुद्द्यासह धाराशिव लोकसभा मतदारसंघात आणखी एक वेगळाच मुद्दा चर्चेत आला आहे. तो म्हणजे, लोकांचे फोन कॉल उचलण्याचा किंवा न उचलण्याचा..! खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी या मुद्द्याचा अत्यंत खुबीने वापर सुरू केला आहे. या मुद्द्यासमोर नमते घेण्याची वेळ त्यांच्या विरोधकांवर येऊ लागली आहे.

Omprakash Rajenimbalkar
Uddhav Thackeray On Amit Shah: तुळजाभवानीची शपथ घेऊन उद्धव ठाकरेंनी शाहांना ठरवलं खोटं...

हल्ली निवडणुकांमध्ये कोणता मुद्दा चर्चेत येईल, याचा नेम राहिलेला नाही. खरेतर लोकांच्या रोजच्या जगण्याचे, संघर्षाचे मुद्दे चर्चेत यायला हवेत, निवडणूक त्याभोवतीच फिरायला हवी. आरोग्य, शिक्षण, रोजगार, महागाई, रस्ते, शेतमालाला भाव, सामाजिक सद्भाव, महिलांची सुरक्षा, सुदृढ अर्थव्यवस्था... हे कोणत्याही सूज्ञ समाजासाठी उपयुक्त, महत्त्वाचे मुद्दे आहेत. पण, हे मुद्दे अभावानेच निवडणुकीत दिसतात. विरोधी पक्षांनी हे मुद्दे उचलले तरी सत्ताधारी याच विरोधकांना, मग तुम्ही त्यावेळी काय केले? असे विचारत त्यांचा प्रभाव कमी करून टाकत आहेत.

धाराशिवचा आवाका अन् लोकप्रतिनिधींची कसरत

उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा (Osmanabad Loksabha Constituency) मतदारसंघाचा विस्तार प्रचंड आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका आणि लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यासह निलंगा तालुक्यातील काही गावांचा या मतदारसंघात समावेश आहे. जवळपास 2200 मतदान केंद्र, 20 लाख मतदार असा मोठा पसारा आहे. प्रचारादरम्यान मतदारसंघातील सर्व गावांना भेटी देणेही उमेदवारासाठी जिकिरीचे ठरते. निवडणूक लढवणे सोपे नसते, तसेच निवडून आल्यानंतर विकासकामांसाठी खासदार, आमदारांना करावी लागणारी कसरतही सोपी नसते. कार्यकर्त्यांची मर्जी राखावी लागते, मतदारसंघातील लोकांचीही मर्जी राखावी लागते. अगदी छोट्या मुद्द्यांवरूनही मतदार लोकप्रतिनिधींवर नाराज होतात. आपल्या विविध कामांसाठी लोक खासदार, आमदारांना फोन लावत असतात. त्यावेळी खासदार, आमदार एखाद्या कामात गुंतलेले असले आणि त्यांनी लोकांचे कॉल रिसिव्ह नाही केले तर त्यांना लोकांच्या नाराजीचा निवडणुकीच्या काळात सामना करावा लागतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धाराशिव जिल्ह्यात उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघात हा मुद्दा आता चर्चेत आला आहे. निवडणुकीचा प्रचार याच मुद्द्याकडे न्यायचा, असा प्रयत्न खासदार राजेनिंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांच्याकडून सुरू आहे. मी कधी नॉट रीचेबल असतो का, मी तुमचा फोन कधी घेतला नाही का, घेतला नसेल तर तुम्हाला कॉलबॅक केला नाही का, असे प्रश्न ते जाहीर सभांमधून लोकांना विचारत आहेत. लोकांनाही, विशेषतः तरुणांना त्याचे मोठे कौतुक वाटत आहे. त्यामुळे तरुणांकडून या प्रचाराला सध्यातरी मोठा प्रतिसाद मिळत आहे. खासदार राजेनिंबाळकर यांनी गेल्या पाच वर्षांत किती निधी आणला, केंद्रातून एखादा प्रकल्प आणला का, अशी टीका महायुतीतील सर्व पक्षांतील नेत्यांकडून केली जात आहे. त्या टीकेला योग्यवेळी उत्तर देणार असल्याचे खासदार राजेनिंबाळकर सांगतात. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी फोनचा मुद्दा चर्चेत आणून विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकांचा फोन घेण्याची आणि न घेण्याची कथा वेगळीच आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) शिवसेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड हे धाराशिव लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी झाले होते. प्रा. गायकवाड हे अगदी सामान्य लोकांमध्ये, तरुणांमध्ये सहजपणे मिसळणारे नेते. लोकांना आमदार कुठेही भेटू शकतो, अगदी चहाच्या टपरीवरही भेटू शकतो, हे उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघाला प्रा. गायकवाड पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळी कळाले. त्यामुळे त्यांची लोकप्रियता आणखी वाढली.

Omprakash Rajenimbalkar
Uddhav Thackeray Speech : 'होय... मी आदित्यला मुख्यमंत्री करेन'; ठाकरेंनी अमित शाहांना ललकारले!

खासदारकीच्या शेवटच्या टप्प्यात मात्र प्रा. गायकवाड हे लोकांना उपलब्ध होईनासे झाले होते. ते लोकांचे फोन कॉलही घेत नव्हते, असा आरोप त्यांच्यावर होऊ लागला. खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रा. गायकवाड यांच्यावर एकदा तशी टीका केली होती. तेव्हापासून हा मुद्दा चर्चेत आला. आता प्रा. गायकवाड हे शिंदे गटात म्हणजे महायुतीत आहेत. खासदार राजेनिंबाळकर यांनी गेल्या पाच वर्षांत किती विकासकामे केली, असा प्रश्न महायुतीतील नेत्यांकडून विचारला जात आहे. त्याला पलटवार म्हणून प्रचाराच्या प्रारंभिक टप्प्यात राजेनिंबाळकर यांनी फोनचा मुद्दा समोर आणला आहे.

खासदार राजेनिंबाळकर हे सर्व फोन कॉल घेतात. एखादा फोन घेतला नाही तर कॉलबॅक करतात, असा अनुभव बहुतांश लोकांचा आहे. खासदार माझा फोन उचलतात किंवा मला कॉलबॅक करतात, याचे लोकांना कौतुक वाटत आहे. तसे ते अभिमानाने सांगतातही. अगदी साध्या कामांसाठी जसे की माझ्या ट्रकचा टायर पंक्चर झाला आहे, मला जॅक उपलब्ध करून द्या, बसमध्ये जागा नाही, मला सीट मिळवून द्या... अशा कामांसाठीही पुरुष, महिला मला फोन करतात आणि मी ती कामे करतो, असे राजेनिंबाळकर जाहीर सभांमधून सांगू लागले आहेत. ते सांगण्याची त्यांची पद्धतही अत्यंत प्रभावी अशी आहे. राजेनिंबाळकर ही लोकांची भाषा बोलत आहेत, म्हणजे लोक एकमेकांशी जसे बोलतात तशाच पद्धतीने ते सभांमधून लोकांशी संवाद साधतात. त्यामुळे त्यांचा मुद्दा अधिक प्रभावी ठरत आहे.

Omprakash Rajenimbalkar
Uddhav Thackeray News : ''आता फडणवीसांच्या याच 'पीए'ला पाडा''; उद्धव ठाकरेंचं जाहीर सभेत विधान!

मोदींमुळे निवडून आलात... यावरही सडेतोड

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा फोटो लावून 2019 च्या निवडणुकीत विजयी झालात, याची जाणीव ठेवा, अशी टीका भाजपच्या (BJP) नेत्यांकडून खासदार राजेनिंबाळकर यांच्यावर केली जात आहे. या टीकेवरही त्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. 2014 पूर्वीही या मतदारसंघातून शिवसेनेचे शिवाजीबापू कांबळे, कल्पना नरहिरे हे खासदार म्हणून निवडून आले होते. राजेनिंबाळकरांना याचा आधार घेत आता भाजपला उत्तर देणे सुरू केले आहे. मोदी नसतानाही शिवसेनेचे शिवाजीबापू कांबळे, कल्पना नरहिरे खासदार झाले होते, असे प्रत्युत्तर ते आता देत आहेत. यामुळे शिवसैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊ लागला आहे. मोदींमुळे निवडून आलात... असा प्रचार शिवसेनेकडून राज्यभरात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या खासदारांवर केला जात आहे. त्याच्यावर खासदार राजेनिंबाळकर यांनी हे उत्तर शोधले आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

Omprakash Rajenimbalkar
Shivsena UBT News : संभाजीनगरचे श्रेय घेणाऱ्या फडणवीसांना विमानतळ नामकरणाची दानवेंनी करून दिली आठवण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com